तरुण वयात असताना अंगात सळसळते रक्त असते. एक वेगळाच जोश अंगात असतो. जणू सारे काही माझ्याच
आवाक्यात आहे. एक वेगळीच धुंदी, कैफ तरुण वयात असते. त्यावेळी मग मोठ्यांनी दिलेले सल्लेही मग आऊट
डेटेड वाटतात. हम करे सो कायदा, अशी वृत्ती त्या वयात
तयार होत असते. एक वेगळ्याच जगात ही तरुणाई वावरत असते. प्रेमाच्या धुंदीत ते जगत असतात. पण प्रेम म्हणजे नेमके काय हे तरी त्यांना माहित असते का? ते फक्त एक आकर्षण असते त्या वयातील आणि मग विनाकारण त्यात ही तरुणाई वाहत जाते आणि नको त्या गोष्टी करू लागतात. थ्रील म्हणून वेगवेगळ्या नशा करून त्यातच अडकून जातात. त्याचे दुष्परिणाम मग त्यांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भोगावे लागतात. सगळेच तरुण तसे नसतात पण एकंदर जर पाहिले तर लक्षात येऊन जाते.
तरुणच काय पण इतर कोणत्याही वयातील व्यक्तीच्या बाबतीत असे होऊ शकते. त्यांना पैशाच्या जोरावर सर्व काही विकत घेता येते असेच वाटत असते. त्या धुंदीत मग ते वाटेल ते करून , पैशाचा, स्वतःच्या नावाचा गैरवापर करून, चुकीचे मार्ग अवलंबून हवे ते साध्य करत असतात. पण हे पुर्णतः चुकीचे आहे. पैसा , नाव हे चिरकाल राहू शकत नाही . नाव कमावण्यासाठी तशी वर्तणूकही चांगलीच हवी असते. पण सत्ता, संपत्तीच्या धुंदीत अशा लोकांची विचार करण्याची क्षमताही खुंटलेली असते. मग एक ना एक दिवस हा सर्व उन्मत्त पणा , कैफ सारे उतरून जाते. जेव्हा जी माणसे आधी त्यांची हाजी हाजी करत असतात तीच त्यांच्या
उतरत्या काळात त्यांना सोडून जातात. कारण ती म्हण आहे ना ' जिथे मिळे पोळी, तिथे गोंडा घोळी ' तशी एकूण गत असते.
कैफ असावा पण तो चांगल्या गोष्टींचा असावा. कैफ
तुम्ही लिखाणाचा करा, तुम्ही शिक्षणाचा करा ,नवनविन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जे जे उत्तम, त्याचे करावे चिंतन. अध्यात्म, ईश्वर ह्यांच्या विषयी जाणून घेण्याचा मानस नेहमी करा. चांगले, दृढ संकल्प करा. समाजाशी काही आपण देणे लागतो , या भावनेतून दुसऱ्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो , हे सतत
तुम्ही स्वतःस विचारा. बोलणे जरी खूप सोपे असले तरी ह्या सर्वच गोष्टी जरी आपल्याला नाही जमल्या तरी आपल्या भोवताली अनेक अशी माणसे दिसतील त्यांना
खरोखर मदतीची गरज आहे. त्यातील एकाला जरी आपण आपल्या क्षमतेनुसार मदत केली तरी खूप आहे.
ह्यातील काही जरी नाही साध्य झाले तर कैफ हा
तुमच्यात असा असावा की कष्टाने स्वतःस तुम्ही घडवू शकाल. जिथे तुम्ही हात घालाल त्याचे सोनेच होईल, अशी धमक तुमच्या अंगी असावी.
सौ. राजश्री सुहास जाधव.
खरच खूप छान लेख लिहिला आहे ..
ReplyDeleteकैफ हा चांगल्या गोष्टीचा असावा वाईट गोष्टींचा नाही ..तरुण वयात नको त्या गोष्टीचं आकर्षण वाटत हे अगदी खरं आहे . पण त्या आकर्षण ना वरही कंट्रोल करता येतो .खूप छान लेख लिहिला तुम्ही
खूपच छान लेख 👌👌👌
ReplyDeleteकैफ... सुंदर लिहिलं मॅडम! उसळते रक्त सोनं उगवणारे असावे हे खरे!👌👌👌
ReplyDelete