भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा (१५ ऑक्टोबर १९३१ ) सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधून ' वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा या मागील महत्त्वाचा उद्देश आहे. शिक्षकांनी मुलांना अब्दुल कलामांची पुस्तके वाचून दाखवावीत, मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांचे प्रेरणादायक विचार मुलांपर्यंत पोहोचावे, वाचनपर विविध उपक्रम राबवावे, या करिता वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो.
पण फक्त हा एकच दिवस वाचनासाठी मर्यादित न राहता मुलांनी कलामांचे विचार, नित्य वाचन अंगीकारणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण वाचनाने शब्द संपत्तीत भर पडते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते, स्वतः च्या आणि देशाच्या विकासासाठी वाचन हे खूप महत्त्वाचे असते. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, तसे वाचनाविना शिक्षण व्यर्थ आहे. म्हणून कायम वाचनाची कास धरणे खूप गरजेचे आहे.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे अतिशय संवेदनशील, साधे
राहणीमान पण उच्च विचारसरणीचे होते. त्यांचे बालपण हे अत्यंत कष्टात गेले होते. पण तरीही त्यांनी स्वतःला घडवत देशात विकास घडविण्याचे मोलाचे कार्य केले. युवकांना कायम प्रेरणा देणारे असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते.
मुलांचे आवडते शिक्षक होते.
डॉक्टर कलाम हे विज्ञानाचे भोक्ते होते. त्यांना 'मिसाईल मॅन' ही उपाधी मिळाली होती. 'अग्नी ' या
क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले होते. पृथ्वी, अग्नीबाणाची निर्मिती त्यांनी केली होती.
त्यांनी भारत देश कसा प्रगत असावा यासाठी काही स्वप्ने पाहिली होती. त्यादृष्टीने त्यांनी वाटचालही केली होती.
त्यांनी लिहिलेली ' इंडिया २०२० , विंग्ज फॉर फायर( अग्निपंख ) , ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम , टर्निंग पॉइंटस , माय जर्नी हा काव्यसंग्रह इत्यादी पुस्तके त्यांची साऱ्यांना प्रेरणा देण्याचेच काम करतात.
त्यांना' पद्मभूषण', 'पद्मविभूषण' , आणि २५ नोव्हेंबर १९९८ साली 'भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
जीवनात यशस्वी होण्याचे मंत्र डॉ.अब्दुल कलामांनी सांगितले होते ते पुढील प्रमाणे : -
१) अपयश पचवायला शिका.
२) अभ्यासातून इप्सित ध्येयाची संकल्पना रेखाटा.
३) स्वतःशी प्रामाणिक राहा.
४) मर्यादांवर मात करा.
५) सतत शिकत राहा.
६) स्वतःसोबत इतरांनाही घडवा.
७) कामात एकाग्रता आणा.
८) स्वप्नांचा पाठलाग करा.
९) इतरांसाठी प्रेरणादायी बना.
त्यांचे विचार :-
जर सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील.
स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही.
आपण आपले भविष्य बदलू शकत नाही पण आपण आपल्या सवयी बदलू शकतो आणि
निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलण्यास मदत करतील.
सौ. राजश्री सुहास जाधव.
वाचन प्रेरणा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा छान लिहिलंय
ReplyDeleteखूप छान सुंदर अप्रतिम लेख...🌺🌹🌿🌹🌹👌👌
ReplyDeleteमॅडम... सुंदर लेखन, सुंदर संकलन!👌
ReplyDeleteडॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांना विनम्र अभिवादन!🙏🙏🙏
प्रेरणादायी लेखन केले सखी ✍️🌟🌟
ReplyDeleteअतिशय सुंदर व प्रेरणादायी रचना
ReplyDelete