Wednesday, 25 May 2022

दोष कोणाचा?...

दुसऱ्याला दोष  देणं असतं किती सोपं !
विचारून पाहा मनास एकदा, का सारखं असं होतं ?
दुसऱ्याच्या चुका दाखवण्यास माणूस असतो तरबेज 
येते जेव्हा स्वतःवर वेळ, तेव्हा मात्र बोलणंच खुंटतं .....

एकमेकांना दोष देण्यात का घालवावा वेळ ?
अशाने सांधणार नाही कधीच ताळमेळ 
जीवन आहे क्षणभंगुर, आज आहे, उद्या नसेलही
होईल कधीही ते फितूर अन् मनाची  वाढेल घालमेल .....

जे असते चांगले, ग्राह्य,  ते दिसत नाही कोणाला
होता एखादी जरी चूक, दाखविण्यास ती मात्र,
माणूस नेहमीच  पुढे सरसावला 
असेच चालू राहते मग दोषारोपाचे अविरत सत्र .....

खरे पाहता दोष नसतो कोणा एकाचा,
करावा सदैव विचार दोन्ही बाजूंचा 
मिटवावे मतभेद ते सामंजस्याने, 
तरच होईल उत्कर्ष जीवनाचा ......

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

सौ. राजश्री सुहास जाधव.

Sunday, 22 May 2022

बाग

बाग
आमच्या घरकुल कॉलनीच्या बाहेर थोड्या अंतरावरच एक सुंदर असा बगीचा आहे. सर्व तऱ्हेच्या झाडांनी, फुलांनी बहरलेला. वेगवेगळ्या रंगांची जास्वंद, अबोली, सदाफुली, पेरू, सीताफळ, अशोक...अशी बरीच झाडे बागेत होती. बागेची रखवाली करण्यास तिथेच एका 
खोलीत एक रखवालदार त्याच्या परिवारासह राहत होता. त्यामुळे बागेची योग्य ती काळजी घेतली जात होती. बागेत व्यायामासाठीचे साहित्यही ठेवले होते, त्यामुळे  सकाळ संध्याकाळी बागेत भरपूर लोक हे येत असत. प्रत्येकाचे असे ठराविक टायमिंग ठरलेले होते त्यामुळे जो तो बागेत थोडे फिरून, व्यायाम करून झाले की अर्धातास
बागेत निवांत गप्पा मारण्यात दंग असे.  
          आजही आमच्या कॉलनीतील देशपांडे काकू, सावंत काकू, जोशींच्या रमा आजी, मोरे यांची लेक राखी, गव्हाणेंची नेहा, सुमती काकू , दीपा,  क्षीरसागर आजी, सानिका आणि अर्थात मी अशी वेगवेगळ्या वयाची तरीही एकमेकांची चांगली गट्टी जमलेली.  मंडळी व्यायम आटोपून गप्पा मारण्यात दंग होती. रोज एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा, सल्लामसलत असे नित्याने होत असे. आजही त्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची चर्चा रंगली होती. विषय होता, ' घरात तुमच्या मताला किती प्राधान्य देतात, ऐकतात.' चर्चेने चांगलाच जोर धरला होता. 
          देशपांडे काकू म्हणाल्या, " आमचे हे आणि माझी मुले एखाद्या विषयावर माझे म्हणणे ऐकून घेतात, मग आम्ही त्यावर चर्चा करतो आणि त्यानंतरच एखादी गोष्ट ठरवतो." सावंत काकू म्हणाल्या, " आता सर्व घरातील कारभार ह्यांच्या पाठीमागे सून आणि मुलगा पाहतो. ते स्वतःहून काही सांगत नाही आणि मीही काही जास्त विचारत नाही. ते जसे ठरवतील तसे." त्यावर सुमती काकू आणि राखी मध्येच बोलू लागल्या, " काकू पण हे चूक आहे, जर महत्वाच्या गोष्टी असतील तर तुमचे मतही घेतलेच पाहिजे ना," त्यावर सावंत काकू म्हणाल्या," अगं, तसे नाही राखी, त्यांनाही जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे ना, मी किती दिवस आहे त्यांच्या बरोबर. कधी कधी निर्णय चुकतील पण त्यातूनच ते सुधारणा करतील. जर काही चुकले तर मी आहेच की त्यांना सांगायला.
              त्यांचे बोलणे चालू असतानाच रमा आजींनी पिशवीतील काहीतरी आणलेले बाहेर काढले आणि 
त्या सर्वांना म्हणाल्या, " आधी ही कैरीची डाळ खा बरं आज सुनबाईंनी बनवली होती. तीच मला म्हणाली तुमच्या मैत्रिणींना घेऊन जा." मग चर्चा तिथेच थांबवून आम्ही सगळ्यांनी कैरीच्या डाळीचा आस्वाद घेतला.
एव्हाना बाग बंद होण्याची वेळ झाल्याने सर्वांनीच आटोपते घेतले आणि उद्या पुन्हा भेटू, म्हणून निरोप घेतला.
      संध्याकाळी ठरल्या प्रमाणे सर्वजण बागेकडे आले तर बाग बंद आणि तिथे सूचना फलकही लावला होता,
' सदर बाग ही दुसरीकडे होणार आहे, नवीन प्रकल्प येथे सुरू होत असल्याने बागेची जागा  दुसरीकडे असेल, तरीही नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी.' ह्या अशा सूचना फलकावर लिहिलेल्या सुचनेने सर्वांनाच नवल वाटले आणि रागही आला. आम्ही साऱ्याजणी आपापसात चर्चा करू लागलो. नंतर रखवालदार दादा आले आणि म्हणाले, " अहो ताई सकाळीच पालिकेतील माणसे, साहेब येऊन गेले , पाहणी करून गेले. इथे कसले तरी ऑफिस होणार आहे. आणि नंतर मग हा फलक लावण्यास मला सांगितला." रखवालदाराचे बोलणे ऐकून नेहा, क्षीरसागर काकूंना तर खूपच राग आला. सर्वांनी समजून सांगितल्यावर त्या शांत झाल्या. आम्ही सर्वजण मग देशपांडेंच्या घरी त्यांच्या टेरेसवर गेलो चर्चा करण्यासाठी. सावंत काकू म्हणाल्या, " हे पाहा बाग ही नागरिकांसाठी  आहे. इतक्या वर्षांपासून सर्वजण ह्या बागते फिरण्यास, व्यायाम करण्यास येत आहोत त्यामुळे सर्वांचेच आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे, ह्या
बागेमुळे. आपल्या कॉलनीची शान आहे ही बाग. वातावरणही चांगले हवेशीर राहते बागेमुळे." सर्वांनी त्यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. रमा काकू म्हणाल्या, " आपण कॉलनीतील सर्वांस एकत्र बोलावून मीटिंग घेऊया आणि आपले मुद्दे त्या पालिकेच्या साहेबांसमोर मांडुया. जर त्यांनी नाहीच ऐकले तर आपण सर्व उपोषण करूया."
              झाले, ठरल्याप्रमाणे कॉलनीत एक मीटिंग घेतली. सर्वानुमते त्या पालिकेत जाऊन आधी अर्ज सादर 
केला, सर्वांचे म्हणणे त्या साहेबांना सांगितले. तेव्हा कॉलनीतील बच्चे कंपनीही बरोबर होती. त्यातील छोटा 
यश साहेबांना म्हणाला, " काका , आमची बाग नका तोडू, आम्हाला करमनार नाही." त्याच्या ह्या बोलण्याने 
साहेबांना काय बोलावे समजेना. साहेब म्हणाले," मी प्रयत्न करतो, वरून ऑर्डर आहे पण तुमचे म्हणणे मी 
त्यांना सांगतो. तो पर्यंत तुम्ही थोडे समजदारीने वागा. सूचनेचे पालन करा."
            त्यानंतर आम्हीही सारे पुन्हा माघारी आलो. आठवडाभर सारे कॉलनीतील लोक शांत राहिले कारण
सर्वांना निकाल काय लागतो त्याची काळजी होती. आठवडाभराने रखवालदाराचा मुलगा धावत येऊन साऱ्यांना आनंदाची बातमी देऊन गेला की, ' उद्यापासून बाग पुन्हा उघडेल, आताच आम्हाला कळले.'  हे ऐकून मला तर इतका आनंद झाला की मी लगेच फोन करून कॉलनीतील बऱ्याच लोकांना सांगितले. नंतर सर्वांनाच ही आनंदाची वार्ता समजली. सुमती काकू तर म्हणाल्या की ' मी आजच शनीला जाऊन नारळ फोडून येते' त्यांच्या ह्या बोलण्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

सौ.राजश्री सुहास जाधव.







        
          




         

          

Saturday, 21 May 2022

प्रेम की आकर्षण?

मनातील डायरीचे पान🌿🌿 :- अंतर्गत विषय 

             प्रेम की आकर्षण ?
        
         'इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जायेगा' खरेच असे एका नजरेत एखाद्यावर प्रेम होऊ शकते का ? असे नेहमी आपण ऐकतो की पाहताक्षणी ती किंवा तो तिच्या प्रेमात पडला. असे होतही असेल पण प्रेम हे सहवासाने, एकमेकांस समजून घेण्याने निर्माण होत असते. प्रेमात  माणूस आंधळा होतो असे म्हणतात त्याला प्रेमापुढे कशाचीच फिकीर नसते. हे जरी खरे असले तरी खरे प्रेम हे डोळसपणे एकमेकांत निर्माण झालेले असते. 
              
          किशोर वयात म्हणजे मुला मुलींना या विषयी खूप कुतूहल असते. त्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना उत्पन्न होत असतात. शाळेत असताना एखादी मुलगी आवडू लागते. तिच्याशी मैत्री करावीशी वाटते. मग त्यालाच ते प्रेम समजू लागतात. पण ते प्रेम नसून आकर्षण असते.
आणि अशा वेळेस पालकांनी मुलांशी अशा गोष्टींवर मनमोकळे पणाने बोलणे गरजेचे असते. मुलांना तुमच्याशी बोलण्यास संकोच वाटतो पण पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांस योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असते. असे केल्याने मुले भरकटणार नाहीत.
           
             प्रेम आणि आकर्षण या दोन्ही मध्ये  एक सूक्ष्म रेषा आहे. जी पटकन लक्षात येत नाही. कॉलेज मध्ये असे प्रेमवीर खूप पाहण्यास मिळतात. त्यांचे हे प्रेम वारंवार उफाळून येत असते. मग त्यासाठी ते कोणते कोणते मार्ग अवलंबतात, जेणे करून एखादी मुलगी त्यांच्या प्रेमात पडेल. इतके स्वस्त असते का प्रेम?  खऱ्या प्रेमाचा अर्थही त्यांस समजलेला नसतो. नुसते बाह्य सौंदर्यावर भाळून, कोणताही सारासार विचार न करून एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भावनेच्या भरात पळून जाऊन लग्नही करतात आणि कालांतराने त्यांच्यातील प्रेम कुठे नष्ट होते ते त्यांनाच कळून येत नाही, मग सारखे खटके उडू लागतात. जगण्यासाठी इतरही गोष्टींची गरज लागते हे नंतर त्यांच्या लक्षात येते, परिस्थितीचे चटके बसू लागतात. अशा वेळेस एकेमकांचा सहवासही मग त्यांस नकोसा वाटू लागतो. कधी कधी गोष्टी अतिशय कठीण होऊन जातात. घटस्फोटापर्यंत येऊन त्यांचे प्रेम संपुष्टात येते.
              
        का होते असे? खरे तर प्रेमा सारखी सुंदर अनुभूती दुसरी कोणतीही नाही. प्रेम हे अंतःकरणातून व्हावे लागते. प्रेमात समर्पण असते, त्याग असतो. एखाद्या व्यक्तीच्या गुण दोषांसहित तिचा स्वीकार त्यात केला जातो. ते निःस्वार्थ असते. प्रेम हे सहवासातून फुलत जाते. प्रेमात एकमेकांविषयी काळजी असते. दूर राहूनही प्रेम हे हृदयात कायम जपले जाते. स्वतःस कितीही त्रास झाला तरी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीस त्याची झळ बसू नये ही भावना प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायम असते. प्रेमात असलेली व्यक्ती आपले म्हणणे तिच्या आवडत्या व्यक्तीवर लादत नाही. ती कितीही लांब जरी असली तरी त्यांचे प्रेम, अस्तित्व मनात सदैव असते आणि विनाकारण ते दुःखी न राहता कायम आनंदी राहतात. हेच खरे प्रेम असते. एका नजरेत प्रेम होते असे आपण म्हणतो पण ते आकर्षण असते. तो प्रेम होण्याचा टप्पा असू शकतो. त्यासाठी त्या दोन व्यक्तींना एकमेकांस समजून घ्यावे लागते, सहवासातून नंतर प्रेम हे बहरत जाते. 
              
                एखाद्या व्यक्तीचे दिसणे, तिचा आवाज, तिचे व्यक्तिमत्त्व आपणास आवडू लागते. ती व्यक्ती कायम आपल्या सोबत असावी असे वाटू लागते, तेव्हा त्या व्यक्तीस हे प्रेम आहे असे वाटू लागते परंतु ते प्रेम नसून आकर्षण असते. कारण खऱ्या प्रेमात ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती दूर असली तरी मनाने तितकीच जवळ असते. आकर्षणात त्या व्यक्तीची सोबत हवी असते. 
स्पर्श हवाहवासा वाटतो. आकर्षणात आग्रह, हट्ट हा ठरलेला असतो. खऱ्या प्रेमात कोणत्याही  प्रकारचा आग्रह धरला जात नाही. इतके प्रेम त्यांचे समंजस आणि बळकट असते. 
           
                 प्रेमावर जितके बोलू तितके कमीच होईल. प्रत्येकाने प्रेम आणि आकर्षण यातील फरक जाणला तर प्रेम काय असते ते सहज उमजून जाईल. खऱ्या प्रेमाची अनुभूती माणूस घेत राहील.
                    
      

   सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 6 May 2022

प्रेम

पहिल्या प्रेमावर करण्यास भाष्य
नाही मी इतकी महान
प्रेम मग ते कोणाचे,
कोणावर जडलेले असो
असते मात्र छान .....

काय माराव्या इथे प्रेमाच्या गप्पा !
तो तर हृदयातील एक अनमोल कप्पा
कुपीत हृदयाच्या असे तो जतन
न फुललेल्या प्रेमाचा, असे तो एक टप्पा ....

पहिलं अन् दुसरं असं असतं का प्रेम?
माहित नाही मला तरी !
प्रेम हे प्रेमच असतं,
हीच आहे भावना खरी .....💞💞💞

सौ. राजश्री सुहास जाधव.

Monday, 2 May 2022

कदर असेल तिथेच व्यक्त व्हा




मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय

आजकाल विश्वास कोणावर ठेवावा, कोणावर ठेऊ नये हे समजत नाही. कोण कधी कसे वागेल ह्याचा नेम नाही. सोशल मीडियाच्या, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून खूप सारी नवीन नाती आपण जोडतो.  भले प्रत्यक्ष भेट होत नसली तरी आपणास ही नाती हवी हवीशी वाटतात. कधी कधी तर आपण अशा मैत्रीच्या इतके आहारी जातो की त्या व्यक्ती विषयी काहीही माहित नसताना आपण सगळे मनातील त्याच्या जवळ बोलून जातो.पण ती व्यक्ती खरोखर विश्वासास पात्र आहे का? याचा जराही विचार न करता मनातील भावना बोलून जातो अगदी डोळे झाकून. पण जर ती व्यक्ती फक्त आपल्याशी स्वार्थापोटी बोलत असेल तर अशा व्यक्तींकडून आपणास धोकाच
मिळू शकतो. आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन अशी व्यक्ती आपल्याला हवा तसा त्रास आपणास देऊ शकते आणि त्यातून नवीन संकट उभे राहू शकते कधी कधी तर गोष्टी अगदी हाताबाहेर जातात आणि नको ते माणूस करून  बसतो, परिणामी नाहक जीव गमवण्याचीही वेळ येऊ शकते.
        यासाठी मैत्री किंवा कोणतेही नाते तयार होत असताना माणसाने डोळे, डोके, मन जागेवर ठेऊन सर्व शहानिशा करूनच अशा नात्यांचा स्वीकार करावा. जिथे आपल्या मतांचा आदर केला जातो, उपेक्षा केली जात नाही, आपल्या भावनांची जिथे कदर असते, आपल्याला बोलण्याचे तिथं स्वातंत्र्य मिळते, काय चूक, काय वाईट हे एकमेकांस समजून सांगितले जाते, अशाच ठिकाणी खरे तर माणसाने व्यक्त झाले पाहिजे. 
          बऱ्याचवेळा असे आपल्या नातेवाईकांत किंवा मित्र परिवारात असे आढळते की मनात एकमेकांविषयी अजिबात आपुलकी नसते फक्त एक औपचारिकता म्हणून ही नाती असतात. तिथे नेहमी आपले अस्तित्व गौण असते. आपल्या म्हणण्यास काही किंमत नसते, कायम दुर्लक्षित राहतो. जरा पाठ फिरलीकी आपली निंदा नालस्ती त्यांच्या कडून होत असते. मग अशा ठिकाणी का राहायचे ? त्यापेक्षा एकटे राहिलेले काय वाईट !
            ज्या लोकांना आपल्या असण्याने आनंद होणार आहे, आपण चुकलो तर हक्काने आपल्याला जी माणसे समजावून सांगतात, आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची कायम तयारी असते, अशा ठिकाणीच
आपण खरे तर व्यक्त व्हावे , नाते निर्माण करावे. 

सौ. राजश्री सुहास जाधव.

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...