Saturday, 22 January 2022

आनंदी कावळा



नमस्कार🙏
प्रिय बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एका कावळ्याची गोष्ट वाचण्यास घेऊन आले आहे.नेहमीची तहानलेल्या कावळ्याची गोष्ट नाही आहे बरं का...मी ऐकलेली ही गोष्ट कोणी लिहिली ठाऊक नाही पण तुम्हा मुलांना नक्की आवडेल. चला तर मग वाचूया गोष्ट....

आनंदी कावळा

एका मोठ्या जंगलामध्ये  एका मोठ्या वडाच्या झाडावर एक कावळा राहत होता.उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे वातावरणही खूप गरम होते. अशा कडक उन्हात कावळा पाण्यासाठी भटकत होता, पण त्याला कुठेच पाणी पिण्यास मिळत नाही. तहानेने व्याकुळ झालेला कावळा शेवटी नाईलाजाने पुन्हा झाडावर येऊन बसतो.
         त्याच वेळेस जंगल वाटेने चालत जात असलेल्या २-३ स्त्रिया कावळ्याला दिसतात. त्या स्त्रियांच्या डोक्यावर पाण्याचे भरलेले घडे ही त्याला दिसतात. ते
पाहून कावळा खूप खूश होतो आणि उडत जाऊन तो त्या स्त्रियांच्या डोक्यावरील घड्यातील पाणी पिण्यासाठी आपली चोच बुडवतो. त्या स्त्रियांच्या हे लक्षात येताच त्या घड्यातील पाणी फेकून देतात व पुन्हा पाणी आणण्यास जातात. त्या स्त्रिया त्याच वाटेने पुन्हा पाणी घेऊन चाललेल्या असतात तेव्हा कावळा पुन्हा त्यांच्या घड्यामध्ये पाणी पिण्यासाठी आपली चोच बुडवतो. आता मात्र  त्या स्त्रियांना  कावळ्याचा खूप राग येतो.
        त्या स्त्रिया कावळ्याची तक्रार घेऊन त्यांच्या राज्यातील राजाकडे येतात आणि म्हणतात," महाराज, जंगलातील एक कावळा आम्हाला रोज त्रास देतो,
आमच्या पाण्याच्या घड्यामध्ये तो चोच बुडवतो व सगळे पाणी खराब करतो. तुम्ही त्या कावळ्याला पकडून त्याला चांगली अद्दल घडवा ". त्या स्त्रियांची तक्रार ऐकून महाराज त्याच्या शिपायांना आज्ञा करतात," शिपायांनो, तुम्ही आत्ताच्या आत्ता जंगलामध्ये जा आणि ताबडतोब त्या कावळ्यास पकडून माझ्या समोर हजर करा ".
         राजाने दिलेल्या आज्ञेनुसार शिपाई जंगलामध्ये जाऊन त्या कावळ्याचा शोध घेतात आणि त्याला पकडून राजासमोर हजर करतात. कावळा मात्र अजिबात घाबरत नाही. त्यामुळे राजाला खूप राग येतो व तो कावळ्यास
म्हणतो, " थांब तुला चांगली अद्दल घडवतो."राजा शिपायांना हुकूम सोडतो ," शिपायांनो तुम्ही ह्या कावळ्याला उचलून खोल चिखलात, दलदलीत फेकून द्या म्हणजे त्याला चांगली अद्दल घडेल ".
      शिपाई त्या कावळ्यास पकडून चिखलात, दलदलीत फेकून देतात पण कावळ्याला अजिबात वाईट वाटत नाही उलट तो गाणे गुणगुणू लागतो,' घसरगुंडी खेळू या रे बाबा घसरगुंडी खेळूया..'   शिपायांना कावळ्याचे खूप आश्चर्य वाटते. ते कावळ्याला पकडून पुन्हा महाराजांसमोर हजर करतात आणि म्हणतात, "महाराज हा कावळा तर खूप आनंदी दिसतो त्याला तुम्ही दिलेल्या शिक्षेचे अजिबात वाईट वाटत नाही. उलट तो कावळा आनंदाने गाणे म्हणत आहे,'घसरगुंडी खेळुया रे बाबा घसरगुंडी खेळुया...'.
         यावर राजाला खूप चीड येते व तो शिपायांना आज्ञा करतो की, " या कावळ्याला तुम्ही आपल्या गुळाच्या गोदामात बंदिस्त करा म्हणजे तेथील मुंगळे ह्याला चावतील आणि कावळ्याचा चांगली अद्दल घडेल " .
शिपाई मग त्या कावळ्यास गुळाच्या गोदामात बंदिस्त करतात. शिपाई दुरून त्या कावळ्यावर नजर ठेवतात तेव्हा  त्यांच्या असे लक्षात येते की कावळा पुन्हा आनंदाने गाणे म्हणत आहे,'गुळाचे खडे खाऊ या रे बाबा
गुळाचे खडे खाऊन या...'. शिपायांना त्या कावळ्याचा अत्यंत राग येतो ते कावळ्यास धरून पुन्हा महाराजांसमोर हजर करतात व सांगतात, "महाराज ह्या कावळ्यावर दिलेल्या शिक्षेचा काहीच परिणाम होत नाही तो आनंदीच
दिसतो आहे".
        राजा खूप विचार करतो आणि मनात म्हणतो  की, ह्याला काय बरे शिक्षा करावी म्हणजे त्यास चांगली अद्दल घडेल. मग खूप विचार करून राजा शिपायांस आज्ञा करतो की, "शिपायांनो तुम्ही या कावळ्याला उचलून
तेलाच्या खाणीत टाकून द्या ". शिपाई राजाच्या आज्ञेनुसार कावळ्यास तेलाच्या खाणीत फेकून देतात. कावळा तेथेही गाणे म्हणू लागतो,' कानात तेल टाकुया रे बाबा कानात तेल टाकुया...' शिपाई पुन्हा त्या कावळ्याला राजासमोर हजर करतात व काय झाले ते सांगतात. 
       राजचा आता धीर सुटतो तो शिपायांना सांगतो की, "तुम्ही त्या कावळ्याला एखाद्या घराच्या छपरावर बांधून ठेवा म्हणजे उन्हामुळे तो चागला भाजून निघेल
व  त्याला कायमची अद्दल घडेल." शिपाई त्याप्रमाणे कावळ्यास एका घराच्या छप्परावर बांधून ठेवतात पण कावळ्याला काहीच फरक पडत नाही एवढ्या
कडक उन्हातही तो गाणे गुणगुणू लागतो, ' छपपराने अंग शेकुया रे बाबा छप्पराने अंग शेकुया...'
          शेवटी शिपाई वैतागून त्या कावळ्याला खाली आणतात व महाराजांस झाला प्रकार सांगतात. त्या कावळ्यापुढे महाराजही हतबल होतात आणि त्याला म्हणतात, " तुला मी एवढ्या शिक्षा केल्या तरीही तू इतका आनंदी कसा?" त्यावर तो कावळा म्हणतो,  "महाराज काय सांगू, मला खूप तहान लागलेली होती पण कुठेही मला पिण्यास पाणी मिळाले नाही. त्या स्त्रियांच्या डोक्यावरील घड्यातले पाणी बघून मला राहवले नाही. मी त्यामध्ये चोच बुडवून माझी तहान भागवली आणि तृप्त झालो म्हणून मी आनंदी आहे ".
       कावळ्याच्या या उत्तराने महाराज खूप खूश होतात. ते कावळ्याला सोडून देतात व म्हणतात," माझ्या  राजवाड्यासमोर एक मोठा हौद आहे तुला जेव्हा कधी तहान लागेल तेव्हा तू तेथील पाणी पिऊ शकतोस. तुला कोणीही अडवणार नाही ". त्या दिवसापासून त्या हौदातील पाणी प्राणी - पक्ष्यांसाठी वापरले जाऊ लागते.
कावळाही आनंदाने पुन्हा जंगलात निघून जातो.


4 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...