नमस्कार 🙏
प्रिय सख्यांनो, नुकतीच नवरात्र संपल्याने कित्येकांच्या घरात आता पुन्हा मांसाहार खाणे चालू झाले असेल. आमच्याही घरात श्रावण महिन्यापासून मांसाहार खाणे बंद होते. त्यामुळे आता मात्र मुलांना हवे ते बनवून देणे गरजेचे होते. म्हणून त्यांच्या आवडीचे 'बटर चिकन ' अगदी हॉटेलच्या चवी सारखे बनवले होते. मुलेही खूप खूश झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला ही समाधान वाटले.
अगदी सोपी अशी पाककृती आहे. चला तर मग पाहूया कसे बनवतात 'बटर चिकन'.....
साहित्य :- ५०० ग्रॅम बोनलेस चिकन, प्रत्येकी २ चमचे आले, लसूण पेस्ट( तुम्ही जास्तही घेऊ शकता ), तिखट १ मोठा चमचा ,गरम मसाला पावडर १ मोठा चमचा, ४ मोठे कांदे, ५ ते ६ टोमॅटो, बटर एक पॅकेट, १५ ते १६ काजूचे तुकडे , कसुरी मेथी १ चमचा , फ्रेश क्रीम २ चमचे तेल, मीठ , साखर .
कृती :- चिकन स्वच्छ धुऊन त्याला आले, लसूण पेस्ट
करून चिकनला लावून घेणे, त्यात १ चमचा तिखट
घालणे, चवीनुसार मीठ घालणे , आवडत असेल तर २
चमचे लिंबाचा रसही घालणे. चिकन तसेच १५ ते २०
मिनिटे झाकून ठेवणे.
तोपर्यंत चिकन साठीचा मसाला तयार करणे.
४ मोठे कांदे उभे किंवा हवे तसे चिरून ते कढई गरम
झाल्यावर त्यात परतण्यासाठी घालणे, एक मोठा चमचा
बटरही त्यात घालणे. नंतर टोमॅटो चिरून तेही त्यामध्ये
घालणे. आले ,लसूण पेस्ट घालणे . १ चमचा तिखट, १
मोठा चमचा गरम मसाला पावडर,१५ ते १६ काजूचे तुकडे मीठ चवीनुसार घालून हे सर्व मिश्रण १ ग्लासपाणी घालून १० ते १५ मिनिटे शिजू देणे.आवडत असेल तर एक चमचा साखर त्यात घालणे. ते गार झाले की मिक्सर मधूनअगदी बारीक वाटून घेणे.
आता चिकन जे आपण मसाला लावून झाकून ठेवले होते ते चिकनचे तुकडे कढईत २ चमचे तेल घालून छानपैकी शॅलो फ्राय करून घेणे. सर्व चिकन शॅलो फ्राय करून घेणे.
आता गॅसवर कढई ठेऊन तयार केलेले वाटण अगदी थोडे पाणी घालून कढईत शिजवण्यास ठेवणे, त्याला उकळी आल्यानंतर फ्राय केलेले चिकन कढईत घालणे , १ मोठा चमचा बटर घालून १० मिनिटे शिजू देणे. त्यात थोडी कसुरी मेथी, फ्रेश क्रीम घालून नंतर गॅस बंद करणे .
मीठ आधी घातले असल्याने पुन्हा मीठ घालण्याची गरज नाही. त्यावर कोथिंबीर बारीक चिरून घालणे. मस्त, हॉटेल सारखे 'बटर चिकन ' झाले तयार !
चपाती, रोटी, परोटा किंवा नान बरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करून पाहा , अशा पद्धतीने चिकन, तुम्हाला नक्कीच आवडेल.
सौ. राजश्री सुहास जाधव.