नमस्कार 🙏 बालमित्रांनो, कसे आहात ? नक्कीच मजेत असाल ! तुम्हा सर्वांना गुलाबाचे फूल आवडते का ? मला तर खूप आवडते, तुम्हालाही आवडतच असेल. पण हे गुलाबाचे फूल सुद्धा तुमच्या सारखे रुसते बरं का ! हो , खरंच ! काय, विश्वास बसत नाही का तुमचा ? चला तर मग ह्या रुसलेल्या गुलाबाची गोष्ट ऐकुया !
एकदा काय झालं, एक सुदंरसा गुलाब देवबाप्पावर खूप रुसला. काही केल्या हसेना. देवबाप्पाने त्याला खूप समजावले पण तरीही त्याची कळी काही खुलेना. शेवटी देवबाप्पा गुलाबास म्हणाला, "तू जर काही बोलला नाही तर मला कसे कळणार, तुला काय हवे ?" त्यावर थोडेसे आढेवेढे घेत गुलाबाचे फूल म्हणाले , " देवा, मी इतका सुंदर ! माझा लाल रंगही किती खुलून दिसतो. साऱ्या फुलांचा मी राजा. पण तरीही माझ्या अंगावर हे काटे का ? " यावर देवबाप्पा हसले आणि म्हणाले ," अरे तू फुलांचा राजा आहे, सर्वांहून वेगळा आहे. तसेच सर्व फुलांना, प्राणी - पक्ष्यांनाही मी असेच काही ना काही दिले आहे. जेणेकरून त्यामुळे त्यांचे रक्षण होईल. त्यांची स्वतःची अशी ओळख असेल. तुला काटे दिले ह्यामागेही कारण आहे. सगळेच जर छान, सुखकारक असेल तर त्या सुखाची काही किंमत कळेल का? म्हणून त्याबरोबर मी दुःखही वाट्याला देतो "
देवाचे हे बोलणे मात्र गुलाबाला नीट समजले नाही आणि देवाच्याही ते लक्षात आले. त्यावर देव गुलाबास म्हणाला ," तू चल माझ्याबरोबर, मी तुला गंमत दाखवतो."
देवाबरोबर गुलाबही वाटेने चालू लागला. ते दोघे एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन पोहोचले. बंगल्याच्या आवारात सुंदरशी गुलाबाची फुलं बहरलेली होती. त्या फुलांना पाहून गुलाबास खूपच आनंद झाला. देव त्याला म्हणाला , 'थांब जरा आणि गंमत बघ'.... इतक्यात, चोर
पावलांनी बंगल्याच्या आवारात कोणीतरी प्रवेश केला, बहुदा चोरच असावा. हे गुलाबाने ओळखले. तो चोर त्या आवारातील फुलं तोडू लागताच त्याच्या बोटास काटा टोचल्याने तो जोराने ओरडतो, त्याच्या आवाजाने घरातील मालक बाहेर येतो मग त्या चोराची पळता भुई थोडी होते. हे सर्व पाहिल्यावर देव गुलाबास म्हणतो, " बघ तुझ्या अंगाला काटे असल्याने कोणालाही तुला ओरबाडून घेता येणार नाही, ते तुझ्या संरक्षणासाठीच आहे." यावर गुलाबाचे फूल थोडे ओशाळले.
पुढे देव आणि गुलाब एका मोठ्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आले. तिथे त्यांना खूप मुली, मुले दिसली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि बहुतेकांच्या हातात त्यांना लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाची फुलं दिसत होती. हे पाहून गुलाबाच्या फुलास नवल वाटले. तेव्हा देव म्हणाला , " अरे ही आजकालची मुले 'गुलाब दिवस' साजरा करतात. मैत्रीचे , प्रेमाचे प्रतीक म्हणून. ज्याला सर्वात जास्त लाल गुलाब मिळतात ते मग विजेते, गुलाबाचा राजा आणि गुलाबाची राणी." हे देवाचे बोलणे ऐकून गुलाबास खूपच अभिमान वाटू लागला, ते मनोमन खूप खूश झाले.
त्यानंतर देवाने गुलाबास एका प्राणिसंग्रहालयात नेले. तिथे खूप सारे प्राणी, पक्षी बंदिस्त पिंजऱ्यात त्यांना दिसले. एका पिंजऱ्याभोवती लोकांची खूप गर्दी जमली होती. गुलाबानेही उत्सुकतेने तिकडे पाहिले तर सर्व लोक त्या पिंजऱ्यात असलेल्या मोरास पाहत होते. तेव्हा देव गुलाबास म्हणाला ," तू मोराकडे नीट पाहिलेस का ? तो सुंदर असल्याने बंदिस्त आहे पण झाडावर तो कावळा बसला आहे, त्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही. हे जरी खरे असले तरी त्याला त्याचे स्वातंत्र्य आहे. तो त्याला हवे तिथे जाऊ शकतो, उडू शकतो.
मीच सर्वांस निर्माण केले आहे. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत कळते. त्यामुळे आहे त्यात समाधानी राहिले पाहिजे. एवढे सर्व बघितल्यावर गुलाबाचा रुसवा कुठच्या कुठे पळाला आणि त्याचीकळी खुलली.
🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा ताई खूप छान स्टोरी लिहिली मस्तच रुसलेल्या गुलाबाची स्टोरी
ReplyDeleteखुप सुंदर बालकथा 👌👌👌👌✍️✍️✍️✍️
ReplyDeleteसुंदर कथा...अगदी गुलाबफुलाला साजेशी!✍️👌👌👌
ReplyDelete