Wednesday, 23 February 2022

सूर्यास्त




सूर्यास्त

'सूर्यास्त ' हा शब्द उच्चारताच, डोळ्यासमोर तो निसर्गाचा अद्भुत आविष्कार तरळून जातो. दिवसा साऱ्यांना आपल्या प्रकाशाने ऊर्जा देणारा , सांजवेळी मात्र
रात्रीच्या अधीन होत, विसावा घेत असतो, तेव्हा त्याचे रूपही अतिशय मोहक दिसत असते. लाल, पिवळसर , निळसर, गुलाबी छटांनी तो सर्वांना आकर्षित करत असतो आणि 'आता जरी माझा अस्त झाला असला तरीही मी उद्या नव्या जोमाने पुन्हा उगवणार आहे , प्रकाशमान होणार आहे ' हेच जणू तो अवघ्या विश्वास
सांगत असतो.

        आजच्या धकाधकीच्या जीवनात, खरे तर कोणालाही असा निवांत वेळ नसतो किंवा वेळ काढला जात नाही की जाऊन आवर्जून सूर्यास्त पाहण्यास. तो वेळ माणसाने स्वतःसाठी काढलाच पाहिजे. तसे बरेच लोक असतात जे आपल्या सुट्टीचा उपभोग घेतात, हे मनोहर दृश्य पाहण्यासाठी खास पर्यटन करतात आणि सुर्यास्ताचा आनंद आपल्या नजरेत , कॅमेऱ्यात बंदिस्त
करतात.

      प्रत्येकासाठी सूर्यास्त हा वेगवेगळा भासतो, सुर्यास्त
पाहून  कवी मन जागृत होते. त्याच्या कल्पनेतून तो त्या सूर्यास्ताला विरहाचे, प्रेमाचे , नव्या उमेदीेचे प्रतिक समजून तसे तो लेखणीतून उतरवतो.
       बऱ्याच वेळा सूर्यास्ताचे दर्शन घेतले की काहींना
मानसिक समाधान , शांतता मिळते. तर काहींच्या मते
सूर्यास्त म्हणजे प्रियकर , प्रेयसीतील दुरावा वाटतो.
कोणास उगाचच रुखरुख लागून राहते. तर कातरवेळी
सूर्यास्त पाहिल्यावर, प्रेमवीरांच्या प्रेमभावना जागृत होतात.

       सूर्योदय आणि सूर्यास्त ही रोज घडणारी घटना आहे.
जी माणसाला खरे तर एक चांगली शिकवण देत असते.
परिस्थिती दर वेळेस एक सारखी राहणार नसते , ती बदलत राहते. आज मिळालेले यश हे उद्या असेलच हे सांगता येत नाही. परंतु माणसाने कच खाता कामा नये.
सुख आणि दुःख हे येत, जात असते. आज जरी सूर्य
लयास गेला तरी उद्या तो तितक्याच चैतन्याने पुन्हा
उदयास येणार आहे. त्याप्रमाणे माणसाला आज जरी
मार्ग सापडला नाही, यश मिळाले नाही तरी जिद्द आणि
चिकाटीच्या जोरावर तो स्वतःस यश मिळवू शकतो , तितक्याच जोमाने ध्येय गाठू शकतो.

          आज जरी गेला सूर्य तो लयाला,
          उगवणार आहे पुन्हा तो त्याच दिशेला
          जागवुनी मनात साऱ्यांच्या प्रेरणा,
          तोच कारण आहे विश्वाच्या ऊर्जेला .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


कातरवेळी



कातरवेळी, माझ्या अंगणी,
रातराणी ती दरवळली,
देखुनी त्या  रातराणीला
मनात प्रीत मोहरली ....

सांजवेळी नभांगणी,
दशदिशांना पसरली सूर्यास्ताची लाली,
भुरळ घाली ती  माझ्या मनाला,
अलवार भावना मनी जागली ....

करुनी तेजोमय साऱ्या विश्वाला, 
रोज जाई  तो  भास्कर अस्ताला
घेऊनी  नवचैतन्याची पहाट,
तो सूर्य पाहा कुशीत निशेच्या विसावला....

पाहुनी त्या अनुपम दृष्याला,
पडे भुरळ माझ्या मनाला
जागे आस ती नव्याने,
चैन पडेना या जीवाला .....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 17 February 2022

रेशीमगाठ



जेव्हा दोन जीव,
अडकले जातात विवाह बंधनात,
तेव्हा राहावे लागते त्यांस वचनात
ठेवावा लागतो संयम जीवनात.....

दोन जीवांची ही रेशीमगाठ,
ठेवावी ती अलवार गुंफून
कितीही येऊ दे अडचणींचे डोंगर,
करावे पार दोघांनीही पुढे सरसावून .....

ध्यानी  ठेवावे वचन एकत्र राहण्याचे,
साथीने परस्परांच्या शोधावे मार्ग सुखाचे
न पेरावे बीज मनात शंकाकुशंकांचे
वाताहत होण्यास तेच कारण जीवनाचे .....

दोन जीवांसवे, दोन कुटुंबांचेही ते मनोमिलन,
बांधावी खूणगाठ ही साऱ्यांनी
ठेवावी नाती ती सचेतन,
राखुनी साऱ्यांचा मान परस्परांनी .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


परिस्थिती

परिस्थिती कधीच नसते चुकीची,
मनस्थिती बदला तुमची
परिस्थितीवर मात करून,
धैर्याने वाटचाल करा पुढची ....

परिस्थितीपुढे झुकतोस काय !
हताश होणे हा न उपाय
दाखव हिंमत परिस्थिती बदण्याची,
नको गाळूस कधीच तू हातपाय ....

ठेव भरवसा स्वतःवर
येईल अनुकूल स्थिती,
मेहनत आणि संयमाच्या बळावर
नाही येणार मग वेळ म्हणण्याची,
चुकीची होती परिस्थिती.....

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 16 February 2022

स्वप्न



एक सुंदर स्वप्न साऱ्यांनीच पाहावे,
ध्येय सदैव मनाशी ठरवावे
वाटचाल करून त्या दिशेने,
स्वप्नांना मूर्त स्वरूप द्यावे ....

स्वप्नांना नसले जरी कशाचेच बंधन,
परी ती तर आपुल्या विचारांचेच मंथन
म्हणुनी पाहावी स्वप्न सदैव मोठी,
होता साकार ती, घडेल परिवर्तन ....

स्वप्न पाहावे स्वविकासाचे,
स्वप्न पाहावे सुखमय जीवनाचे,
स्वप्न पाहावे मानव कल्याणाचे ,
स्वप्न पाहावे देश हिताचे ....

अशी ही सुंदर स्वप्नं,
साऱ्यांचीच व्हावी पूर्ण
नसावे कोणी दुःखी,
सत्यात साकारूनी स्वप्न,
व्हावे साऱ्यांनी सुखी .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 15 February 2022

प्रेम म्हणजे काय ?




'प्रेम ' ही एक सुंदर भावना आहे. जी कोणालाही, कोणत्याही व्यक्तीविषयी, वस्तू विषयी, प्राणीमात्रांविषयी निर्माण होऊ शकते.

         प्रेम आहे म्हणजे नेमके काय ? एखाद्या व्यक्ती विषयी खूप काळजी, ओढ, त्याचे सर्व चांगले व्हावे ही भावना मनात असेल आणि स्वतःस कितीही त्रास झाला तरी त्याची झळ आपल्या माणसाला पोहोचू नये,
ही तळमळ ,  माझे प्रेम आहे म्हणून समोरच्याने ते स्वीकारलेच पाहिजे, ही भावना मनात न ठेवता , त्यागाची भावना , समर्पण, विश्वास जर मनात असेल तर आणि तरच त्याला प्रेम समजावे.

        जसे आईवडिलांचे प्रेम हे निःस्वार्थ असते, भावा बहिणींचे प्रेम हे थोडे राग पण माया, जबाबदारीचे असते. तसेच प्रेम हे इतर नात्यांही हवे.  मग ते प्रियकर- प्रेयसी, मित्र - मैत्रिणी , पती - पत्नी ह्याच्यातही असेच निःस्वार्थ प्रेम हवे.
      पण आजकाल प्रेम हे खूप उथळ असते. त्यात विश्वास , एकमेकांविषयी आस्था जास्त दिसत नाही. एकमेकांविषयी शंका - कुशंका, अहंभाव, स्वार्थ , नुसते क्षणिक आकर्षण , समजूतदारपणाचा अभाव ह्या साऱ्या गोष्टीच लोकांच्या मनात ठासून  भरलेल्या असतात. मग खरे प्रेम ते कसे मिळणार ?

        प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणणाऱ्या व्यक्ती , वेळ आली की मग काढता पाय घेतात. आजकालची पिढी तर म्हणजे सगळेच नाही पण बरेच तर असेच असतात, आज ह्याच्यावर ,उद्या आणखी कोणावर हेच जणू त्यांच्या जीवनाचे ध्येय बनून जाते. तिथे कुठेही प्रेमभावना ,दूरदर्शी प्रगल्भ विचार हे काहीच नसते. फक्त स्वतःच्या समाधानासाठी, वासनेसाठी  त्यांना प्रेम हवे असते . असे प्रेम हे शाश्वत नसते.

    प्रेमात विचार, भावना, निष्ठा,  जर एकमेकांची अबाधित राहिल्या तर ते प्रेम खऱ्या अर्थाने  यशस्वी होऊ शकते.

         प्रेमाची उदाहरणं द्यायची झाली तर भरपूर आहेत. राधा,कृष्ण, मीरा, नल - दमयंती, राम - सीता ह्यांचे प्रेम अलौकिक होते.

       त्याहूनही आई वडिलांचे प्रेम हे अतिशय निस्वार्थ प्रेम असते, निर्व्याज असते. तसेच ईश्वराप्रती जो एकरूप होतो, साऱ्या गोष्टींचा ज्यास विसर पडतो, राग लोभ ह्याही
पलीकडे जाऊन तो ईश्वर चरणी लीन होतो, तेही प्रेम अद्वितीयच असते ,नाही का !

सौ. राजश्री सुहास जाधव.









Tuesday, 8 February 2022

रुसलेला गुलाब



नमस्कार 🙏 बालमित्रांनो, कसे आहात ? नक्कीच मजेत असाल ! तुम्हा सर्वांना गुलाबाचे फूल आवडते का ? मला तर खूप आवडते, तुम्हालाही आवडतच असेल. पण हे गुलाबाचे फूल सुद्धा तुमच्या सारखे रुसते बरं का ! हो , खरंच ! काय, विश्वास बसत नाही का तुमचा ?  चला तर मग ह्या रुसलेल्या गुलाबाची गोष्ट ऐकुया !

       एकदा काय झालं, एक सुदंरसा गुलाब देवबाप्पावर खूप रुसला. काही केल्या हसेना. देवबाप्पाने त्याला खूप समजावले पण तरीही त्याची कळी काही खुलेना. शेवटी देवबाप्पा गुलाबास म्हणाला, "तू जर काही बोलला नाही तर मला कसे कळणार, तुला काय हवे ?"  त्यावर थोडेसे आढेवेढे घेत गुलाबाचे फूल म्हणाले , " देवा, मी इतका सुंदर ! माझा लाल रंगही किती खुलून दिसतो. साऱ्या फुलांचा मी राजा. पण तरीही माझ्या अंगावर हे काटे का ? " यावर देवबाप्पा हसले आणि म्हणाले ," अरे तू फुलांचा राजा आहे, सर्वांहून वेगळा आहे. तसेच सर्व फुलांना, प्राणी - पक्ष्यांनाही मी असेच काही ना काही दिले आहे. जेणेकरून त्यामुळे त्यांचे रक्षण होईल. त्यांची स्वतःची अशी ओळख असेल. तुला काटे दिले ह्यामागेही कारण आहे. सगळेच जर छान, सुखकारक असेल तर त्या सुखाची काही किंमत कळेल का? म्हणून त्याबरोबर मी दुःखही वाट्याला देतो "
        देवाचे हे बोलणे मात्र गुलाबाला नीट समजले नाही आणि देवाच्याही ते लक्षात आले. त्यावर देव गुलाबास म्हणाला ," तू चल माझ्याबरोबर, मी तुला गंमत दाखवतो."
          देवाबरोबर गुलाबही वाटेने चालू लागला. ते दोघे एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन पोहोचले. बंगल्याच्या आवारात सुंदरशी गुलाबाची फुलं बहरलेली होती. त्या फुलांना पाहून गुलाबास खूपच आनंद झाला. देव त्याला म्हणाला , 'थांब जरा आणि गंमत बघ'.... इतक्यात, चोर
पावलांनी बंगल्याच्या आवारात कोणीतरी प्रवेश केला, बहुदा चोरच असावा. हे गुलाबाने ओळखले. तो चोर त्या आवारातील फुलं तोडू लागताच त्याच्या बोटास काटा टोचल्याने तो जोराने ओरडतो, त्याच्या आवाजाने घरातील मालक बाहेर येतो मग त्या चोराची पळता भुई थोडी होते. हे सर्व पाहिल्यावर देव गुलाबास म्हणतो, " बघ तुझ्या अंगाला काटे असल्याने कोणालाही तुला ओरबाडून घेता येणार नाही, ते तुझ्या संरक्षणासाठीच आहे." यावर गुलाबाचे फूल थोडे ओशाळले.
           पुढे देव आणि गुलाब एका मोठ्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आले. तिथे त्यांना खूप मुली, मुले दिसली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि बहुतेकांच्या हातात त्यांना लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाची फुलं दिसत होती. हे पाहून गुलाबाच्या फुलास नवल वाटले. तेव्हा देव म्हणाला , " अरे ही आजकालची मुले 'गुलाब दिवस'  साजरा करतात. मैत्रीचे , प्रेमाचे प्रतीक म्हणून. ज्याला सर्वात जास्त लाल गुलाब मिळतात ते मग विजेते, गुलाबाचा राजा आणि गुलाबाची राणी." हे देवाचे  बोलणे ऐकून गुलाबास खूपच अभिमान वाटू लागला, ते मनोमन खूप खूश झाले.
         त्यानंतर देवाने गुलाबास एका प्राणिसंग्रहालयात नेले. तिथे खूप सारे प्राणी, पक्षी बंदिस्त पिंजऱ्यात त्यांना दिसले. एका पिंजऱ्याभोवती लोकांची खूप गर्दी जमली होती. गुलाबानेही उत्सुकतेने तिकडे पाहिले तर सर्व लोक त्या पिंजऱ्यात असलेल्या मोरास पाहत होते. तेव्हा देव गुलाबास म्हणाला ," तू मोराकडे नीट पाहिलेस का ? तो सुंदर असल्याने बंदिस्त आहे पण झाडावर तो कावळा बसला आहे, त्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. हे जरी खरे असले तरी त्याला  त्याचे स्वातंत्र्य आहे. तो त्याला हवे तिथे जाऊ शकतो, उडू शकतो.
            मीच सर्वांस निर्माण केले आहे. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत कळते. त्यामुळे आहे त्यात समाधानी राहिले पाहिजे. एवढे सर्व बघितल्यावर गुलाबाचा रुसवा कुठच्या कुठे पळाला आणि त्याचीकळी खुलली.
🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ. राजश्री सुहास जाधव.

            


Wednesday, 2 February 2022

किरण आशेचा...



जागवा एक किरण आशेचा
होईल सूर्योदय जीवनाचा
क्षितिजापार जाऊ दे
झेंडा तो आपुल्या कर्तृत्वाचा ....

जागवा एक किरण आशेचा
फिटू ते अंध:कार जीवनाचा
दुःखाने ग्रासलेल्या जीवास त्या,
द्या हात तुमच्या मदतीचा ....

जागवा एक किरण आशेचा
जो देईल विचार, परिवर्तनाचा
नारी तू नाहीस अबला,
रचशील इतिहास तू यशाचा ....

जागवा एक किरण आशेचा
होऊ दे  नायनाट दुराचाराचा
रुजू दे बीज संस्कारांचे,
होईल जागर  सद्भावनेचा ....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.


माणुसकी

करता अत्याचार स्त्रीवरी
जगण्याची आणता नामुष्की
घुसमट होई रे तिची !
कुठे हरवली माणुसकी ?...

नको जाती-पाती, नको द्वेष-भाव
अंगी बाणावा नित्य सद्भाव
आचरणात आणून साऱ्यांनी,
गाठावा हो माणुसकीचा गाव ....

खोटेच अश्रू अन् खोटीच नाती
देखुनी वेदना दुसऱ्याची,
डोळ्यांच्या कडाही ना पाणावती
हे माणसा, ओशाळली का माणुसकी ती ?....

सौ. राजश्री सुहास जाधव.


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...