Wednesday, 29 December 2021

भाव तो अपुरा


न बोलताही चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. त्याला शब्दांची गरज पडत नाही. दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधणाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव हे खूपच प्रेमळ असतात. जे आपल्याला आपल्या मातेच्या चेहऱ्यावर निरंतर दिसून येतात. त्यामध्ये कुठलाही स्वार्थ
दडलेला नसतो.
           काही वेळेस वर वर दिसणारे भाव हे बाह्यतः वेगळे आणि आंतरी वेगळे असतात. वर वर पाहता एखाद्याला आपल्याविषयी खूप आस्था आहे, काळजी आहे, असे वाटत असले तरी आंतरी एक प्रकारची असूया त्यांच्यात दडलेली असते. ते सहजासहजी
भाव आपल्याला दिसून येत नाही आणि असे अपुरे भाव आपल्यावर नकळतपणे घाव करत असतात. जिथे प्रेमाचा अभाव असतो तोच भाव अपुरा असतो.
          पण कधी कधी परिस्थितीमुळे माणसाला त्याच्या मनातील भाव प्रकट करता येत नाही. आतून खूप काही वाटत असले तरी स्वतःला व्यक्त करण्याचे बळ त्याच्या अंगी नसते, किंवा एखाद्याला व्यक्त होता येत नाही कारण त्याचा स्वभाव त्याला तसे करू देत नाही. पण यामुळे समोरील माणसाला त्याच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. त्याचे भाव अपुरे राहिल्याने इतरांवर त्याला प्रभाव पाडता येत नाही. म्हणून ' अपुरा असता भाव, जो देई मनासी घाव, न लागे जीवनात निभाव.'

सौ.  राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 28 December 2021

नियम



जीवन हा एक खेळ आहे.

नात्यांची सारी भेळ आहे.

साधावयाचा आपणास मेळ आहे.

विधात्याने रचलेला नियम आहे .

जो येई जन्मास, त्याचा मृत्यू ठाम आहे.

मनमुराद जीवन जगणे, हे आपुले काम आहे .

हरणे, जिंकणे हे निरंतर आहे .

एकास हार, एकास जिंकावे लागणार आहे.

कस खिलाडू वृत्तीचा लागणार आहे .

हारूनही  तोच जिंकणार आहे .

अपयशातूनच यशाचा धडा मिळणार आहे .

म्हणून हा जगण्याचा नियम मी पाळणार आहे .....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.


गुरुकिल्ली

स्वतःचाच टेंभा मिरवून उपयोग काय?
स्वतःचेच म्हणणे खरे करण्यात पराक्रम तो काय !

पोकळ त्या अभिमानास जपायचे ते काय ,
दाखवावा कधी तरी मनाचा मोठेपणा

पत्करून शरणागती, दूर लोटावी अहंभावना
झेंडा तो मानवतेचा रोवूनी,

फडकवावी पताका संवादाची मनामनातूनी ,
शृंखला ही प्रेमळ संवादाची,

राहावी निरंतर भावना आपुलकीची
नसावी जागा तिथे विसंवादाची

संवादातूनी होई आदान- प्रदान विचारांची
आहे ही गुरुकिल्ली यशाची
हीच खरी गरज आहे काळाची.....

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 26 December 2021

गझल १४



मात्रावृत्त :- ८×३ (२४)
वृत - अनलज्वाला

दोष कुणाला द्यावा आता  ठरवत नाही
मनास माझ्या काहीच खरे  समजत नाही...

ना हिणवावे कोणास कधी व्यर्थ असे ते
सुख दुसऱ्याचे  पाहिल्यावरी हसवत नाही...

ठेवले किती साठवुनी मी  मनात सारे
भावना अशा मुक्याने आज धरवत नाही ...

जीवनात या  घडायचे ते  घडून जाते
पुन्हा नव्याने आयुष्यास मी  घडवत नाही...

पायघड्या ह्या सुखाच्या किती अंथरल्या त्या
तरी भाव ते मनास माझ्या  सुखवत नाही....

सौ. राजश्री सुहास जाधव.


योग्य दिशा



माणसाचं कसं असतं ना, कधी कधी सारं समजत असतं,
कळत असतं पण वळत नाही. लहान मुलांचेच पाहा ना
त्याला अमुक एक करू नकोस म्हटलं की ते मूल तेच
करणार. त्याला ते करून पाहायचे असते. जेव्हा ते मूल
न सांगितलेली गोष्ट करतो आणि त्यातील धोका त्याला
तेव्हाच समजतो, मग पुन्हा काही तो त्या वाटेला जात नाही. कारण ते लहान असल्याने त्याला आपण जसे घडवू तसे ते घडते. 
       पण मोठ्यांच्या बाबतीत किंवा आपल्या स्वतःच्या
बाबतीत काय म्हणता येईल ! आपण समोरच्याला त्याच्या
वर्तणुकीबाबत बरेच वेळा सल्ले देत असतो, असे करू नकोस, सर्वांशी प्रेमाने वाग, विनाकारण तंटा  करू नकोस, शंका घेऊ नकोस. पण समोरील व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीतच नसेल तर कोणी कितीही सांगा
त्याला ते पटत नाही. ती व्यक्ती त्याचा हेका सोडत नाही.
परिणामी त्याचे परिणाम त्याच्या सहित इतरांनाही भोगावे
लागतात. मन त्याच्या बाबत इतरांचेही  मन कलुषित होते.
त्याला दुसऱ्यांच्या निंदेला सामोरे जावे लागते.  नाती
दुरावतात. इतरांनाही त्याच्या वागणुकीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय ह्या सर्वांचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावरही होऊ शकतो . म्हणजे सर्व
बाजूने नुकसानच ठरलेले असते.
          माणूस स्वतःही कधी कधी असेच वागतो. बुध्दीला
काही गोष्टी पटत नसल्या तरी मन काही मानत नसते. त्या
मनाला कितीही बजावले तरी एखादी चुकीची गोष्ट त्याच्याकडून कधी ना कधी होत असते. पण ते कधी तरी झाले तर चूक सुधारता येते. पण वारंवार तीच जुनी चूक
माणूस पुन्हा पुन्हा करू लागला तर समोरच्याच्या नजरेतून ती व्यक्ती उतरते. त्याच्याविषयी कटुता मनात
उत्पन्न होऊ शकते. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करु लागतात. ' अरे ही व्यक्ती अशीच आहे, नेहमी चुकाच करते ' असे लोक गृहीत धरू लागतात. त्यानंतर कितीही
चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक लवकर स्वीकारत नाही.
         म्हणून समजून सांगण्याची वेळ ही स्वतःवर  किंवा
दुसऱ्या कोणावरही येऊ नये, असेच माणसाने वागावे.
आपण कुठे चुकतो, काय बरोबर काय चूक , हे आपल्याला समजले पाहिजे. दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर
माणसाने योग्य कामासाठी केला पाहिजे. फालतू, निराधार गोष्टींमध्ये त्याने कधीही स्वतःस अडकवून घेता कामा नये. तेव्हा माणसाच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

      सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 23 December 2021

नको हे वाद ...


' व्यक्ती तितक्या प्रकृती ' असे  म्हणतात ते काही चूक नाही. चार माणसं एकत्र आली की प्रत्येकाचे विचार वेगळे, दृष्टिकोन वेगळा त्यामुळे तिथूनच खरी  वादाला
सुरुवात होते आणि मग एकमेकांबद्दल असूया, कटुता
मनात निर्माण होते .

           खरे तर आज ह्या मितीस परस्परां बरोबरचा
संवादच खुंटला आहे . प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात
रमला आहे. सोशल मीडिया, नवनविन फंडे, पैशाचा
हव्यास, प्रसिद्धी या साऱ्यातून एकमेकांना समजून घ्यायला, पुरेसा वेळ द्यायला कोणाकडे वेळच नाही.
तरुणाई त्यांच्या धुंदीत, आई वडील त्यांच्या कामात
व्यस्त असतात. मग संवाद होणे दूरच पण जो काही
वेळ असतो तो वाद विवाद करण्यातच जातो.
       काहींना तर क्षुल्लक कारणावरून वाद घालण्याची सवयच असते. पण अशा छोट्या छोट्या वादाला नंतर उग्र स्वरूप प्राप्त होते आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा
लागतो. एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवल्या आणि त्या
पूर्णत्वास आल्या नाही की वादास कारण ठरते. मनात एकमेकांविषयी अढी निर्माण होते. जो तो त्याचेच म्हणणे कसे बरोबर आहे , हेच दाखवण्यात आनंद मानतो. प्रसंगी
आरोप - प्रत्यारोप, अगदी मारामारी पर्यंत प्रकरण जाते.
सर्वत्र नकारात्मकताच दिसून येते.
         पती - पत्नीतील वाद, आई वडील आणि मुलांतील वाद, मित्र - मैत्रिनींतील वाद, वरिष्ठ आणि कर्मचाऱ्यांतील वाद, जाती भेदातील वाद, राजकीय वाद  असे  बऱ्याच
प्रकारचे वाद आपल्या सभोवताली दिसून येतात.
       वाद जरी झाले तरी ते सामोपचाराने मिटवता येऊ शकतात. त्याकरिता दोन्ही कडून तशी तयारी दाखवली
पाहिजे. प्रत्येकाच्या विचाराचा आदर हा झालाच पाहिजे .
मग तो आपल्यापेक्षा लहान असला तरी त्याला त्याचा
विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार दिलाच पाहिजे. तरच
असे वाद निर्माण होणार नाही. मनात कटुता भरणार
नाही.
       आयुष्य खूप छोटे आहे, ते आनंदाने जगू या. वाद
विवाद टाळून प्रेमाने जीवन जगू या. एकमेकांशी हितगुज
करू या, अहंभाव टाळू या..... 'नको हे वाद, जे करती जीवन बरबाद , त्यापरी घ्या जीवनाचा आस्वाद अन् जगा
मनमुराद '       तुम्हाला काय वाटते !.....

सौ. राजश्री सुहास जाधव.

         


मौन तुझे ...



अबोल तू  अबोली
जशी मोहक कुंदकळी !
छळते किती मनास या,
निरव या कातरवेळी
खुलणार कधी सांग सखे
तुझ्या गालावरची खळी ?

पाहुनी तुजला जातो मी हरवून
अबोल तुझे हे मौन जरी,
जाते मजला खूप काही सांगून
शब्दांविना डोळ्यांतून येई सारे उमजून

छेडते हृदयात माझ्या,
अलवार तुझ्या प्रेमाची धून
आहे सखी हीच आपुल्या
निःस्वार्थ प्रेमाची खूण

मग होई बोलके तुझे मौन
मौनात  तुझ्या जातो
मी चिंब भिजून अन्
येई प्रीत आपुली बहरून ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 21 December 2021

उद्वेग



तुझ्या उद्वेगाची कल्पना ही करवत नाही
किती सहन करावे, याला काही अंतच नाही
समदुःखी तू आणि मी, ओझी  आता पेलवत नाही
थकलो आहोत शरीराने अन्  मनानेही,
अवसान आता काहीच उरले नाही

सगळ्यांसाठी सगळं केलं ,
स्वतःस मात्र त्यातून  वगळलं
दिवस रात्र, शरीर हे दुसऱ्यांसाठीच झिजलं
येतील सुखाचे दिवस, असं म्हणत जीवन कंठलं

सरले सारे आयुष्य, परी फुलले ना चेहऱ्यावरी हास्य
घालून समजूत मनाची, नाही केले कदापि त्यावर भाष्य
बजावले मनाला , असेच असेल आपले आयुष्य
का द्यावा दोष कुणाला, घे मानून तू  सुखाला .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 20 December 2021

गझल :११



वृत्त : आनंद

कसलीच जाण नाही
जीवास ताण नाही....

डोळ्यांत या तुझ्या रे
का आज त्राण नाही ....

घेऊन आज सारे
त्यालाच मान नाही....

तोडून बंध सारे
जगण्यात शान नाही....

जिंकेल हृदय आता
हरलोच भान नाही....

सौ. राजश्री सुहास जाधव.


सुख - दुःख



जीवन हे खूप सुंदर आहे.ते भरभरून जगता आले पाहिजे. जे नाही मिळाले त्यासाठी रडत बसण्यापेक्षा, जे आहे , जे तुमच्या जवळ आहे त्यात सुख मानले पाहिजे. ते आणखीन सुंदर कसे करता येईल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे.
       दुःख आहे म्हणून सुखाचे महत्व आपल्याला समजते. जगाच्या पाठीवर पूर्णतः सुखी असा शोधून सापडणार नाही. एखाद्याकडे अमाप पैसा असतो, घरदार सारं असतं पण ते उपभोगण्यासाठी त्याला संतान नसते. हे दुःख त्याला भोगवच लागतं. हेच एखाद्या झोपड्यात राहणाऱ्याच्या पोटी मुलाबाळांची कमतरता नसते.
त्यांचे पालनपोषण करण्याचा भार त्याच्यावर प्रचंड असतो. म्हणजेच काही तरी बेरीज वजाबाकी ही सर्वांच्याच जीवनात सुरूच असते. काही मिळालं
तर काही गमवावं लागतं.
            जीवनात प्रत्येक टप्प्यावर माणसे भेटतात. त्यांच्याशी कोणते ना कोणते भावनिक नाते निर्माण होते. काही तर अनामिक नाती तयार होतात. त्यांच्यातील चांगले गुण घ्यायचे. दोष असतील तर ते त्यास सांगून ते कसे कमी होतील, ह्यासाठी त्यास मदत केली पाहिजे. आपल्याला माहित असते की, काही नाती जन्मभरासाठी नसली तरी त्यांना आठवणीत आपण कायम जागृत ठेवू शकतो. ती नाती आपल्या सोबत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा जे आपल्या पुढ्यात आहे ते अधिकाधीक  चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले तर आपल्याला सुख,समाधान नक्कीच गवसेल, जगण्यासाठी नवी दिशा मिळेल.
          जीवनात कधी सुख, कधी दुःख हे येतच राहणार. त्याचा स्वीकार तुम्ही कशा प्रकारे करता ह्यावर सारे अवलंबून असते. कुढत बसायचं की हसत जगायचं, हे सर्वस्वी आपणच ठरवायचं असतं आणि हेच तर खरे जीवन आहे.

सौ. राजश्री सुहास जाधव.



       


Friday, 17 December 2021

कैफ



तरुण वयात असताना अंगात सळसळते रक्त असते.  एक वेगळाच जोश अंगात असतो. जणू सारे काही माझ्याच
आवाक्यात आहे. एक वेगळीच धुंदी, कैफ तरुण वयात असते. त्यावेळी मग मोठ्यांनी दिलेले सल्लेही मग आऊट
डेटेड वाटतात. हम करे सो कायदा, अशी वृत्ती त्या वयात
तयार होत असते. एक वेगळ्याच जगात ही तरुणाई वावरत असते. प्रेमाच्या धुंदीत ते जगत असतात. पण प्रेम म्हणजे नेमके काय हे  तरी त्यांना माहित असते का? ते फक्त एक आकर्षण असते त्या वयातील आणि मग विनाकारण त्यात ही तरुणाई वाहत जाते आणि नको त्या गोष्टी करू लागतात. थ्रील म्हणून वेगवेगळ्या नशा करून त्यातच अडकून जातात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भोगावे लागतात.  सगळेच तरुण तसे नसतात पण एकंदर जर पाहिले तर लक्षात येऊन जाते.
         तरुणच काय पण इतर कोणत्याही वयातील व्यक्तीच्या बाबतीत असे होऊ शकते. त्यांना पैशाच्या जोरावर सर्व काही विकत घेता येते असेच वाटत असते. त्या धुंदीत मग ते वाटेल ते करून , पैशाचा, स्वतःच्या नावाचा गैरवापर करून, चुकीचे मार्ग अवलंबून हवे ते साध्य करत असतात. पण हे पुर्णतः चुकीचे आहे. पैसा , नाव हे चिरकाल राहू शकत नाही . नाव कमावण्यासाठी तशी वर्तणूकही चांगलीच हवी असते. पण सत्ता, संपत्तीच्या धुंदीत अशा लोकांची विचार करण्याची क्षमताही खुंटलेली असते. मग एक ना एक दिवस हा सर्व उन्मत्त पणा , कैफ सारे उतरून जाते. जेव्हा जी माणसे आधी त्यांची हाजी हाजी करत असतात तीच त्यांच्या
उतरत्या काळात त्यांना सोडून जातात. कारण ती म्हण आहे ना ' जिथे  मिळे पोळी, तिथे गोंडा घोळी ' तशी एकूण गत असते.
        कैफ असावा पण तो चांगल्या गोष्टींचा असावा. कैफ
तुम्ही लिखाणाचा करा, तुम्ही शिक्षणाचा करा ,नवनविन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जे जे उत्तम, त्याचे करावे चिंतन. अध्यात्म, ईश्वर ह्यांच्या विषयी जाणून घेण्याचा मानस नेहमी करा. चांगले, दृढ संकल्प करा. समाजाशी काही आपण देणे लागतो , या भावनेतून दुसऱ्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो , हे सतत
तुम्ही स्वतःस विचारा. बोलणे जरी खूप सोपे असले तरी ह्या सर्वच गोष्टी जरी आपल्याला नाही जमल्या तरी आपल्या भोवताली अनेक अशी माणसे दिसतील त्यांना
खरोखर मदतीची गरज आहे. त्यातील एकाला जरी आपण आपल्या क्षमतेनुसार मदत केली तरी खूप आहे.
          ह्यातील काही जरी नाही साध्य झाले तर कैफ हा
तुमच्यात असा असावा की कष्टाने स्वतःस तुम्ही घडवू शकाल. जिथे तुम्ही हात घालाल त्याचे सोनेच होईल, अशी धमक तुमच्या अंगी असावी.

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 16 December 2021

नादानी

बहुत कर ली जीवन में नादानी

छोड़ दे ये आदत पुरानी
ना कर अपनी मनमानी
काटोंसे भरे पड़े हैं रास्ते
संभल कर चलना दोस्त मेरे
वरना दे जायेंगे ज़ख्म की निशानी
और उलझ जायेगी जिंदगानी
उलझनेसे तो अच्छा है
सुलझ जाए ये  जिंदगी
तो  निखर आयेगी सादगी  ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


हास्य तुझे



गंध फुलांचा आला आज बहरून
हास्य तुझे पुन्हा एकदा आले फुलून
पाहुनी स्मित हास्य तुझे गेले मन माझे भरून
दरवळ तो फुलांचा अलवार ओंजळीत घ्यावा साठवून
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना
सुगंधा परी फुलांच्या,
श्वासात तुझ्या जावे विघळून
हास्यावर तुझ्या होऊनी फिदा
घेईल आस्वाद जीवनाचा भरभरून🌺🌺🌹🌹🌸🌸

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 15 December 2021

गझल : १०



स्त्रिग्विनी वृत्त : मात्रा २० गालगा गालगा  गालगा गालगा

बंधने लादता.. वेदना जाळते
का तरी शांत मी ..आसवे गाळते

भोगते भोग हे ..  यातना केवढ्या
वार ते झेलता .. शब्द मी पाळते

पारखी आज मी .. सुखसरी वेचण्या
बावरी मी पुन्हा .. तुजवरी भाळते

रात ही हासता .. ओढ ही लागते
केतकी मोगरा .. कुंतली माळते

मोहरावी अशी ...प्रीत ही आपुली
मुक्त रे आज मी.. दुःख हे टाळते

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 14 December 2021

देवा मला क्षमा कर...



एक गाव होतं. गावाचं नाव होतं नर्मदापुर. नर्मदा नदी काठी वसलेलं. छान कौलारू घरांचं गाव. गावातील लोक खूप धार्मिक होते. गावामध्ये विठ्ठलाचे छोटे पण सुंदर असे मंदिर होते. त्या मंदिरात रोज सकाळ, संध्याकाळ भजन, किर्तन, प्रवचन होत असे. स्त्रिया , पुरुष मंडळी, मुले बाळे नेहमीच मंदिरात गोळा होत आणि भजन, किर्तन, पुजाअर्चा करीत.
          त्याच गावामध्ये एक  'नागोजीराव' नावाचा इसम देखील रहात होता . हा नागोजीराव अत्यंत रागीट स्वभावाचा आणि नास्तिक होता . त्याचा देवावर , भजन , पुजाअर्चा या सर्वांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला
ते सारे थोतांड वाटायचे . सकाळी , संध्याकाळी  बाया  बापड्या मंदिरात जायला निघाल्या की तो त्यांना चिडवायचा , ओरडायचा , " कशाला जाता त्या मंदिरात? फुकट वेळ घालवता, विठ्ठलाला प्रसाद अर्पण करता ; तो दगड काय तुमचा प्रसाद खाणार आहे का ?" मग  बायका
बिचाऱ्या मुकाट्याने काहीच न बोलता खाली मान घालून देवळात निघून जायच्या. गावातील सारी माणसे या नागोजीरावामुळे खूप वैतागली होती. पण भितीपोटी कोणीच काही बोलत नव्हती.
          एक दिवस नागोजीराव मनात काहीतरी ठरवतो आणि मनोमन खूप खूश होतो. त्यादिवशी  रात्री खूप जोराचा पाऊस पडत असतो. रात्र झाल्याने आणि बाहेर पडणाऱ्या धो  धो पावसामुळे  गावातील लोकंही झोपलेली असतात. मध्यरात्र होते , पावसाची रिपरिप सुरूच असते आणि अशा पावसात , भयान काळोखात नागोजीराव एका हातात छत्री व लोखंडी पाईपासारखे काहीतरी घेऊन घराबाहेर पडतो. जाताना घराचे दार लोटून घेतो . घरात त्याची बायको शांत झोपलेली असते.
नागोजीराव मंदिराच्या दिशेने चालत निघतो . एक आसुरी हास्य त्याच्या चेहऱ्यावर झळकते. मनातल्या मनात तो बोलतो, " आज काही मी हे मंदिर आणि ह्या मंदिरातील विठ्ठलाला सोडणार नाही . त्या दगडाला कशाला हवे दागदागिन! कशाला हवे हार- फुले आणि नैवद्य!"
असे पुटपुटत तो मंदिराजवळ येऊन पोहोचतो आणि मंदिराच्या दारातून आत प्रवेश करतो. त्याच्या ह्या कृत्याचा पाऊस साक्षीदार असतो. सगळेच खूप भयान वाटू लागते.             
          नागोजीराव मंदिराच्या गाभाऱ्यात येतो आणि मुर्तीवर घाव घालणार तेवढ्यात..... विजेचा कडकडाट होतो आणि त्या लख्ख प्रकाशात नागोजीरावाला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायापाशी काहीतरी चमकताना दिसते . नागोजीराव पुढे जातो व मनाशी म्हणतो,
" विठ्ठलाचे दागदागिने तर आपण घेऊच पण आधी त्याच्या पायापाशी असलेले ते तांदूळ पण घेऊ ." 
तो पुढे येऊन पाहतो तर काय! विठ्ठलाच्या पायापाशी
ताटभर तांदूळ ठेवलेले त्याला दिसतात आणि तेच तांदूळ
चमकत असतात . नागोजीराव म्हणतो , " विठ्ठलाला
कशाला हवेत तांदूळ? तो काय खरेच खाणार आहे का ? 
त्यापेक्षा आपण हे तांदूळ घरी नेले तर त्याच तांदळाचा
भात तरी करून खाऊ." असे म्हणून नागोजीराव बरोबर आणलेल्या पिशवीत ते तांदूळ भरू लागतो आणि काय आश्चर्य! विठ्ठलाच्या पायापाशी पुन्हा तेवढेच तांदूळ त्याला दिसतात. नागोजीरावला ते पाहून खूप आनंद होतो.  तो मंदिरात शोधाशोध करून एक पोते आणतो व सर्व तांदूळ त्या पोत्यात भरतो तर पुन्हा तेवढेच तांदूळ त्याला ताटात दिसतात . मग नागोजीराव विचार करतो," आपण आधी हे तांदूळ घरी ठेऊन येऊ आणि परत येताना बायकोलाही बरोबर घेऊन आणखी पोती भरून तांदूळ सकाळ  होण्याच्या आधी घरी आणू ".असे ठरवून नागोजीराव तांदळाचे पोते डोक्यावर घेऊन घरी येतो आणि बायकोस आवाज देऊन उठवतो. नागोजीरावची बायको 'उमा ' त्याच्याकडे व  त्याने आणलेल्या पोत्याकडे पाहून आश्चर्यचकित होऊन विचारते ," एवढ्या रात्री तुम्ही हे काय घेऊन आलात? " त्याबरोबर  नागोजीराव  तिच्यावर  खेकसतो व त्याचा हेतू तिला सांगतो. उमाला फार वाईट वाटते, पण नागोजीराव तिचे काहीच ऐकत नाही. तो तिला म्हणतो , "आपण दोघं आणखी पोती घेऊन मंदिरात जाऊ आणि सकाळ होण्याआधी सर्व तांदूळ, दागदागिने घेऊन घरी येऊ." नागोजीराव त्याने आणलेले तांदळाचे पोते डोक्यावरून खाली उतरवतो तर काय आश्चर्य! आणखी एक तांदळाचे पोते त्याच्या डोक्यावर तयार होते . त्याला व त्याच्या बायकोस खूप नवल वाटते .सुरुवातीस  नागोजीरावला खूप आनंद होतो. तो पोते खाली ठेवतो तर पुन्हा डोक्यावर नविन तांदळाचे पोते तयार होते. आता मात्र नागोजीराव घाबरतो, कारण पोते उतरवले की डोक्यावर नविन तांदळाचे पोते तयार होत होते.  त्यामुळे नागोजीरावची खूप दमछाक होते. तो अर्धमेला होतो.  उमा त्याला म्हणते , "तुम्ही हे वाईट कृत्य केले म्हणूनच देवाने तुम्हाला ही शिक्षा केली आहे."  यावर नागोजीराव तिच्यावर  खेकसतो आणि म्हणतो, " हे बघ मी आता काही जगणार नाही असे मला वाटते, पण मरण्याआधी मला ह्या तांदळाचा भात करून खाऊ घाल." उमा धावत पळत स्वयंपाक घरात जाते आणि पटकन भात शिजवून आणते व त्याच्या पुढ्यात ठेवते . नागोजीराव तिला भाताचा घास खाऊ घालण्यास सांगतो . उमा त्याला भाताचा एक घास भरवते. नागोजीराव तो घास खातो तेवढ्यात त्याच्या तोंडात पुन्हा भाताचा घास तयार होतो . आता मात्र नागोजीराव पुरता हतबल होतो, कारण तोंडात घास आणि डोक्यावर तांदळाचे पोते तयारच होत असते . भात खाऊन खाऊन त्याचे पोट फुगते. त्याला खूप त्रास होऊ लागतो. आता त्याला त्याने केलेल्या पापाची जाणीव होते. उमा त्याला देवाची माफी मागण्यास सांगते. नागोजीराव मनापासून देवाचा धावा करतो आणि म्हणतो ," देवा मला क्षमा कर. मी चुकलो, मी चुकलो ." आणि काय आश्चर्य!  त्याच्या तोंडातील घास नाहीसा
होतो तसेच डोक्यावरील पोतेही नाहीसे होते. नागोजीरावची शुद्ध हरपते.
          दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे गावातील लोक मंदिरात पूजेसाठी येतात आणि समोरील दृश्य पाहून 
त्यांना नवल वाटते. कारण मंदिरात नागोजीराव देवाची पूजा करत असतो. त्याला पाहून सगळे खूप आनंदी होतात. नास्तिक नागोजीराव आता आस्तिक झालेला असतो. त्या दिवसापासून नागोजीराव नियमाने सर्व गावकऱ्यांसोबत मंदिरात पूजा-अर्चा, भजन, किर्तनात सहभागी होतो. सारा गावही गुण्या गोविंदाने नांदू लागतो.

सौ. राजश्री सुहास जाधव.
























       


Monday, 13 December 2021

गझल :9


आनंद कंद वृत्त :- मात्रा २४
गागाल गालगागा  गागाल गालगागा

बाजार भावनांना, आता विकार झाला
हृदयावरी असा का, ठरवून वार झाला...

डोळ्यांत आसवांचा, हा पूर साठलेला
तो भाव गोठलेला, का आज गार झाला...

तो चंद्र चांदण्यांचा, गेला कुठे कळेना
सोडून चांदण्यांना, तो ही पसार झाला....

संसार हा सुखाचा, खोटाच पाहिला मी
जगण्यास आज माझ्या, त्याच्याच भार झाला....

स्वप्नातला सखा मी, साक्षात पाहिल्यावर
आभास हा मनाचा, डोळ्यात  सार झाला

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 11 December 2021

ठिणगी एक द्वेषाची



ठिणगी एक द्वेषाची
होई धूळधाण आयुष्याची
असते इतुकीशी ही ठिणगी
परी व्यापते ती बुद्धी अवघी 

पुरेशी एक ठिणगी  द्वेषाची
जिला नसते दयामाया कोणाची
पेटवूनी रान सारे,
करते फरफट माणसाची 

ठिणगीत ताकद अफाट फार
क्षणात करते ती साऱ्यांचा संहार
करुनी कब्जा माणसांवरी
मिरवते स्वतःचीच मक्तेदारी 

ठिणगी एक द्वेषाची, रुजते मनामनात
अन् अडकवते माणसाला स्वतःच्याच जंजाळात
करते रागाची आणिक तिरस्काराची बरसात
होरपळून टाकते माणसाला अवघे जीवनात .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 10 December 2021

कलह

जगाच्या पाठीवर कुठेही जा, जिथे कलह नाही, असे होणार  नाही. माणूस म्हटले की, ' कलह ' निर्माण होण्यास अगदी क्षुल्लक कारणही पुरेसे असते. काही
वेळेस निर्माण झालेले हे कलह पेल्यातील वादळाप्रमाणे
पुन्हा शांतही होतात . पण काही कलहाने उग्र रूप धारण
केले की परिस्थिती हाताबाहेर जाते आणि सारेच कठीण
होऊन जाते.
        
         ' कलह ' हे अनेक प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी होणारा वाद, सामाजिक कलह, कौटुंबिक कलह, पती - पत्नीतील
कलह, एवढेच काय पण स्वतःचा स्वतःशीच होणारा कलह, ईश्वरा बरोबर होणारा कलह, असे अनेक प्रकारचे
कलह आपल्याला सभोवताली दिसून येतात.

       हे सर्व कलह, वाद, कुरबुरी ह्या सामोपचाराने सोडवल्या गेल्या तर कोणाचेच नुकसान होणार नाही.
  
       आपल्याला बऱ्याच वेळा इतरांचे म्हणणे पटत नाही.
जिथे आपण काम करत असतो तेथील सहकाऱ्यांशी आपले मतभेद निर्माण होऊ शकतात. हे मतभेद एकमेकांच्या विचारांचा आदर करून सोडवणे गरजेचे असते, म्हणजे गोष्टी विकोपाला जात नाही.

      पती - पत्नीच्या नात्यांत कलह हा ठरलेला असतो.
पण ह्या भांडणातूनच त्यांची प्रेमाची, संसाराची गोडी
वाढत असते. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना,  तुझ्यावाचून करमेना !  अगदी तसंच. खरे तर पती - पत्नी
दोघांनीही त्यांचे त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. एकमेकांवर हक्काने रागावले तरी दोघांनीही पुन्हा
तितक्याच प्रेमाने एकमेकांस माफही केले पाहिजे. जीवनभर एकमेकांना ते पूरकच असले पाहिजे. तेव्हाच
ती साथ आजन्म टिकू शकते. एकमेकांवर कुरघोडी करणे, वर्चस्व गाजवणे सोडून दिले पाहिजे.

       कौटुंबिक कलह तर आपणास नेहमीच ऐकण्यास , पाहण्यात येतात. संपत्तीच्या कारणावरून, अधिकाराच्या
कारणावरून परिवारात असे वाद निर्माण होत असतात.
कधी कधी तर हे वाद इतके टोकाचे असतात की एखाद्याचा जीव घेण्यासही मग कोणी मागेपुढे बघत नाही.
पुढे कोर्ट - कचेऱ्या , हेवेदावे ह्या साऱ्यातच माणूस अडकून जातो आणि स्वतः बरोबर परिवारातील साऱ्यांचेच नुकसान करून घेतो. ह्या सर्व गोष्टी घडत असताना नाहक वेळ, पैसाही वाया जातो शिवाय अब्रूही
चव्हाट्यावर येते. म्हणून शक्यतो असे कलह निर्माण होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.

      समाजात घडणाऱ्या घटना, अनागोंदी कारभार, सत्तेचे राजकारण , जातीवाद , हिंसा, लोकांचे शोषण, स्त्रियांवरील बंधने, अत्याचार या साऱ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये आपल्या व्यवस्थेविषयी मनात संभ्रम निर्माण
होतो. ह्याचा फायदा घेऊन काही मंडळी स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. पण सामान्य माणूस ह्यात भरडला जातो.
शेवटी हाती काहीच लागत नाही. म्हणून शक्यतो सर्वांनीच
सजग राहणे गरजेचे आहे. अफवांना बळी कोणी पडता कामा नये. आपापसातील मतभेद मिटावे याकरिता  सर्वांनी एक एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. तेव्हाच सुखाचे जीवन जगता येईल.

       कधी माणसाचा स्वतःशीच कलह निर्माण होतो.   माणूस द्विधा मनस्थितीत सापडतो. मी हे करू का, नको ? , मी जे बोलते ते चूक की बरोबर, मी चांगला की वाईट  इत्यादी अनेक विचार माणसाच्या डोक्यात येऊन
स्वतचं मन स्वतःशी भांडत असतं.  अशा वेळेस एकाग्र चित्त होऊन आपले अंतर्मन जे सांगते व जे आपल्या
बुद्धीस पटेल  तसेच वागावे म्हणजे मनातील कलह कमी
होण्यास मदत होईल.

        माणसांबरोबर आपण वाद घालतोच पण आपण ईश्र्वरासही त्यातून सोडत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की सारे आपण देवावर ढकलून
मोकळे होतो.  ' तुझ्यामुळे असे घडले, तुला आमचे सुख पाहवले नाही ', असे काही बाही माणूस बरळून जातो.
खरे तर हे पूर्णतः चुकीचे आहे. आपल्याला आपल्या
कर्मानुसारच फळ मिळत असते. मग देवाला दोष का द्यावा ?  देवावर विसंबून राहण्यापेक्षा आपल्या कृतीतून,
आचरणातून हवे ते साध्य करावे. देव हा आपल्या पाठीशी
कायमच असतो, असणार आहे. ती एक आंतरिक शक्ती
आहे. जी आपल्याला प्रेरणा देत असते.

          कोणतेही वाद, कलह हे विकोपास जाणार नाहीत
याकडे जर लक्ष दिले तर माणसासमोर असणाऱ्या समस्या सहज सुटून जातील. माणूस निखळ, सुखी जीवन
जगू शकेल.

सौ. राजश्री सुहास जाधव.


धरोहर



मैफिल पुन्हा शाळेत मुलांची भरेल का?
पालवी त्यांच्या मनात शिक्षणाची फुलेल का?
वर्ग सारे शाळेतील मुलांच्या सहवासाने हसतील का?
नसले जरी तिथे मी आठवणीत त्यांच्या मी राहिल का?
मैफिलीत स्वर हे मुलांचे अन् शिक्षकांचे पुन्हा नव्याने घुमतील का ?
मैफिल ही मुलांची शाळेत निरंतर  भरावी
रंगत ही शिकण्याची पुन्हा चढावी
वंचित ना कधीही शिक्षणापासून मुले राहावी
ज्योत  ज्ञानाची अखंड तेवत राहावी
धरोहर ही आपली आपणच राखावी......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 8 December 2021

चिऊचं बाळ



चिऊचं बाळ
आहे भारी खट्याळ
पाहायचे होते त्यास आभाळ
जाता चिऊताई, घरट्याबाहेर पडलं
समोरच होता काऊ,
म्हणाला," अगं अगं चिऊ
बाहेर नको जाऊ !
नाहीतर, खाईल तुला माऊ.."
चिऊचं बाळ फार हट्टी
घेतली त्याने काऊशी कट्टी
अन् निघालं पुढं झटदिशी
झाडावर होता राघू
म्हणाला, " चिऊबाळा, नको रे असं वागू !
घरट्यात लवकर जा बघू.."
  चिऊचं बाळ म्हणालं,
" तुला करायचं काय रे राघू?
झालं काय तर, पुढचं पुढं बघू .."
तेवढ्यात समोर आली माऊ
म्हणाली बाळाला,
" अगं ये चिऊ, तुला गिळू की खाऊ? "
  चिऊचं बाळ खूप खूप घाबरलं
  पंख फडफडून उडू  लागलं
  उडता उडता भूर् आभाळी गेलं....

   सौ. राजश्री सुहास जाधव.


ती पाऊलवाट



असावी ती पाऊलवाट ओळखीची
नसेल मग भीती कशाची
होईल वाट सुखकर जीवनाची
परी ह्यात नसे खरी गंमत चालण्याची
असावी वाट नागमोडी वळणाची
तरच उमगेल खरी गंमत जीवनाची
काट्या - कुट्यांनी भरलेल्या
वाटेने चालताना उमजून जाईल
कला आपसूक तोल सावरण्याची
परीक्षाच जणू आपल्या संयमाची
झालो पास जर ,
पादाक्रांत करू शिखरे यशाची
म्हणून वाट ओळखीची असो,
वा नागमोडी वळणाची असो,
ठेवा तयारी सदैव चालण्याची ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 6 December 2021

गझल :- ७



भुजंगप्रयात वृत्त :- लगावली : लगागा लगागा , लगागा लगागा
मात्रा : २०
कितीदा मनाला... तिने थोपवावे
कसे प्रेम त्याच्या... मनी रूजवावे ...

असे मी दिवानी... तुझी प्रेम वेडी
तुला सारखे मी... पुन्हा आठवावे ...

दिले हृदय तुजला... सख्या ते नव्याने
नसे ते बहाणे... तुला ना कळावे ...

मुक्या भावना या... कशा मीच सांगू
मनाने मनाला... सख्या ओळखावे ...

तुझ्या रे सुरांना...असे साथ माझी
तराणे सुरांचे... सख्या आळवावे...

सौ. राजश्री सुहास जाधव. ( काल्पनिक रचना)


सुखाचे किनारे



किती त्या वेदना !
किती ते पहारे
दुःखाने येई
अंगावरी शहारे
वाटे विसरुनी जावे
दुःख ते सारे अन्
शोधावे सुखाचे किनारे
का दिले तू
मनाला जळते निखारे
गवसेल का कधी
ते सुखाचे किनारे
तूच सांग आता
माझ्या मना रे ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 4 December 2021

सार्थक

आज सकाळपासूनच खूप अस्वस्थ वाटत होते. कधीपासून मनात जे ठरवले होते ते आज मी करणार होते. फायनली आज मी माझा तेरा वर्षांचा संस्थेतील प्रवास संपवणार होते. काही वैयक्तिक अडचणींमुळे
मी हा निर्णय घेतला होता.
           आज मी माझा राजीनामा दिला होता. या एवढ्या कालावधीत खूप सारे ऋणानुबध जुळले होते. जेव्हा फॉर्मवर सही करत होते तेव्हा नकळत डोळे भरून आले. आमच्या वरिष्ठ मॅडमना तर मान्यच नव्हते की राजीनामा द्यावा. पण निर्णय माझा होता. त्यांनी मला सांगितले की ' तू कधीही फोन कर, तुला आम्ही कायमचे बाय केले नाही , तू पुन्हा जॉईन होऊ शकतेस. आम्हाला जुनी माणसं हवी आहेत.' या त्यांच्या बोलण्याने मला खूप हायसं वाटलं.
            घरी परतताना डोळ्यांसमोर माझा संस्थेतील सारा प्रवास तरळून गेला. आम्हाला योग्य ते प्रशिक्षण देऊन कॉर्पोरेशन मधील शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी तील मुलांचा वाचनाचा पाया पक्का व्हावा याकरिता शाळेत संस्थेमार्फत वाचनतास घेण्यास रुजू केले जात असे.
            सुरुवातीस मला थोडे कठीण वाटले . एवढी छोटी मुले, त्यांची जबाबदारी आपल्यावर. आपल्याला नीट जमेल का ? पण जमले. इयत्ता पहिलीच्या वर्गात
तर सुरुवातीचे १-२ महिने त्या मुलांना आपली सवय लागावी, ओळख व्हावी , एका जागी मुलांना बसण्याची सवय लागावी म्हणून गंमत शिबिरातून वेगवेगळ्या सृजनशील कृती  उदाहरणार्थ चिकट काम, कोलाज काम , आवाज ओळखणे,चित्र रंगवणे,  गाणी , गोष्टी मुलांबरोबर घेत असे. पण जेव्हा मुलांशी माझी चांगली ओळख झाली तेव्हा मुले वाचनतासाची आतुरतेने वाट पाहत असे.
           प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना वहीत लेखनाचा , वाचनाचा सराव दिला की मुले तो अभ्यास आवडीने करत असे. ते करतानाच जर एखादा मुलगा किंवा मुलगी अबोल असेल तेव्हा त्याला बोलते करण्यासाठी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या दृष्टीने त्या मुलाला हाताळले की ते मूल आपोआप बोलते व्हायचे. एकंदरच मुलांना माझा, माझ्या बरोबरील सहकाऱ्यांचा खूपच लळा लागला होता.
          या तेरा वर्षांत जवळ जवळ ५ ते ६ शाळांमधून वाचनतास घेण्याचे काम केले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. पण मुलांचे प्रेम मात्र तेच होते.
          सुरुवातीस मुलांच्या शाळेत जेव्हा वाचन तास घेण्यास जात होते. तेव्हा बहुतेक मुले ही वस्तीत राहणारी, प्रत्येकाचे घरचे काही ना काही प्रोब्लेम होते. अशा वातावरणात वाढलेली ही ३ री, ४ थी ची मुले वर्गात माझे अजिबातच ऐकत नसायची. मी नविन असल्याने आमच्या
बरोबर आमच्या ताई असायच्या पण त्या दुसऱ्या वर्गातही जायच्या त्यामुळे माझ्या एकटीवरच त्या मुलांना शांत बसवून वाचन घेण्यासाठी माझे कसब पणाला लावावे लागत होते.  सकाळी मुलींच्या विभागात मात्र अजिबात
त्रास पडायचा नाही. मुली शांत बसून सर्व काही सांगितलेले, फळ्यावर दिलेला अभ्यास व्यवस्थित करत असे. मुले मात्र वर्गात खूप गोंधळ घालत असे. फक्त गाणे, गोष्ट ऐकताना तेवढी शांत बसत असे. फळ्यावर अभ्यास
दिला की त्यांचा गोंधळ सुरू व्हायचा. त्यामुळे हा तास कधी संपेल असे मला व्हायचे. एकदा दोनदा तर मी रडायचीच बाकी होते. पण तरीही मी तितक्याच तळमळीने मुलांचा वर्ग घ्यायचे.
          एकंदरच मला शाळेत शिकवण्याची व मुलांनाही वाचनाची गोडी लागली होती. एकदा वर्गात पाऊल ठेवले की मग कसलेच विचार डोक्यात यायचे नाही. फक्त वर्ग आणि वर्गातील मुले एवढेच माझे विश्व असायचे.
         कधी कधी तर चौथीच्या किंवा मोठया  वर्गातही अशी मुले असायची की त्यांना एकही मुळाक्षर वाचता, लिहिता येत नसे. तेव्हा ते तर आमच्यासाठी एक चॅलेंजच असायचे. मग सर्वतोपरी त्या मुलाला मार्गदर्शन करून, शैक्षणिक साधन साहित्यातून, वहीत सराव देऊन, पालकांचा सहभाग घेऊन त्या मुलास वाचनाच्या प्रवाहात आणायचे हेच ध्येय डोळ्यासमोर असायचे. जेव्हा त्या मुलांना वाचता, लिहिता येऊ लागले की मनाला खूप समाधान वाटायचे. आपल्या कामाचे सार्थक झाले असेच वाटायचे. कळत नकळत शाळेतील मुलामुलींशी एक
आपुलकीचा बंध निर्माण झाला होता.
           एके दिवशी मी अशीच दुसऱ्या शाळेत जायचे म्हणून बस स्टॉपवर उभी असताना २ मुले माझ्याजवळ आली. त्यातील एक मुलगा माझ्या पाया पडला आणि म्हणाला , ' मॅडम आशीर्वाद द्या, आज माझा दहावीचा
पहिला पेपर आहे. मी त्याच्याकडे पाहिले, मला चेहरा लक्षात आला पण नाव पटकन लक्षात आले नाही. मग त्यानेच त्याचे नाव सांगितल्यावर लक्षात आले. तो माझ्या आधीच्या शाळेतील चौथी इयत्तेतील विद्यार्थी होता. जो
वर्गात अतिशय त्रास द्यायचा. पण आज तो माझा आशीर्वाद घेऊन मला म्हणाला, ' मॅडम तुम्ही मला वाचायला शिकवले.' तेव्हा मनाला खूप आनंद झाला. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
         अजूनही कुठेही, कधीही काही विद्यार्थी भेटतात, आवर्जून ओळख देतात, कृतज्ञता व्यक्त करतात. तेव्हा होणारा आनंद हा अद्वितीयच.
         परिस्थिती सारखी बदलत असते. मध्यंतरी ह्या करोनाच्या काळामध्ये सर्व चित्र पालटले. मुलांबरोबरचा संवाद खुंटला. ऑनलाईन शिक्षण चालू असले तरीही त्याला मर्यादा आल्या आणि मलाही काही कारणास्तव
राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
          जे घडते ते चांगल्यासाठीच घडते, असे म्हणायचे आणि आपली वाट पुढे चालत राहायचे. देवाने आणखी काही तरी चांगले माझ्यासाठी योजले असेल नाही का !
     
     सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 3 December 2021

डोळे



जे भाव शब्दातून व्यक्त करताना कधी कधी संकोच वाटतो, तेच भाव डोळ्यांतून सहज व्यक्त होत असतात. आईचे तिच्या मुलांवरील प्रेम, कधी कधी एखाद्या शिक्षका विषयी वाटत असलेली भीति, वडिलांविषयी चा आदर, आपल्या देशाबद्दल वाटणारा अभिमान, मैत्रीचा भाव इत्यादी. हे सारे काही डोळ्यांतून व्यक्त होत असते.
      डोळे खूप काही सांगून जातात. डोळ्यांतूनच माणूस कसा आहे, ते समजू शकते. डोळ्यांतून कधी प्रेमळ,कधी हासरे, कधी बुजरे, कधी लाजरे, कधी अवखळ, कधी भिडस्त, कधी कोपिष्ट, कधी निखारे, कधी सौम्य, कधी
हळवे, कधी रागीट, कधी विस्मयकारक, कधी भयप्रद भाव प्रकट होत असतात. त्यामुळेच कवी, चित्रकार ह्या डोळ्यांच्या प्रेमात पडून कविता रचत असतो, चित्रकार
सुंदर चित्र रेखाटत असतो. 
        ' डोळे ' हे माणसाच्या शरीरातील महत्वपूर्ण अवयव. डोळे जर निरोगी असेल तर माणूस कायम आनंदी राहून सृष्टीतील आनंद उपभोगू शकतो. म्हणून डोळ्याची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे  आहे.  आपल्या आजू बाजूस हर तऱ्हेचे प्रदूषण दिसून येते. सर्व कामे ही लॅपटॉप, संगणकावर  होत असल्याने ,शिक्षणही सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने, डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत.डोळ्यांचे विकार अगदी लहानपणीच उद्भवत आहे. अशा वेळी डोळ्यांवर योग्य ते उपचार घेणे, त्यांना जपणे खूप आवश्यक आहे. त्याकरिता डोळ्यांचे  व्यायाम केले पाहिजे. डोळ्यांचा थकवा  घालवण्यााठी डोळ्यांवर थंड गुलाब जलच्या पट्ट्या, काकडीच्या चकत्या ठेवल्या की डोळ्यांचा थकवा जाण्यास मदत होते.
      असे म्हणतात ज्याला डोळे नसतात त्याला एक सहावे इंद्रिय देवाने दिलेले असते. त्याद्वारे त्या माणसाला पटकन एखाद्या गोष्टीचे ज्ञान होत असते. ते  डोळे  असलेल्या  माणसाकडे नसते. ज्याला डोळे नसतात त्याला डोळ्यांची खरी किंमत कळते. आज भारतात, जगभरात खूप अंध व्यक्ती आहेत  ज्यांना डोळ्यांची गरज आहे. म्हणून मरणोत्तर ' नेत्रदान ' हे खरोखर सर्वश्रेष्ठ दान आहे. डोळे दान केल्याने  माणसाला जणू नविन जन्मच मिळत असतो. या डोळ्यांतून तो  पुन्हा सर्व
काही  पाहू शकतो, अनुभवू शकतो. 

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 2 December 2021

गझल - ६



वृत्त :- व्योमगंगा लगावली :- गालगागा गालगागा  गालगागा गालगागा
मात्रा : २८

धुंदलेल्या या मनाला ... लागलेली आस आहे
गुंतले प्रेमात आता ...  तूच माझा खास आहे

तू दिलेल्या मोगऱ्याची ... फूल वेणी माळताना
धुंद वेड्या पाकळ्यांना ... यौवनाचा वास आहे

क्षण सुखाचे आज आले ... का करावी काळजी रे
तोड सारे बंध आता ...     रोखला मी श्वास आहे

प्रीत माझी साद घाली ...  दूर गेला तूच का रे
सावराया या मनाला ....  केवढा हा त्रास आहे

चांदराती आठवांनी ...  दाटले नयनांत पाणी
वाट पाहे साजनाची ... सोबतीला भास आहे

सौ. राजश्री सुहास जाधव.


माझे भावविश्व



नाते मग ते कोणतेही असो , बहिण भावाचे, आई वडिलांचे , पती पत्नीचे, मित्र मैत्रिणींचे , प्रियकर प्रेयसीचे ; त्या नात्यांना जर जखडून ठेवले तर मग मनाची
घुसमट जास्त होते.  माणूस नात्यांना  त्याच्या बंधनात अडकवण्यास लागला की मग ती नाती नकोशी वाटू लागतात. 
         कित्येकदा असे नकळत घडते की आपण वाजवी पेक्षा एखाद्या नात्यात गुंतत जातो. स्वतःचं, जगाचं, कसलं च भान राहत नाही मग आपल्याला. त्याच विचारांनी आपल्या मेंदूवर ताबा घेतल्याने दुसरे काही करण्याची इच्छा मग आपल्याला राहत नाही. ह्याचा परिणाम आपल्या मनावर तर होतोच पण आपण आपली मनशांती
घालवून बसतो. त्याच्या परिणाम आपल्या शरिरावर देखील होतो. शिवाय लोकांचे टोमणे खावे लागतात कारण लोक तर नावं ठेवण्यास कायम तत्परच असतात.
       एखाद्या गोष्टीच्या किती आहारी जावं ह्याचे भान  आपण राखले पाहिजे. विनाकारण कोणत्याही नात्यात
गुंतून स्वतःचे मानसिक , शारिरीक संतुलन का बिघडवावे?
          जी नाती आहेत ती कायम जर घट्ट राहावी असे वाटत असेल तर , नात्यांना मोकळीक द्या. एकमेकांवर विश्वास ठेवा. अधिकार गाजवण्यापेक्षा प्रेमाने मन जिंका.
प्रत्येकाला स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे . त्यानुसार त्याला जगू द्या.  विनाकारण अपेक्षांचे ओझे नात्यांवर लादू नका.
जास्त गुरफटून न जाता संयम बाळगा म्हणजे कसलीच चूक होण्याची शक्यता नाही. विनाकारण वाहवत जाणे हे
कोणाच्याच हिताचे नसते. ह्याची कायम जाण ठेवावी.
       कोणतेही नाते असो ते निर्मळ असावे, निःस्वार्थ असावे. तिथे समर्पण असावे .समजून घेण्याची मानसिकता असावी. वर्चस्व गाजवण्याची वृत्ती नसावी.
         जी ती नाती त्या त्या ठिकाणी योग्यच असली पाहिजे. आपण आपली कर्तव्य चोख बजावली पाहिजे.
अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपले कर्म करत राहायचे. स्वतःवर विश्वास ठेऊन नात्यांना जपले पाहिजे. स्वतः आनंदाने जगावे आणि इतरांनाही जगू दिले पाहिजे. नुसतेच गुंतून
राहून का स्वतःला त्रास करून घ्यावा.? त्यापेक्षा आयुष्य
दिलखुलास जगा आणि त्याचा भरभरून उपभोग घ्या.
  ' गुंतणार नाही आता कशात, जगेल मी माझ्याच भावविश्वात ' ......

सौ. राजश्री सुहास जाधव.



     


Wednesday, 1 December 2021

शोध सत्याचा

 
       या जीवन सागरात खरे तर आपण सारेच नाविक
आहोत.  ही जीवन नौका पार करण्यात जो तो त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. कोणी अतिशय तरबेज
असतो, तर कोणाची दिशा भरकटते , कोणी त्यातून अगदी सहिसलामत बाहेर पडतो.
       आपण जर आपल्या आसपासचे किंवा समाजात
घडत असणाऱ्या घटनांचे अवलोकन  केले तर आपणास
असे लक्षात येते की, असे एकही ठिकाण नाही जिथे
अफवा नाही. जिथे तिथे  आपल्याला धादांत खोटेपणाच
आढळून येईल.
       अगदीच सांगायचे झाले तर वर्तमान पत्रात रोज येणाऱ्या बातम्या, जाहिराती  ह्या सगळ्याच तंतोतंत खऱ्या असतात का ? हा प्रश्न नेहमी मनाला माझ्या भेडसावत असतो. कधी कधी आपला वाचक वर्ग वाढावा म्हणून त्या बातम्या अगदी तिखट मीठ लावून छापल्या जातात. आपणही मग त्यामध्ये वाहवत जातो. सगळेच असे करतात असेही  मी म्हणणार नाही. कारण अजूनही उत्तम असे लेख , माहिती, घडामोडी आपल्याला ह्या माध्यमातूनच मिळत असतात. आपण फक्त शहानिशा
करणे महत्वाचे असते.
          टीव्ही वर येणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती पाहून आपण त्याला भुलून जातो , जसे की, अमुक हे खा आणि
आठवडाभरात वजन घटवा, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी अमुक अमुक क्रीम लावा . खरोखर हे
कितपत खरे होते. आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही
आणि नाना तऱ्हेचे उपाय भरमसाठ पैसे मोजून करतो
पण रिझल्ट्स काही केल्या मिळत नाही.
      त्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा
नियमित व्यायाम करा, नेहमी हसतमुख राहा, पौष्टिक खा,म्हणजे आपोआप आपल्या सौंदर्यात भर पडेल.
         आज सोशल मीडिया मध्ये तर अफवांना उधाण आलेले असते. एकाने एखादी पोस्ट शेअर केली की इतर लोक ही म्हणजे आपण सारेच, कुठलीही सत्यता न  पडताळता पुढे तीच पोस्ट फॉरवर्ड करतात. त्यामुळे  समाजात चुकीचे संदेश जातात , त्यातून मग विषयाला
वेगळे वळण प्राप्त होऊ शकते, लोकांच्यात मतभेद निर्माण होतात, अराजकता माजते. ह्याला कारण
म्हणजे कोणतीही गोष्ट सोयीस्कररित्या खोटे बोलून लोकांच्या गळी उतरवण्याचे काम ही वेगवेगळी
माध्यमे करत असतात.
        आपल्या नाते संबंधातही खूप वेळा असा खोटेपणा
आपल्या दिसून येतो. वर वर आपली आपली म्हणवणारी
बऱ्याच वेळा मनातून आपला द्वेष करणारी असतात. आपल्यावर जळणारी असतात. कधी  पलटून वार करतील , हे सांगताच येणार  नाही.
       ह्या साऱ्यातून निभावयाचे असेल तर , ह्या जीवन
सागरात वावरताना आपण तरबेज असले पाहिजे.
अफवांच्या या पेवात आपल्याला सत्य हे शोधता आले
पाहिजे, तरच आपण खरे ह्यातून तरून जाऊ शकतो.

सौ. राजश्री सुहास जाधव.


ती वेळ परत यावी


ती वेळ परत यावी
सत्य युगाची ती वेळ परत यावी
मग भीती कशाची न उरावी
भयाने अन् दुःखाने
ग्रासलेले नसावे कोणी
हिंसेचे अन् व्यभिचाराचे
नामोनिशाण जावे मिटूनी
मोकळा श्वास घेण्या नारीस
ना संकोच वाटावा मनी
जगण्याची भ्रांत ना
कोणासही उरावी
अवघी सृष्टी ही
आनंदाने फुलावी
भक्तीचे बीज रुजावे मनी
नेईल तो ईश्वर साऱ्यांना तारूनी
वाट पाहते रे भगवंता
मी या निकोप वेळेची ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...