Thursday, 20 January 2022

माझी शाळा



माझी शाळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा आणि सुखद आठवणींचा कप्पा. जो प्रत्येकाच्या हृदयात हळुवारपणे जपलेला असतो.
       माझ्याही शाळेबाबतीत खूप रम्या आठवणी आहेत. त्यांची आठवण होताच पुन्हा शाळेत जावेसे वाटते. ती अनुभूती पुन्हा नव्याने घ्यावीशी वाटते.
              ही आवडते मज मनापासुनी शाळा |
              लाविते लळा ही, जसा माऊली बाळा
ह्या प्र.  के. अत्र्यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी खरोखर खूप अर्थपूर्ण आहे. प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात हा सुखद अनुभव घेतलाच असेल.
        माझे शालेय शिक्षण तीन टप्प्यात झाले, ते म्हणजे पहिली ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते दहावी. तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यातील चौथी ते सातवी इयत्तेत शिक्षण घेत असतानाच्या
आठवणी अजूनही मी हृदयात जपून ठेवल्या आहेत. निखळ आनंददायी शिक्षण मला या शाळेतून मिळाले. मी जाऊन माझ्या या शाळेमुळे अनेक विद्यार्थी घडले.
कै. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर,  विद्यानिकेतन, शाळा क्रमांक 2 मंगळवार पेठ, बारणे रोड, पुणे हा माझ्या शाळेचा पत्ता आणि नाव.
       तिसरीतून चौथी इयत्तेत हुशार विद्यार्थ्यांना या शाळेत घातले जात असे. ही माझी शाळा घरापासून लांब होती. त्याकरिता दोन बस बदलून शाळेत जावे लागत होते. सुरुवातीस माझे पालक मला ह्या शाळेत घालण्यास तयारच नव्हते पण आमच्या शेजारील मुलगी त्याच शाळेत सातवी इयत्तेत शिकत होती. तिने माझ्या
आई-वडिलांना सांगितले होते की,'मी राजश्रीला रोज शाळेत घेऊन जाईल व तिच्याकडे नीट लक्ष देईन.' मी ही त्याच शाळेत जाण्याचा खूप हट्ट धरला होता. तेव्हा कुठे माझे आई-वडील या शाळेत मला पाठवण्यास तयार झाले
       सुरुवातीस मी खूप गांगरून गेले होते. माझ्यासाठी शाळा व वर्गातील मुली-मुले सर्व अनोळखी होते. पण हळूहळू माझी वर्गातील सर्व मुली मुलांबरोबर गट्टी जमली चौथी ते सातवी मी 'अ' तुकडीतच होते. शाळा कधी आपली झाली हे माझे मलाच कळले नाही.
       आमच्या वर्गात व इतर वर्गातही मुलींच्या मानाने मुले जास्त होती. कधीकधी वर्गशिक्षक शिकवताना एकमेकांशी बोलू नये म्हणून मुलगा व मुलीस एका बेंचवर बसवत असे. त्यामुळे शिकवताना कोणीही आपापसात बोलत नसे. मुलांनी वर्गात गोंधळ घातला की मॉनिटर मुला-मुलींची नावे फळ्यावर लिहीत व शिक्षक आल्यावर त्यांना ती नावे दाखवीत पण स्वतःच्या मित्राचे नाव मात्र मॉनिटर फळ्यावर लिहीत नसे तेव्हा सर्वजण त्याच्याशी खूप भांडायचे. काही वेळानंतर विसरूनही जायचे.
        मधली सुट्टी  आम्हा सर्वांचीच आवडती होती. सर्वजण शाळेच्या पटांगणावर आपापल्या मित्र- मैत्रिणींसोबत डबा खाण्यास बसत असे. माझ्या एका मैत्रिणीचे हॉटेल असल्याने ती डब्यात नेहमी उडीद वडा, बटाटेवडा असे प्रकार आणायची. तिचा डबा ती आम्हाला खाण्यास द्यायची व आमचा डबा ती खायची. डबा लवकर संपवून खेळण्यासाठी आम्ही खूप अधीर असायचो.
आम्ही शाळेच्या स्टेजवर कधीकधी लंगडी पाणी, रुमाल पाणी असे खेळ खेळायचो. मुले झाडाच्या शेंगांचा चेंडू तयार करून त्या चेंडूने क्रिकेट नाहीतर चेंडू झेलणे हा खेळ खेळत. अशा या शाळेच्या सुखद आठवणी अजूनही मनात कोरल्या गेल्या आहेत.
        आमच्या शाळेच्या आजूबाजूने भरपूर अशी अशोकाची व इतर पावसाळी झाडे ही होती. हिरव्यागार
अशा झाडांनी वेढल्याने शाळेच्या सौंदर्यात भर पडली होती. आमच्या शाळेच्या आवारात निलगिरीचे एक मोठे  झाडही होते. त्या झाडाच्या गळून पडलेल्या टोप्या एकात एक गुंफून आम्ही मुली गजरा म्हणून केसांत माळत असू. त्या निलगिरीचा सुगंध मनास मोहवून टाकणारा होता. त्यामुळे मला म्हणावेसे वाटते की,' अजुनही स्मृतींना गंध आहे मातीशी एकरूप झालेल्या त्या इवल्याशा निलगिरीचा '.
         शाळेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आमचे गुरुजन. शाळेतील सर्व शिक्षक हे अतिशय मनमिळाऊ,
हसत खेळत मुलांना शिक्षण देणारे असे होते. शाळेमध्ये रोज नियमाने परिपाठ घेतला जात असे व प्रत्येकास त्यात
सहभाग घेण्याची संधी शिक्षक देत असे. परिपाठात रोजचे पंचांग, सुविचार, एखादी गोष्ट, प्रार्थना मुले पुढे येऊन
म्हणत असे. त्यामुळे आम्हा मुलांमध्ये सभाधीटपणा निर्माण होण्यास मदत होत असे. प्रत्येक वारांच्या वेगवेगळ्या प्रार्थना शाळेत घेत असे.कोणाचाही वाढदिवस असला की संपूर्ण शाळेतील मुलांसमोर परिपाठाच्या वेळेस त्या मुलास स्टेजवर बोलावून सर्व शिक्षक त्यास आशीर्वाद देत असे व इतर मुलांना टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन करण्यास सांगत असे. माझ्या जन्मदिनीही हा सुखद अनुभव मी शाळेत असताना दर वर्षी घेत होते. वर्गामध्ये लावलेले साहित्यांचे तक्ते, व्याकरणावर आधारित तक्ते, पाढयांचे तक्ते हे मला मुखोद्गत झाले होते.
        १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या विशेष दिनांकरिता शाळेत शिक्षक कवायतीची आमच्याकडून छान तयारी करून घेत असे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये भाग घेण्यास शिक्षक मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असे. विविध स्पर्धाही शाळेत घेतल्या जात असे. योगासन, सूर्यनमस्कार,लेझीम, बँड, लंगडी, खोखो यांचा सराव शिक्षक नेहमी मुलांकडून करून घेत असे. त्याप्रमाणेच कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समरगीत स्पर्धा, वाचन स्पर्धा अशा सर्व गुणात्मक स्पर्धांसाठी शाळेतील शिक्षक मुलांना नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करीत असत. मला स्वतःला योगासन व सूर्यनमस्कार घालणे, याची विशेष आवड होती. तसेच बँड पथकात आम्हाला शिक्षक ढोल, बासरी वाजवण्याचेही प्रशिक्षण देत असत. स्पर्धेसाठी कधीकधी दुसऱ्या शाळेत शिक्षक आम्हाला नेत असे. त्यावेळेस मनामध्ये आपलीच  शाळा जिंकावी ही भावना कायम असे व आम्ही सर्व मुली मुले एकजुटीने स्पर्धेत भाग घेत असू.  शाळेत असताना मी एकदा गांधीजींवर भाषणही  केले होते तेव्हा शिक्षकांनी खूप कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यावेळेस मी खूपच भारावून गेले होते.
         शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला शाळेचे गणवेश, बूट, कंपास सर्व मोफत मिळत असे आणि बसच्या पासचे पैसेदेखील परत मिळत असे.
         सातवी इयत्ता म्हणजे शाळेतील शेवटचे वर्ष. वर्षाखेरीस सातवीतील मुला-मुलींसाठी निरोप समारंभ शिक्षक आयोजित करत असे. आम्हा मुलांना त्या निरोप समारंभात जेवण देऊन मुलांना स्मरणिका लिहिण्यास सांगत असे. आम्ही सर्वांनी स्मरणिकेत आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. भविष्यात काय बनायचे आहे तेही त्या स्मरणिकेत लिहिले होते. शाळेचा व सर्व शिक्षकांचा निरोप घेताना आम्हा मुलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. माझ्या या विद्यानिकेतन शाळेस मी या जन्मी तरी विसरणे अशक्य आहे. 
        मला सांगण्यास आनंद होतो की, आमची १९८२ ते १९८६ सालची इयत्ता चौथी ते सातवीची बॅच जवळजवळ ३३ वर्षांनी काही मित्र-मैत्रिणींच्या परिश्रमाने पुन्हा व्हाट्स अप ग्रुप माध्यमातून एकत्र आली आहे. जवळ जवळ ५७ जणांचा आमचा ग्रुप आहे. ग्रुपमधील मित्र मैत्रिणी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मला सांगण्यास अभिमान वाटतो की, ग्रुपमध्ये काही शिक्षक, डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ,  बँक अधिकारी, व्यावसायिक, वरिष्ठ पोलीस अधिकारी असे विविध गुणवत्तेचे मित्र व मैत्रिणी मला लाभल्या आहे शाळेमुळेच आम्हाला चांगले संस्कार मिळाले आहे. शाळेतील शिक्षकांनी आम्हास घडवले आहे. मी सुद्धा गेली बारा वर्षे एनजीओ मार्फत शाळेतील मुलांबरोबर काम करत आहे. त्यामुळे शाळेशी माझा ऋणानुबंध  दृढ आहे.
         शाळेच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी दोन वेळेस गेट-टुगेदर चे आयोजन केले होते. त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक श्री. मेवेकरी सर, श्री. किसन पांडुरंग चौधरी सर,  चित्रकलेचे शिक्षक श्री.चौधरी सर,आमच्या वर्ग शिक्षिका सौ. बोर्ले मॅडम यांचा आम्ही सत्कार केला होता.सर्व शिक्षकांनी आम्हाला त्यावेळेस मोलाचे मार्गदर्शन दिले होते. आमचे किसन पांडुरंग चौधरी सर हे 'माऊली सेवा संस्था' मु.पो. पिंपरी पेंढार, तालुका-जुन्नर येथे अध्यक्ष संस्थापक आहेत व ते एक उत्तम प्रवचनकार आहेत.
        आम्ही सर्व मित्र मैत्रिणी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा काहींना तर मी अजिबात ओळखले नव्हते. बालपणीची प्रतिमाच डोळ्यांत असल्याने आता इतक्या वर्षानंतर ओळखणे अवघड होते. मलाही काहींनी ओळखले नव्हते. पण काही मित्र-मैत्रिणी अगदी बालपणी दिसायच्या तशाच दिसत होत्या. सर्वांच्याच चेहऱ्यावर मित्र मैत्रिणी व शिक्षकांना भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाने स्वतःविषयी सांगितल्यानंतर एकमेकांची ओळख पटली. आम्ही रोज जसा वेळ मिळेल तसा एकमेकांशी फोन वरून, व्हाट्सअप ग्रुप वरून संवाद साधतो. एकमेकांशी चर्चा करतो, सर्वांच्या सुख - दुःखात सहभागी होतो, एकमेकांचे मार्गदर्शन घेतो. याचे सर्व श्रेय माझ्या शाळेस व शिक्षकांना जाते. आज त्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि एकत्र आहोत.

सौ. राजश्री सुहास जाधव.




6 comments:

  1. अतिशय सुंदर रचना

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेखन केले सखी ✍️🌟👌👍👍

    ReplyDelete
  3. आपल्या शाळेच्या अविस्मरणीय आठवणी सुंदर रीतीने शब्दबद्ध केल्या आहेत.....👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...