Monday, 31 January 2022

नंतर करील

नमस्ते बालमित्रांनो 🙏
आज जी गोष्ट तुमच्या वाचनासाठी घेऊन आले आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल. कारण गोष्टीतील मुलगा तुमच्याच वयाचा , चंचल असा आहे. पण त्याच्या सारखे तुम्ही वागायचे नाही बरं का ! चला तर मग वाचुया गोष्ट......
       अमित हा  शाळकरी मुलगा त्याचे आई, वडील आणि आजी आजोबांबरोबर  एका छोट्या शहरात राहत होता. एक जमेची बाजू म्हणजे, ते राहत असलेल्या सोसायटीच्या आजुबाजूस भरपूर अशी झाडे ,आणि जवळच सुंदर अशी बाग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असे. अमित नेहमी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत त्या बागेत खेळण्यासाठी जात असे. त्यामुळे तिथे येणारे लोकही अमितला ओळखू लागले होते.
        अभ्यासात अमित तसा बऱ्यापैकी हुशार होता. पण त्याला काही करायचे झाले की सुरवातीस अत्यंत कंटाळा यायचा. लगेच कोणत्याही गोष्टीला त्याच्याकडून होकार नसायचा. अगदी घरात जर आजीने त्याला काही काम सांगितले तर तो कधीच लवकर ऐकायचा नाही. आजीही मग त्याला जास्त काही सांगायची नाही.
     एकदा नेहमीप्रमाणे संध्याकाळी खेळण्यासाठी अमित आपल्या मित्रांबरोबर बागेत चाललेला असताना, आजी अमितला म्हणते ," अमित तू चाललास आहे तर येताना मेडिकल मधून गोळ्या आण , त्याची चिठ्ठी घे कारण तुझे पप्पा आज उशिरा घरी येणार आहे , तोपर्यंत मेडिकलचे दुकान बंद होईल." आजीचे म्हणणे ऐकल्यावर अमित आजीला म्हणतो, " अगं आजी आता राहू दे ती चिठ्ठी . मी नंतर तुला गोळ्या आणून देईल, आता मला खेळायचे आहे. मी जातो, "असे म्हणून ती औषधांची चिठ्ठी न घेताच अमित बाहेर निघून जातो. खेळण्याच्या नादात अमित गोळ्या आणायचे साफ विसरून जातो. एव्हाना दुकानेही सारी बंद झालेली असतात. अमितचे वडीलही त्यादिवशी खूप उशिरा घरी येतात. त्यामुळे आजीही काही बोलत नाही. अमितची आई तिच्या नातेवाईकांकडे गेलेली होती त्यामुळे तिलाही घरी येण्यास उशीरच झाल्याने आजीच्या ब्लडप्रेशर च्या गोळ्या काही आणल्या जात नाही
आणि या साऱ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आजीला  रात्री खूप त्रास झाल्याने तिला रात्रीतूनच दवाखान्यात हलवावे लागते. त्यादिवशी अमितचे वडील त्याच्यावर खूप चिडतात पण सर्व परिस्थिती पाहून ते त्याला काहीच बोलत नाही.
         ह्या गोष्टीला बरेच दिवस उलटून जातात. अमितच्या स्वभावात मात्र काहीच फरक पडलेला नसतो. तो अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी करण्यासाठीही नकार देत असतो. त्यामुळे घरातील सर्वांनाच अमितच्या ह्या वागण्याने चिंता वाटू लागते.
          एकदा शाळेतील महिन्याच्या मीटिंगमध्ये त्याची आई त्याच्या शिक्षकांजवळ ही गोष्ट मांडते. तेव्हा त्याचे शिक्षक अमितच्या आईला म्हणतात , " तुम्ही काळजी करू नका, अमितला लवकरच त्याची चूक लक्षात येईल आणि तो पुन्हा असे वागणार नाही.
         शाळेतून घरी आल्यानंतर अमितला नेहमीप्रमाणे नाष्टा करून बागेत जायचे असते. तो पटकन हातपाय तोंड धुऊन थोडेसे खाऊन त्याच्या मित्राकडे विनितकडे जातो आणि त्याला बागेत खेळण्यासाठी हाक मारतो पण विनीत त्याला ' मी आता येणार नाही, नंतर येईल ', असे सांगतो. त्यामुळे अमितला एकट्यालाच बागेत जावे लागते. मित्र बरोबर खेळण्यास नसल्याने अमित त्यादिवशी लवकर घरी येतो. तो नेहमीप्रमाणे आजीला रात्री गोष्ट सांग, असे म्हणतो पण आजी काही त्याला गोष्ट सांगत नाही. ती त्याला ' उद्या सांगेल ' असे म्हणते. त्यामुळे अमित खूप नाराज होतो. आज काहीच त्याच्या मनाप्रमाणे घडलेले नसते.
           शाळेत आज चित्रकला स्पर्धेचा निकाल त्यांचे शिक्षक जाहीर करणार असतात. त्यामुळे आज स्वारी खूप खूश असते कारण अमितची चित्रकला ही खूपच सुदंर होती. दरवर्षी स्पर्धेत त्याला बक्षीस हमखास ठरलेले असायचे. म्हणून लवकर आवरून अमित शाळेत येतो. वर्ग भरून शिक्षक शिकवण्यास सुरुवात करतात पण आमितचे लक्ष त्यांच्या शिकवण्याकडे अजिबात नसते.
चित्रकलेचा निकाल सर कधी सांगतील , असे त्याला झालेले असते. धडा शिकवून झाल्यावर शिक्षक
चित्रकलेचा निकाल सांगू लागतात. अमित कान देऊन ऐकू लागतो. त्याचे शिक्षक पाहिला नंबर ज्याचा आला त्याचे नाव जाहीर करतात. बाकीचे नंबर उद्या सांगेल असे म्हणून ते ऑफिस मध्ये निघून जातात.
         एव्हाना मधली सुट्टी झालेली असते. अमितच्या उत्साहावर पाणी पडलेले असते. त्याला चित्रकलेचा
निकाल न समजल्याने फार वाईट वाटते. तो सारा धीर एकटवून ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या शिक्षकांना
चित्रकलेच्या निकालाबाबत विचारणा करतो तेव्हा त्याचे वर्गशिक्षक त्याला म्हणतात , " अमित तुला निकाल
समजला नाही म्हणून तू इतका बैचेन आहे, वाईट वाटत आहे पण तू इतरांनी काही तुला विचारल्यावर तू केव्हा
तरी त्यांचे म्हणणे ऐकतो का ? कोणतेही काम किंवा एखादी गोष्ट तुला सांगितल्यावर तू कधीच लवकर होकार
देत नाही, नंतर करील असेच तुझे उत्तर असते आणि या गोष्टीचा घरातील तुझ्या माणसांना आणि इतरांनाही
त्रास होतो, वाईट वाटू शकते , हे तुला कळतच नाही. आज मी मुद्दाम चित्रकलेचा निकाल पूर्ण सांगितला नाही.
हे तुला समजले का? " वर्ग शिक्षकांच्या अशा बोलण्याने अमितला त्याची चूक लक्षात येते. तो त्यांना म्हणतो, "
सर मी पुन्हा असे वागणार नाही. कधीच सांगितलेल्या कामाचा कंटाळा करणार नाही . ' नंतर करील ' असे
म्हणणार नाही." एवढे बोलून अमित वर्गात निघून जातो. त्याचे वर्गशिक्षक शाळा भरल्यानंतर चित्रकलेचा
निकाल सांगतात. अमितचा चित्रकला स्पर्धेत २ रा नंबर आलेला असतो. अमित ही आनंदाची बातमी आपल्या
घरी सांगतो. त्याचे सर्वजण खूप कौतुक करतात. त्यादिवशी त्याची आजी रात्री त्याला एक सुंदर गोष्टही सांगते. ती ऐकता ऐकताच अमित गाढ झोपी जातो.
         त्यानंतर अमित पुन्हा कधीच कोणत्याही गोष्टीकरिता  ' नंतर करील ' असे म्हणत नाही.
          मुलांनो, तुम्हीही तुमचा आळस नक्की सोडणार ना ! 'नंतर करील ' असे म्हणणार नाही ना !

सौ. राजश्री सुहास जाधव.

        





     


Thursday, 27 January 2022

पुस्तक परी



NGO मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ' पुस्तक परी ' म्हणून काम करत असताना, त्या वर सुचलेली माझी ही कविता नक्की वाचा.

     पुस्तक परी

प्रत्येक मूल लाख मोलाचे
ठेऊनी जाण मनी
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टीचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||
श्रवण, वाचन, लेखन, संभाषण
साऱ्या आहेत या भाषेच्या क्षमता
त्याकरिता घेऊनी आलो आम्ही
उपक्रमात विविधता.
गाणी, गोष्टी ऐकताना मुले होतात दंग
इयत्तेनुसार दिलेल्या चित्रांत लिलया भरतात रंग.
मुळाक्षरे ते जोडाक्षरे; खडतर असली वाट जरी
अखेर गाठणार आम्ही यशाची पायरी.
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टीचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||
वाचनस्पर्धा, कथाकथनातून
मुलांतील सुप्त गुणांना मिळतो वाव
जोडीला घेतला जातो उपक्रम जोडाक्षर सराव.
प्रवाहात शिक्षणाच्या यावे प्रत्येक मूल
ठेऊनी आस ही उरी
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टींचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||

सौ.राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 25 January 2022

कलाकार सारे ...



आयुष्याच्या  रंगमंचावरचे,
आहोत आपण सारे कलाकार
वठवाव्या लागतात भूमिका तिथे
देई विधाता, जो त्यास आकार ....

समरस होऊनी भूमिकेत त्या,
कराव्या लागतात साकार
सुख असो वा दुःख
लीलया कराव्या लागतात पार ....

कोणास कशा, कोणास कुठल्या ?
भुमिका ठरवणारे आपण नसतो कोणी,
जे जे असेल आपुल्या हातात
करावे इमानेइतबारे, न ठेवता असूया मनी ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


आनंदाचं झाड



झाड, लावीन मी आनंदाचं झाड
जपेल त्यास मी अलवार
रूजवेल त्यात बीज नात्यांचं,
येईल बहरुनी ते डेरेदार ....

आनंदाच्या झाडास या,
घालीन मी प्रेमाचं खतपाणी
ठेवीन गुंफुणी नात्यांना या,
करीन सदैव मधाळ ती वाणी ....

करण्यास आनंद तो द्विगुणित
राहिन सदैव मी प्रफुल्लीत,
अनुभवण्या परस्परांसवे सोहळे आनंदाचे
जाईन मी आनंद तो पखरीत ....

आनंद द्यावा, आनंद घ्यावा
ना ठेवावा कदापि द्वेषभाव
गाठण्यास अनुभूती परमानंदाची,
घ्यावा लागेल आनंदाचा ठाव ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 23 January 2022

दृढ विश्वास...



असेल जर मनात जागा खास
ढळत नाही कदापि विश्वास
दर्पणासम नाजूक तो
ठेवावा जपुनी त्यास ....

न व्हावा भग्न तो दर्पण
भग्न त्या तुकड्यांसम
तुटलेल्या भरवश्यासही
न मिळे कसलेही समर्थन ....

विश्वासास ठरे तोच खरा  पात्र
जो घेई समजून आपणास
येऊ दे कितीही अडचणी जीवनात
जाऊ देणार नाही  तडा  आपुल्या मनास ...

भग्न त्या दर्पणाचे छिन्नविछिन्न ते तुकडे,
जोडता ते घायाळ करी बोटांना
तुटलेला भरवसा तो
घायाळ करी माणसांना ....

ठेवावा दृढ विश्वास मनात
नात्यांना नवसंजीवनी देण्यास
करावा सातत्याने हा प्रयास
ठेवावा विश्वास विनासायास....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 22 January 2022

आनंदी कावळा



नमस्कार🙏
प्रिय बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एका कावळ्याची गोष्ट वाचण्यास घेऊन आले आहे.नेहमीची तहानलेल्या कावळ्याची गोष्ट नाही आहे बरं का...मी ऐकलेली ही गोष्ट कोणी लिहिली ठाऊक नाही पण तुम्हा मुलांना नक्की आवडेल. चला तर मग वाचूया गोष्ट....

आनंदी कावळा

एका मोठ्या जंगलामध्ये  एका मोठ्या वडाच्या झाडावर एक कावळा राहत होता.उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे वातावरणही खूप गरम होते. अशा कडक उन्हात कावळा पाण्यासाठी भटकत होता, पण त्याला कुठेच पाणी पिण्यास मिळत नाही. तहानेने व्याकुळ झालेला कावळा शेवटी नाईलाजाने पुन्हा झाडावर येऊन बसतो.
         त्याच वेळेस जंगल वाटेने चालत जात असलेल्या २-३ स्त्रिया कावळ्याला दिसतात. त्या स्त्रियांच्या डोक्यावर पाण्याचे भरलेले घडे ही त्याला दिसतात. ते
पाहून कावळा खूप खूश होतो आणि उडत जाऊन तो त्या स्त्रियांच्या डोक्यावरील घड्यातील पाणी पिण्यासाठी आपली चोच बुडवतो. त्या स्त्रियांच्या हे लक्षात येताच त्या घड्यातील पाणी फेकून देतात व पुन्हा पाणी आणण्यास जातात. त्या स्त्रिया त्याच वाटेने पुन्हा पाणी घेऊन चाललेल्या असतात तेव्हा कावळा पुन्हा त्यांच्या घड्यामध्ये पाणी पिण्यासाठी आपली चोच बुडवतो. आता मात्र  त्या स्त्रियांना  कावळ्याचा खूप राग येतो.
        त्या स्त्रिया कावळ्याची तक्रार घेऊन त्यांच्या राज्यातील राजाकडे येतात आणि म्हणतात," महाराज, जंगलातील एक कावळा आम्हाला रोज त्रास देतो,
आमच्या पाण्याच्या घड्यामध्ये तो चोच बुडवतो व सगळे पाणी खराब करतो. तुम्ही त्या कावळ्याला पकडून त्याला चांगली अद्दल घडवा ". त्या स्त्रियांची तक्रार ऐकून महाराज त्याच्या शिपायांना आज्ञा करतात," शिपायांनो, तुम्ही आत्ताच्या आत्ता जंगलामध्ये जा आणि ताबडतोब त्या कावळ्यास पकडून माझ्या समोर हजर करा ".
         राजाने दिलेल्या आज्ञेनुसार शिपाई जंगलामध्ये जाऊन त्या कावळ्याचा शोध घेतात आणि त्याला पकडून राजासमोर हजर करतात. कावळा मात्र अजिबात घाबरत नाही. त्यामुळे राजाला खूप राग येतो व तो कावळ्यास
म्हणतो, " थांब तुला चांगली अद्दल घडवतो."राजा शिपायांना हुकूम सोडतो ," शिपायांनो तुम्ही ह्या कावळ्याला उचलून खोल चिखलात, दलदलीत फेकून द्या म्हणजे त्याला चांगली अद्दल घडेल ".
      शिपाई त्या कावळ्यास पकडून चिखलात, दलदलीत फेकून देतात पण कावळ्याला अजिबात वाईट वाटत नाही उलट तो गाणे गुणगुणू लागतो,' घसरगुंडी खेळू या रे बाबा घसरगुंडी खेळूया..'   शिपायांना कावळ्याचे खूप आश्चर्य वाटते. ते कावळ्याला पकडून पुन्हा महाराजांसमोर हजर करतात आणि म्हणतात, "महाराज हा कावळा तर खूप आनंदी दिसतो त्याला तुम्ही दिलेल्या शिक्षेचे अजिबात वाईट वाटत नाही. उलट तो कावळा आनंदाने गाणे म्हणत आहे,'घसरगुंडी खेळुया रे बाबा घसरगुंडी खेळुया...'.
         यावर राजाला खूप चीड येते व तो शिपायांना आज्ञा करतो की, " या कावळ्याला तुम्ही आपल्या गुळाच्या गोदामात बंदिस्त करा म्हणजे तेथील मुंगळे ह्याला चावतील आणि कावळ्याचा चांगली अद्दल घडेल " .
शिपाई मग त्या कावळ्यास गुळाच्या गोदामात बंदिस्त करतात. शिपाई दुरून त्या कावळ्यावर नजर ठेवतात तेव्हा  त्यांच्या असे लक्षात येते की कावळा पुन्हा आनंदाने गाणे म्हणत आहे,'गुळाचे खडे खाऊ या रे बाबा
गुळाचे खडे खाऊन या...'. शिपायांना त्या कावळ्याचा अत्यंत राग येतो ते कावळ्यास धरून पुन्हा महाराजांसमोर हजर करतात व सांगतात, "महाराज ह्या कावळ्यावर दिलेल्या शिक्षेचा काहीच परिणाम होत नाही तो आनंदीच
दिसतो आहे".
        राजा खूप विचार करतो आणि मनात म्हणतो  की, ह्याला काय बरे शिक्षा करावी म्हणजे त्यास चांगली अद्दल घडेल. मग खूप विचार करून राजा शिपायांस आज्ञा करतो की, "शिपायांनो तुम्ही या कावळ्याला उचलून
तेलाच्या खाणीत टाकून द्या ". शिपाई राजाच्या आज्ञेनुसार कावळ्यास तेलाच्या खाणीत फेकून देतात. कावळा तेथेही गाणे म्हणू लागतो,' कानात तेल टाकुया रे बाबा कानात तेल टाकुया...' शिपाई पुन्हा त्या कावळ्याला राजासमोर हजर करतात व काय झाले ते सांगतात. 
       राजचा आता धीर सुटतो तो शिपायांना सांगतो की, "तुम्ही त्या कावळ्याला एखाद्या घराच्या छपरावर बांधून ठेवा म्हणजे उन्हामुळे तो चागला भाजून निघेल
व  त्याला कायमची अद्दल घडेल." शिपाई त्याप्रमाणे कावळ्यास एका घराच्या छप्परावर बांधून ठेवतात पण कावळ्याला काहीच फरक पडत नाही एवढ्या
कडक उन्हातही तो गाणे गुणगुणू लागतो, ' छपपराने अंग शेकुया रे बाबा छप्पराने अंग शेकुया...'
          शेवटी शिपाई वैतागून त्या कावळ्याला खाली आणतात व महाराजांस झाला प्रकार सांगतात. त्या कावळ्यापुढे महाराजही हतबल होतात आणि त्याला म्हणतात, " तुला मी एवढ्या शिक्षा केल्या तरीही तू इतका आनंदी कसा?" त्यावर तो कावळा म्हणतो,  "महाराज काय सांगू, मला खूप तहान लागलेली होती पण कुठेही मला पिण्यास पाणी मिळाले नाही. त्या स्त्रियांच्या डोक्यावरील घड्यातले पाणी बघून मला राहवले नाही. मी त्यामध्ये चोच बुडवून माझी तहान भागवली आणि तृप्त झालो म्हणून मी आनंदी आहे ".
       कावळ्याच्या या उत्तराने महाराज खूप खूश होतात. ते कावळ्याला सोडून देतात व म्हणतात," माझ्या  राजवाड्यासमोर एक मोठा हौद आहे तुला जेव्हा कधी तहान लागेल तेव्हा तू तेथील पाणी पिऊ शकतोस. तुला कोणीही अडवणार नाही ". त्या दिवसापासून त्या हौदातील पाणी प्राणी - पक्ष्यांसाठी वापरले जाऊ लागते.
कावळाही आनंदाने पुन्हा जंगलात निघून जातो.


Thursday, 20 January 2022

माझी शाळा



माझी शाळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा आणि सुखद आठवणींचा कप्पा. जो प्रत्येकाच्या हृदयात हळुवारपणे जपलेला असतो.
       माझ्याही शाळेबाबतीत खूप रम्या आठवणी आहेत. त्यांची आठवण होताच पुन्हा शाळेत जावेसे वाटते. ती अनुभूती पुन्हा नव्याने घ्यावीशी वाटते.
              ही आवडते मज मनापासुनी शाळा |
              लाविते लळा ही, जसा माऊली बाळा
ह्या प्र.  के. अत्र्यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी खरोखर खूप अर्थपूर्ण आहे. प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात हा सुखद अनुभव घेतलाच असेल.
        माझे शालेय शिक्षण तीन टप्प्यात झाले, ते म्हणजे पहिली ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते दहावी. तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यातील चौथी ते सातवी इयत्तेत शिक्षण घेत असतानाच्या
आठवणी अजूनही मी हृदयात जपून ठेवल्या आहेत. निखळ आनंददायी शिक्षण मला या शाळेतून मिळाले. मी जाऊन माझ्या या शाळेमुळे अनेक विद्यार्थी घडले.
कै. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर,  विद्यानिकेतन, शाळा क्रमांक 2 मंगळवार पेठ, बारणे रोड, पुणे हा माझ्या शाळेचा पत्ता आणि नाव.
       तिसरीतून चौथी इयत्तेत हुशार विद्यार्थ्यांना या शाळेत घातले जात असे. ही माझी शाळा घरापासून लांब होती. त्याकरिता दोन बस बदलून शाळेत जावे लागत होते. सुरुवातीस माझे पालक मला ह्या शाळेत घालण्यास तयारच नव्हते पण आमच्या शेजारील मुलगी त्याच शाळेत सातवी इयत्तेत शिकत होती. तिने माझ्या
आई-वडिलांना सांगितले होते की,'मी राजश्रीला रोज शाळेत घेऊन जाईल व तिच्याकडे नीट लक्ष देईन.' मी ही त्याच शाळेत जाण्याचा खूप हट्ट धरला होता. तेव्हा कुठे माझे आई-वडील या शाळेत मला पाठवण्यास तयार झाले
       सुरुवातीस मी खूप गांगरून गेले होते. माझ्यासाठी शाळा व वर्गातील मुली-मुले सर्व अनोळखी होते. पण हळूहळू माझी वर्गातील सर्व मुली मुलांबरोबर गट्टी जमली चौथी ते सातवी मी 'अ' तुकडीतच होते. शाळा कधी आपली झाली हे माझे मलाच कळले नाही.
       आमच्या वर्गात व इतर वर्गातही मुलींच्या मानाने मुले जास्त होती. कधीकधी वर्गशिक्षक शिकवताना एकमेकांशी बोलू नये म्हणून मुलगा व मुलीस एका बेंचवर बसवत असे. त्यामुळे शिकवताना कोणीही आपापसात बोलत नसे. मुलांनी वर्गात गोंधळ घातला की मॉनिटर मुला-मुलींची नावे फळ्यावर लिहीत व शिक्षक आल्यावर त्यांना ती नावे दाखवीत पण स्वतःच्या मित्राचे नाव मात्र मॉनिटर फळ्यावर लिहीत नसे तेव्हा सर्वजण त्याच्याशी खूप भांडायचे. काही वेळानंतर विसरूनही जायचे.
        मधली सुट्टी  आम्हा सर्वांचीच आवडती होती. सर्वजण शाळेच्या पटांगणावर आपापल्या मित्र- मैत्रिणींसोबत डबा खाण्यास बसत असे. माझ्या एका मैत्रिणीचे हॉटेल असल्याने ती डब्यात नेहमी उडीद वडा, बटाटेवडा असे प्रकार आणायची. तिचा डबा ती आम्हाला खाण्यास द्यायची व आमचा डबा ती खायची. डबा लवकर संपवून खेळण्यासाठी आम्ही खूप अधीर असायचो.
आम्ही शाळेच्या स्टेजवर कधीकधी लंगडी पाणी, रुमाल पाणी असे खेळ खेळायचो. मुले झाडाच्या शेंगांचा चेंडू तयार करून त्या चेंडूने क्रिकेट नाहीतर चेंडू झेलणे हा खेळ खेळत. अशा या शाळेच्या सुखद आठवणी अजूनही मनात कोरल्या गेल्या आहेत.
        आमच्या शाळेच्या आजूबाजूने भरपूर अशी अशोकाची व इतर पावसाळी झाडे ही होती. हिरव्यागार
अशा झाडांनी वेढल्याने शाळेच्या सौंदर्यात भर पडली होती. आमच्या शाळेच्या आवारात निलगिरीचे एक मोठे  झाडही होते. त्या झाडाच्या गळून पडलेल्या टोप्या एकात एक गुंफून आम्ही मुली गजरा म्हणून केसांत माळत असू. त्या निलगिरीचा सुगंध मनास मोहवून टाकणारा होता. त्यामुळे मला म्हणावेसे वाटते की,' अजुनही स्मृतींना गंध आहे मातीशी एकरूप झालेल्या त्या इवल्याशा निलगिरीचा '.
         शाळेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे गुरुजन. शाळेतील सर्व शिक्षक हे अतिशय मनमिळाऊ,
हसत खेळत मुलांना शिक्षण देणारे असे होते. शाळेमध्ये रोज नियमाने परिपाठ घेतला जात असे व प्रत्येकास त्यात
सहभाग घेण्याची संधी शिक्षक देत असे. परिपाठात रोजचे पंचांग, सुविचार, एखादी गोष्ट, प्रार्थना मुले पुढे येऊन
म्हणत असे. त्यामुळे आम्हा मुलांमध्ये सभाधीटपणा निर्माण होण्यास मदत होत असे. प्रत्येक वारांच्या वेगवेगळ्या प्रार्थना शाळेत घेत असे.कोणाचाही वाढदिवस असला की संपूर्ण शाळेतील मुलांसमोर परिपाठाच्या वेळेस त्या मुलास स्टेजवर बोलावून सर्व शिक्षक त्यास आशीर्वाद देत असे व इतर मुलांना टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन करण्यास सांगत असे. माझ्या जन्मदिनीही हा सुखद अनुभव मी शाळेत असताना दर वर्षी घेत होते. वर्गामध्ये लावलेले साहित्यांचे तक्ते, व्याकरणावर आधारित तक्ते, पाढयांचे तक्ते हे मला मुखोद्गत झाले होते.
        १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या विशेष दिनांकरिता शाळेत शिक्षक कवायतीची आमच्याकडून छान तयारी करून घेत असे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये भाग घेण्यास शिक्षक मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असे. विविध स्पर्धाही शाळेत घेतल्या जात असे. योगासन, सूर्यनमस्कार,लेझीम, बँड, लंगडी, खोखो यांचा सराव शिक्षक नेहमी मुलांकडून करून घेत असे. त्याप्रमाणेच कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समरगीत स्पर्धा, वाचन स्पर्धा अशा सर्व गुणात्मक स्पर्धांसाठी शाळेतील शिक्षक मुलांना नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करीत असत. मला स्वतःला योगासन व सूर्यनमस्कार घालणे, याची विशेष आवड होती. तसेच बँड पथकात आम्हाला शिक्षक ढोल, बासरी वाजवण्याचेही प्रशिक्षण देत असत. स्पर्धेसाठी कधीकधी दुसऱ्या शाळेत शिक्षक आम्हाला नेत असे. त्यावेळेस मनामध्ये आपलीच  शाळा जिंकावी ही भावना कायम असे व आम्ही सर्व मुली मुले एकजुटीने स्पर्धेत भाग घेत असू.  शाळेत असताना मी एकदा गांधीजींवर भाषणही  केले होते तेव्हा शिक्षकांनी खूप कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यावेळेस मी खूपच भारावून गेले होते.
         शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला शाळेचे गणवेश, बूट, कंपास सर्व मोफत मिळत असे आणि बसच्या पासचे पैसेदेखील परत मिळत असे.
         सातवी इयत्ता म्हणजे शाळेतील शेवटचे वर्ष. वर्षाखेरीस सातवीतील मुला-मुलींसाठी निरोप समारंभ शिक्षक आयोजित करत असे. आम्हा मुलांना त्या निरोप समारंभात जेवण देऊन मुलांना स्मरणिका लिहिण्यास सांगत असे. आम्ही सर्वांनी स्मरणिकेत आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. भविष्यात काय बनायचे आहे तेही त्या स्मरणिकेत लिहिले होते. शाळेचा व सर्व शिक्षकांचा निरोप घेताना आम्हा मुलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. माझ्या या विद्यानिकेतन शाळेस मी या जन्मी तरी विसरणे अशक्य आहे. 
        मला सांगण्यास आनंद होतो की, आमची १९८२ ते १९८६ सालची इयत्ता चौथी ते सातवीची बॅच जवळजवळ ३३ वर्षांनी काही मित्र-मैत्रिणींच्या परिश्रमाने पुन्हा व्हाट्स अप ग्रुप माध्यमातून एकत्र आली आहे. जवळ जवळ ५७ जणांचा आमचा ग्रुप आहे. ग्रुपमधील मित्र मैत्रिणी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मला सांगण्यास अभिमान वाटतो की, ग्रुपमध्ये काही शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ,  बँक अधिकारी, व्यावसायिक, वरिष्ठ पोलीस अधिकारी असे विविध गुणवत्तेचे मित्र व मैत्रिणी मला लाभल्या आहे शाळेमुळेच आम्हाला चांगले संस्कार मिळाले आहे. शाळेतील शिक्षकांनी आम्हास घडवले आहे. मी सुद्धा गेली बारा वर्षे एनजीओ मार्फत शाळेतील मुलांबरोबर काम करत आहे. त्यामुळे शाळेशी माझा ऋणानुबंध  दृढ आहे.
         शाळेच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी दोन वेळेस गेट-टुगेदर चे आयोजन केले होते. त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक श्री. मेवेकरी सर, श्री. किसन पांडुरंग चौधरी सर,  चित्रकलेचे शिक्षक श्री.चौधरी सर,आमच्या वर्ग शिक्षिका सौ. बोर्ले मॅडम यांचा आम्ही सत्कार केला होता.सर्व शिक्षकांनी आम्हाला त्यावेळेस मोलाचे मार्गदर्शन दिले होते. आमचे किसन पांडुरंग चौधरी सर हे 'माऊली सेवा संस्था' मु.पो. पिंपरी पेंढार, तालुका-जुन्नर येथे अध्यक्ष संस्थापक आहेत व ते एक उत्तम प्रवचनकार आहेत.
        आम्ही सर्व मित्र मैत्रिणी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा काहींना तर मी अजिबात ओळखले नव्हते. बालपणीची प्रतिमाच डोळ्यांत असल्याने आता इतक्या वर्षानंतर ओळखणे अवघड होते. मलाही काहींनी ओळखले नव्हते. पण काही मित्र-मैत्रिणी अगदी बालपणी दिसायच्या तशाच दिसत होत्या. सर्वांच्याच चेहऱ्यावर मित्र मैत्रिणी व शिक्षकांना भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाने स्वतःविषयी सांगितल्यानंतर एकमेकांची ओळख पटली. आम्ही रोज जसा वेळ मिळेल तसा एकमेकांशी फोन वरून, व्हाट्सअप ग्रुप वरून संवाद साधतो. एकमेकांशी चर्चा करतो, सर्वांच्या सुख - दुःखात सहभागी होतो, एकमेकांचे मार्गदर्शन घेतो. याचे सर्व श्रेय माझ्या शाळेस व शिक्षकांना जाते. आज त्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि एकत्र आहोत.

सौ. राजश्री सुहास जाधव.




Monday, 17 January 2022

गझल :१३



वीर लक्ष्मी वृत्त , लगावली : गालगा × ३ ,मात्रा:- १५

आस ही या मनी जागते
दाद तू का कुणा मागते ....

सोसले भार हे केवढे
वेदना आजही डागते....

शब्द हे वैखरी बोलके
काअसे आंतरी लागते ....

तृप्त मी आज या जीवनी
भूक ही ना तरी भागते ....

चांदणी अंगणी हासता
धुंद का मी पुन्हा वागते ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


घडायचं ते घडतच असतं...

एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर आपल्या तोंडून सहज हे शब्द उच्चारले जातात. ' हे वेळेवर घडायला हवं होतं, किंवा उशिरा का होईना आपल्याला कळायला हवं होतं '. खरे तर असे वक्तव्य
करून काहीही उपयोग होणार नसतो तरीही माणूस
असे बोलून स्वतःचे समर्थन करत असतो .
         जन्मास येणे आणि जाणे , हे जसे आपल्या हातात
नसते तसे घडणाऱ्या गोष्टी ह्या घडत असतात. त्याला आपण कोणीच रोखू शकत नाही. फक्त आपण प्रामाणिक
पणे आपल्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कठोर
प्रयत्न केले पाहिजे. एक ना एक दिवस गोष्टी आपल्या मनासारख्या नक्कीच घडत जातील. उशिरा का होईना
आपल्या प्रयत्नांना यशही मिळेल . जर नाही मनासारखे
काही घडले तर खचून न जाता , ते माझ्यासाठी नव्हतेच असे समजून पुन्हा वेगवेगळ्या वाटा शोधा. एक वाट जरी
बंद झाली तरी दुसऱ्या अनेक वाटा आपल्यासाठी खुल्या
असतात. फक्त कशाप्रकारे वाटचाल करावी हे आपण
मनाशी पक्के केले पाहिजे.
       अगदी सांगायचे झाले तर आपल्या  प्रेमभावना जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगणे हे काही ना काही कारणामुळे राहून जाते. मनातल्या गोष्टी मनातच राहतात.
पुढे  काळ जसा सरकतो तसा ती व्यक्तीही आपल्या पासून दूर गेलेली असते आणि आपणही आपल्या दुनियेत
रमून गेलेलो असतो. तेव्हा दोघांचे आयुष्य काही थांबलेले
नसते. ते त्याच्या त्याच्या परीने सुरळीत चालू असते आणि
अचानक एके दिवशी जर दोघांची भेट झाली तर पुन्हा त्या
भावना, आठवणी जागृत होतात , मन कुठे तरी म्हणत असते की ,' माझे प्रेम तुला कळायला हवं होतं ' .
        ह्या गोष्टीचा विचार करून खरे तर काहीच उपयोग
नसतो कारण आता त्यात बदल घडणे शक्य नसते. इतके
दिवस  आपण सुखीच आयुष्य जगत असतो ना ! मग वाईट वाटून घेण्यात काहीच अर्थ उरत नाही.
        जे घडायचं असतं ते घडणारच असतं, जरी कळलं तरी त्यातून साध्य ते काय होणार असतं ?  हे लक्षात ठेवले तर माणूस त्यातच गुरफटून जाणार नाही.

सौ. राजश्री सुहास जाधव.
  


Saturday, 15 January 2022

व्हावं कधी तरी उनाड ....

   


    

  'उनाड' म्हणजे कसलेच बंधन नसलेला, स्वैर, स्वतःच्याच धुंदीत जगणारा, असा त्याचा अर्थ होतो. उनाड हे विशेषण आपण माणसाला, त्याच्या मनासही  लावतो. एवढेच काय ! पण कवी मनाला पावसामध्ये, वाऱ्या मध्ये, रात्रीमध्ये, पाखरामध्ये, प्राण्यांमध्येही हे उनाडपण दिसून येते आणि त्यावर त्याला अप्रतिम कविता सुचतात. त्याला तो शब्द अगदी जवळचा वाटतो.
             पण माणसाच्या अंगात जर उनाडपण दिसले की मग नाक मुरडले जाते. बालपणी जर एखादं मूल उनाड असलं तर आईवडील त्याला प्रेमाने नाही तर रागाने प्रसंगी धाक दाखवून त्याचा उनाडपणा थोपवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या बालवयात त्याला कसलीच जाण नसते. त्यामुळे तेथे आई-वडिलांचे थोपवणे हे गरजेचेच असते.
          प्रत्येक व्यक्तीत एक छोटे मूल, उनाडपण दडलेले असते. पण वयापरत्वे ते तो कधी दाखवत नाही. त्याच्यावरील संस्कार त्याला तसे करू देत नाही.  'आपण जर असे उनाड वागलो तर लोक काय म्हणतील!' ह्या विचाराने ती व्यक्ती सतत धीर-गंभीर चेहऱ्यानेच वावरत असते. परिणामी त्याच्या आजूबाजूचे वातावरणही खेळीमेळीचे राहत नाही. जीवन अगदी यंत्रवत होऊन जाते.
          सतत डोक्यावर कसला तरी भार घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ? माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी तरी तो मनाने तितकाच तरुण असतो. म्हणून बघावं कधीतरी उनाडासारखं जगून. आपल्याला जे हवे ते पाहावे मनसोक्त करून. कसलेच बंधन न बाळगता स्वच्छंद जगावं, मित्र-मैत्रिणींसमवेत धमाल मजामस्ती करावी, मंत्रमुग्ध करणारं संगीत ऐकावं, निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करावी, मस्त खावं, हसावं, नाचावं, आपली गुपितं एकमेकांना सांगावी आणि मनसोक्त जगावं.
        एकदा तरी जीवनात असे उनाडपणे जगून पाहा मग बघा मनात कशी स्फूर्ती संचारेल ! जीवन आणखीन
सुखकर बनवण्यास आपल्यात उत्साह निर्माण होईल. जीवनास नवी दिशा प्राप्त होईल.

सौ. राजश्री सुहास जाधव.



         
        


Thursday, 13 January 2022

सौंदर्याचा शोध ....



सौंदर्याचा प्रवास सुरू होतो,
हृदयाकडून हृदयात ,
जाणतो तेव्हाच खरे,
सौंदर्य दडले आहे कशात? ...

बाह्य सौंदर्य हे काय कामाचे ?
जर हृदयच नसेल ते प्रेमाचे
सौंदर्याचा बहर जातो ओसरून
परी सुंदर, निरागस मन ते
निरंतर  तसेच राहते बहरून ....

शोधले सौंदर्य तर गवसेल सहज
त्यासाठी लागते तशा दृष्टीची गरज
सौंदर्य दडले आहे आपुल्या मनात,
अन् त्याकरिता हवा आत्मविश्वास
जो करील आपुल्या सौंदर्याचा विकास ....

सौंदर्य म्हणजे नाही नुसतेच देखणे
प्रेमाने बोलणे, कामात झोकून देणे,
एकमेकांना समजून घेणे, अंतर्मन शुद्ध असणे
आहेत ही सारी सौंदर्याची लक्षणे ....

ह्या साऱ्या गुणांनी असेल जो परिपूर्ण
तिथेच होईल शोध सौंदर्याचा पूर्ण
अंतरंग सुंदर तो खरा सुंदर
करावी ह्याच सौंदर्याची  खरी कदर ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


खरी सुंदरता


वरवर पाहता सौंदर्यांची व्याख्या म्हणजे  ' गौरवर्ण, सुंदर मुखडा, कमनीय बांधा, सुंदर घारे डोळे ' साधारण हेच समाजात वावरताना गृहीत धरले जाते . आपणास कोणी
सुंदर म्हटले तर ते कोणाला आवडणार नाही. परंतु सुंदर दिसणे आणि सुंदर असणे ह्यात खूप फरक आहे.
      
बाह्य सौंदर्याला भुलून बरेच वेळा माणसाच्या पदरी निराशाच येते. कारण एखादी स्त्री खूप सुंदर असेल किंवा एखादा पुरुष, हो एखादा पुरुष खूप सुंदर असेल ( सौंदर्य फक्त स्त्री पुरते विशेषण आहे का , पुरुषही राजबिंडा ,सुंदर असतोच की ! )  तो दिसण्यास सुंदर असेल पण त्याचे  चारित्र्य हे वाईट असेल म्हणजे तो व्यभिचारी असेल  तर त्या सौंदर्याचा काय उपयोग?
तसेच जी स्त्री जर कपटी, कारस्थानी असेल तर ती कितीही सुंदर असली तरी तिच्या त्या सौंदर्याला काहीच
अर्थ उरत नाही. 
      खरे सौंदर्य शोधले तर अगदी कशात ही दिसेल. फक्त ते दिसण्यासाठी तशी नजर हवी. सौंदर्य तर आपल्या  सभोवतालचा परिसर रोज स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांच्या हातात असते, सौंदर्य तर कुंभार जेव्हा मातीला आकार देऊन सुबक असे घडे, पणत्या आणखी सुंदर अशा वस्तू बनवतो , तेव्हा खरे सौंदर्य तर त्याच्या हातात असते. 
एक शिक्षक जेव्हा आपल्या  विद्यार्थ्यास जितक्या तळमळीने शिकवत असतात , घडवत असतात ,त्या
शिक्षका मध्ये हे कलेचे सौंदर्य दडलेले असते  कारण शिकवणे ही सुद्धा एक कला आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात खरे सौंदर्य आहे. प्रेमाने खाऊ
घालणाऱ्या मातेच्या वात्सल्यात  आपणास सुंदरता सहज दिसून येईल .
     
  बाह्य सौंदर्य हे काळानुसार ओसरते. पण हृदय आपले जर निर्मळ,प्रेमळ, मन निरागस असेल तर ते खरे
सौंदर्य आणि तेच निरंतर राहते.  अंतरंग सुंदर असेल तर ती सुंदरता खरी होय. जिथे कायम मधुर वाणी , मितभाषी , परोपकार यांचे  वास्तव्य असते आणि ते परिपूर्ण असे सौंदर्य  म्हणता येईल.

         जेव्हा आपल्याला आपल्यातील हे सौंदर्य गवसेल तेव्हा खरा आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन
बदलेल आणि खऱ्या अर्थाने आपला  जीवन प्रवास सुरू होईल .

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 7 January 2022

मुक्त करावे मन...



समोरच्याची नसते कुवत
जेव्हा समजून घेण्याची,
तेव्हा नसते गरज काहीच बोलण्याची
ती जागाही नसते मन मोकळं करण्याची 

बोलावे तिथे, जिथे असते
आपल्या बोलण्याला किंमत ,
त्यासाठी धरावी लागत नाही मनात हिंमत

प्रांजळपणाने बोल ते बोलावे अन्
मन ते आपुले तिथेच मुक्त करावे
हीच तर आहे खरी नात्यातील गंमत 

जो असेल पाठीशी सर्वदा,
त्याच्याशी बोलून पाहा एकदा
बोलल्याशिवाय समजणार नाही
मन  मोकळे ते होणार नाही ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


काम

कामाशिवाय खरेच पर्याय नसतो. काम केले तर त्याचे फळ मिळते. न काम करता कोणीही आपल्याला काही
आयते आणून देणार नाही. म्हणून नियमित काम करा, स्वस्थ राहा, मस्त राहा.
      अगदी सामान्य गृहिणीचेच पाहा ना, घरातील सर्वच
कामे तिला पाहावी लागतात, नोकरदार असेल तर मग
ती कामे आणखी दुप्पट वाढतात. पण अगदी चातुर्याने
ती स्त्री सर्व  नियोजन बद्ध काम करत असते. घरदार सर्व
सांभाळून सर्व कामे ती चोखपणे पार पाडत असते.
     काही माणसांना मुळातच खूप अंगात आळस असतो,
काम करायची अजिबात तयारी नसते. सर्व कामं ते रेंगाळत करत असतात. मग पाहता पाहता कामाचा डोंगरच  त्यांच्या समोर उभा राहतो. मग त्यांच्या नाकीनऊ येते. सर्व परिस्थिती  हाता बाहेर गेलेली असते. अशावेळी
त्यांना अपमान , नुकसान सारे सोसावे लागते.
      ही परिस्थिती निर्माण होऊ नये , यासाठी सर्व प्रथम
कोणत्या  कामाला प्रथम प्राधान्य द्यायचे ते ठरवावे. कामाची यादी केली तर काय, कोणती कामे करायची आहे , ते लक्षात येते . आजची कामे आजच शक्यतो
करावी, उद्यावर  ढकलू नये. ढकलली तरी दुसऱ्या दिवशी ती आपल्यालाच पूर्ण करायची असतात, हे कायम ध्यानात माणसाने ठेवले पाहिजे.
       सतत कार्य मग्न राहिले की, नकारात्मक विचार मनात येत नाही. माणसात उत्साह निर्माण होतो. शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. त्याच बरोबर माणसाला हवे ते यश, समाधान, आर्थिक पाठबळ मिळत राहते. म्हणून
सतत काही ना काही काम करत राहायचे.

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 5 January 2022

संदर्भ ज्याचे त्याचे...



प्रत्येकाचे संदर्भ वेगळे
व्यक्त होणे वेगळे
परी अर्थ मात्र खरे
वागणे हे सर्वांचे आगळे

जुन्या पिढीचे संदर्भ वेगळे
परी असते सामाजिक अन्
नैतिकतेला धरून सगळे
त्यात दडले ते बोध ते वेगळे

नवी पिढी, नवा विचार, नवा आचार
असला जरी संदर्भाचा वेगळा प्रकार
असतो त्यातही खरा नाविन्याचा सार
देतो दृष्टिकोन नवा अन्
लावतो जगण्यास हातभार

वाटते प्रत्येकास स्वतःचे म्हणणे खरे
जो तो त्या, त्या दृष्टीने हाताळे
असतात सगळ्यांचे काही ठोकताळे
असे हे संदर्भ ज्याचे, त्याचे वेगळे....

सौ. राजश्री सुहास जाधव.


सहनशीलता

'सहनशीलता ' अंगी असली की आपापसातील मतभेद मिटवणे हे अगदी सोपे जाते. सहनशीलता अंगी
असली की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस विचलित न होता स्थीर राहू शकतो.इतरांनी केलेल्या टिकेचा, अपमानाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे माणूस दुःखी न होता कायम समाधानी राहतो.
           माणसाने सहनशील असावे पण त्यालाही काही मर्यादा आहेत ते ज्याच्या त्याने ओळखणे महत्त्वाचे
आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात, त्याला सामोरे जावे लागते.
उदाहरणार्थ घरात असलेल्या गृहिणींना खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, जबाबदाऱ्या पार पाडाव्या
लागतात. प्रत्येक गोष्टीत तिला गृहीत धरले जाते. काही ठराविक अशी मते तिच्यावर लादली जातात पण तरीही
ती स्त्री ते सर्व सहन करुन स्वतःचे घर कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. खरे तर पती - पत्नी दोघांनी मिळून घरातील कामे सांभाळली, विचारांची देवाणघेवाण केली तर मग सहन करण्याचा प्रश्नच उरत नाही.
          नोकरीच्या ठिकाणीही आपल्याला वरिष्ठांचे ऐकून घ्यावे लागते, जे आपल्याला पटत नसते. पण  आपणही
थोडे समजून घेऊन त्यांच्या दृष्टीने विचार केला तर मग आपल्याला वरिष्ठांचे म्हणणे पटू शकते. माणूस ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. त्याच्यात सहन करण्याची ताकदच नसते. घाईघाईने चुकीचे निर्णय घेतल्याने माणसाच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. 
            सहन करणे व सहनशील असणे ह्यात थोडा फरक आहे. उदाहरणार्थ लग्न ठरवताना मुलाकडील मंडळी मुलीच्या पित्याकडे हुंडा, वस्तू, पैसे यांची मागणी करतात. ती मागणी पूर्ण करण्यास वधूपित्याने असमर्थता दर्शवली तर लगेच लग्न मोडण्याची धमकी वरपक्षाकडून दिली जाते. अशावेळी मुलीच्या वडिलांनी ह्या गोष्टीला पाठबळ न देता त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे. त्यांच्या वाटेल ते मागण्या सहन करणे हा ही एक प्रकारे गुन्हाच आहे.
        याउलट सहनशीलता म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याशी उद्घटपणे वागत असेल तर आपण उद्धटपणे
न वागता त्या व्यक्तीशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा. तरीही त्या व्यक्तीचे कृत्य बदलत नसेल तर मोठ्या मनाने
त्यास क्षमा केली तर त्यालाही स्वतःची चूक कधी ना कधी समजू शकते.
सहन करण्याची ताकद जर माणसाच्या अंगी असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणूस
माणूस त्यातून सहीसलामत  बाहेर पडू शकतो.

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 3 January 2022

काय माझी चूक सांग ना.....



जन्म घेता मुलीचा

दृष्टिकोन बदले समाजाचा

भडिमार होई बंधनांचा

बालपणी माय म्हणे,

आहेस तू मुलगी

कशाला खेळतेस मग

मोटार गाडी अन् सायकली

खेळ तू बाहुलीसवे आपली

कसे जगावे, कसे राहावे,

काय पहरावे अन् काय खावे

नसे मुलीस स्वातंत्र्य कशाचे

वरि म्हणे, आहेस तू मुलगी

स्मरणात असू दे कायमचे

वयात येता मुलगी, मायबाप म्हणे,

ही तर आहे तुझी खरी कसोटी

नकोस जाऊ कुठेही एकटी

शिकलीस कितीही जरी

चूल अन् मूलच आहे शेवटी

अशीच आहे ही जगरहाटी

हे ब्रह्मांडनायका, प्रणाम तुजला कोटी कोटी

सांग तू मजला, मुलगी म्हणुनी जन्मास येणे

ही काय चूक आहे का मोठी ?

ही तर घोडचूक आहे, भेदाभेद करणाऱ्या त्या समाज कर्मठांची

स्विकारण्यास परिवर्तनाला, तूच आता वाट दाव रे तयांना 

सौ. राजश्री सुहास जाधव.


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...