कणभर राग देते मणभर दुःख, येता राग जीवन होते बेचिराख.
'राग' येणे ही माणसाच्या अंतर्गत असलेली भावना आहे जी उफाळून बाहेर येते. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, किंवा एखाद्याने अपमानास्पद वागणूक दिल्याने, किरकोळ कारणावरून, सततच्या उपेक्षेने, परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, ही सारी राग उत्पन्न होण्याची कारणे आहेत.
आपण वर्तमान पत्रात नेहमी बातम्यात वाचत असतो, रागाच्या भरात डोक्यात दगड घालून खूण केला, किरकोळ बाचाबाची वरून भांडणं विकोपास, दारू पिऊन रागाच्या भरात पतीची पत्नीस बेदम मारहाण; अशा कितीतरी बातम्या आपल्याला वाचण्यास मिळतात.
'राग' येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. अन्याय जर होत असेल तर तिथे राग हा आलाच पाहिजे. जिथे चुकीचे घडत असेल तिथे राग येणे बरोबर आहे. पण तो राग कशाप्रकारे व्यक्त केला पाहिजे तेही तितकेच महत्त्वाचे आहे.
राग व्यक्त करताना इतरांना त्यापासून हानी पोहोचणार नाही याची काळजी माणसाने घेणे खूप महत्त्वाचे आहे. अति रागाने माणूस समोरील व्यक्तीस मानसिक त्रास तर देतोच शिवाय त्या रागाचा विस्फोट झाला तर स्वतःस व इतरांसही या रागाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काहीवेळेस अति राग समोरील व्यक्तीस
शारिरीक इजा पोहोचवू शकतो. माणसाचे एकमेकांचे नाते संबंध रागामुळे दुरावतात.
कामाच्या ठिकाणी जर तुम्ही सतत चिडचीड, राग राग करत असाल तर तेथील वातावरणात नकारात्मकता निर्माण होऊन त्याचा परिणाम तुमच्या व इतर सहकाऱ्यांच्या कामावर होऊ शकतो. तसेच ते सहकारी तुमच्या पासून दूरच राहतील.
काही माणसांना उगाचच सतत चिडचीड, रागवायची सवय असते. त्यामुळे ती व्यक्ती आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंदी ठेवू शकत नाही. अशा व्यक्तीशी मग इतर लोक बोलण्याचे टाळतात.
अति रागामुळे व्यक्ती स्वतःचे सौंदर्यही घालवून बसतो. कारण सततच्या रागामुळे त्याच्या कपाळावर सारख्या आठया पडत असतात व त्या आठ्या त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे व्यक्तीचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. परिणामी त्याचे सौंदर्य नाहीसे होते.
माणसाने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास हवे. राग आला तर थोडा वेळ डोळे मिटून शांत बसावे. दुसऱ्यांनाही राग येऊ शकतो, हे विचारात घ्यावे. दुसऱ्यांचे म्हणणेही ऐकण्याची सवय ठेवावी. समोरच्या व्यक्ती कडून जास्त अपेक्षा न ठेवावी. स्वतःची चूक असेल तर मान्य करावी. कायम क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करावा.
ह्या गोष्टी जर माणसाने अमलात आणल्या तर माणसाचे रागावर नियंत्रण राहू शकते. माणूस आतून शांत होऊ शकतो.
आपल्या क्रोधाला लगाम घालण्यासाठी ध्यानधारणा करणे खूप गरजेचे आहे. रोज नियमाने
थोडा वेळ तरी माणसाने एकाग्र चित्ताने ध्यानास बसावे. सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा. संत साहित्य, श्रवणीय गीत, संगीत ऐकावे, चांगले साहित्य वाचावे. असे अनेक मार्ग माणसाच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी पडतात.
सौ. राजश्री सुहास जाधव.
.
क्षमा वीरस्य भूषणम्.... वाचनीय लेख👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम लेख
ReplyDeleteयोग्य विचार मांडला आहे तोही अगदी योग्य शब्दांत
ReplyDeleteअल्प शब्दांत महान सकारात्मक विचार!✍️👌👌👌
ReplyDelete