Friday, 26 November 2021

देवाण-घेवाण

' तुला जे पाहिजे आहे, ते घेऊन जा 'असे उद्गार हे आपल्याला नेहमीच मातापित्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळतात किंवा पती - पत्नीच्या गोड नात्यांमध्ये हा संवाद घडत असतो.
               आपले जन्मदाते हे कायम आपल्याला देतच असतात. त्यांचे प्रेम, संस्कार, त्यांचा वेळ, त्यांचे धन सारं काही ते मुलाबाळांकरिताच असते. पण त्याच्या बदल्यात ते कधी आपल्या मुलांकडून काही मागत नसतात. त्यांना फक्त देणे माहिती असते. त्यांना जर तुमच्याकडून काही
हवे असेल तर ते म्हणजे चार प्रेमाचे शब्द आणि तुमचं अवधान. हे अवधान जर सर्व मुलामुलींनी आपल्या मातापित्यांना दिलं तर वृद्धावस्थेत उपेक्षेचं जिणं त्यांना भोगावे लागणार नाही.
          आपल्याकडील चांगले विचार, अवगत गुण दुसऱ्याला देऊन त्याच्याकडील चांगले आचार, ज्ञान आपण घेतले तर ह्या देवाणघेवाणीतून आपण इतरांपर्यंतही ज्ञानाचा प्रसार पोहोचवू शकतो. आपल्या सभोवतालीही ज्ञानदीप झगमगता ठेऊन अज्ञानाचा अंधकार नष्ट होण्यास मदत होईल.
           एखाद्या निरक्षरास आपल्याकडील ज्ञानाने साक्षर केले आणि त्याच्याकडील व्यवहार ज्ञान आपणास मिळाले तर दोघांनाही त्यांतून संतुष्टता,आनंदच प्राप्त होईल. बरेच वेळा असे दिसून येते की अगदी निरक्षर असलेल्या व्यक्तीकडे व्यवहार ज्ञानाचे चातुर्य जबरदस्त असते.
             अशा छोट्या, मोठ्या आदानप्रदानाने समाज सुधारण्यास हातभारच लागेल.

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...