Wednesday, 30 March 2022

स्वरामृत



पहाटे पहाटे जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर 
आपल्या कानावर निरनिराळे स्वर पडतात. पक्ष्यांचा 
तो सुंदरसा किलबिलाट, कोकिळेचे मंजुळ स्वर ऐकून
मनाला खूप प्रसन्नता लाभते आणि असे वाटते की ह्या निसर्गाच्या सान्निध्यातच दिवसरात्र राहवे. नीट कान देऊन 
ऐकले की त्या नीरव शांततेत येणारे अगदी कोणतेही आवाज मग ते माणसांचे असो, स्त्रियांच्या बांगड्यांचा किणकिणण्याचा आवाज असो किंवा सकाळी सकाळी चहापानासाठी तयारी करताना होणारा तो कपबश्यांचा आवाज, प्राणी - पक्ष्यांचे विविध आवाज, अगदी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे ज्यास अस्तित्व आहे, वर्दळीचे, 
नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाचे, सकाळी सकाळी भक्तीत लीन होऊन गाणाऱ्या भक्ताचा स्वर हे प्रातःकाळी कानावर पडले की ते ऐकण्यास मधुरच वाटतात. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असावी लागते आणि कान , डोळे हे 
सजग असले पाहिजे. हे सारे स्वर हे अमृतासमान गोड भासतात.  
         त्याप्रमाणेच जे थोर संत होऊन गेले त्यांची संतवाणीही,अभंगवाणी  अमृताहूनही अवीट आहे. कितीदा ती ऐकली तरी मन भरत नाही. त्यातून जीवनाचे 
सार आपल्याला प्राप्त होते. पाप आणि पुण्यातील फरक 
लक्षात येतो.  आत्मचिंतन , परोपकार , निखळ आनंद, सेवाभाव, सहिष्णूता , आत्म्सुख नेमके कशात आहे , या 
साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या वाणीतूनच आपल्यापर्यंत 
सहज पोचतात. तो स्वर जाणण्यासाठी तसे हृदय माणसाने तयार करणे गरजेचे आहे .
       स्वर मग तो कोणताही असो जो मनापासून उच्चारला तर तो गोड होऊन जातो. जसे की नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचा रडका स्वरही मातेस  अमृतासमान गोड वाटतो. 

सौ.  राजश्री सुहास जाधव.


        

    

Tuesday, 29 March 2022

एक अविश्वसनीय सत्य

मनातील डायरीचे पान 🌿🌿: पुरुषांचे वर्चस्व आणि स्त्री

कितीही होऊ दे समाजात परिवर्तन,
तरीही खरेच मिळते का स्त्रीस समर्थन?
शिकून सवरून होऊ दे कितीही मोठी,
थोपवले जाते जबाबदारीचे ओझे तिच्याच पाठी.....

वर्चस्व असते कायम पुरुषांचेच समाजात,
असाच तर पडलाय खरा प्रघात
स्त्रीला दिले जाते नावापुरते वरचे स्थान,
केले जातात वारंवार तिच्यावरी आघात.....

नाही म्हणत सगळेच पुरुष असतात तसे,
पण तरीही स्त्री समाजात दुय्यमच असे
महत्वाचे निर्णय घेणे, हे जणू पुरुषांचे काम
स्त्रीच्या पाचवीला  मात्र पुजलेले असते घरकाम.....

कोणी ठेवा अगर नका ठेऊ विश्वास,
हेच खरे आहे अविश्वसनीय सत्य
दिले असले समाजाने स्त्रीस हक्क,
तरीही पुरुषाच्याच हाती असते घराचे सारथ्य .....

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

सौ. राजश्री सुहास जाधव.

Monday, 28 March 2022

मी पणा

अविश्वसनीय सत्य हेच आहे,
स्वतःवरील प्रेमात नेहमीच
असतो माणूस मग्न,
देतो तो आधी स्वतःस प्राधान्य,
स्वतःपुढे इतर, त्याच्या तुलनेत नगण्य.....

माझे, मला ,मी , माझ्याकरिता,
ह्यातच गुरफटलेला असतो माणूस
स्वतःचाच अहंभाव मिरवताना
घेत नाही जाणून, कोणाच्याच भावनांचा मागमूस ....

करतही नाही स्वीकार तो सत्य,
असले कितीही जरी त्यात तथ्य
यावे मीपणातून बाहेर आपण,
अन् जगावे दुजांकरिताही
वाटत नाही मनास त्याच्या,
कितीही बजावले जरी त्यास नित्य.....

घेत नाही ध्यानात कधीच,
मृत्यू हेच सत्य अंतिम
देऊ पाहतो हुलकावणी त्यास,
झटत असतो जगण्याकरिताच रात्रंदिन  .....

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

सौ. राजश्री सुहास जाधव.

Saturday, 26 March 2022

वेदना त्या....

खोटे ते हसणे,
जणू अवसान ते उसणे
बनविशी मूढ लोकांस
परी अंतरीच्या वेदनांची,
द्यावी कोणास बरी दुषणे? ....

खोट्या त्या  हास्यावरी
भाळती सारे जण,
जाणीव नसे तयांना काही
सदैव असे विषण्ण ते मन ....

विषण्ण त्या मनास
ठेवावे कसे सचेतन ?
लेऊनी मुखवटा हास्याचा
रिझविती लोकांचे मन ....

अंतरीच्या वेदना त्या
शमतील केव्हातरी,
ठेऊनी आस मनी
उमटवते हास्य अधरांवरी ....

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 25 March 2022

तिची घुसमट

मनातील डायरीचे पान  : 🌿🌿

होणार आहे का,
विचारांचा तुमच्या कायापालट ?
आहे एक विधवा म्हणून,
किती व्हावी तिची फरफट ! ....

विधवा होणे हा काही तिचा गुन्हा नाही,
पण समजेल का कधी समाजाला?
बांधले जाते नित्य तिलाच दावणीला
म्हणे, तयार राहा भोग भोगायला .....

तिला ही आहे ना हो मन अन् भावना,
तरी का यावी तिच्याच वाट्यास अवहेलना ?
मनासारखे जगण्याचा तिलाही आहे हक्क
परी हिणवून तिस, करता तिची कुचंबणा....

हसली, बोलली अन् स्वच्छंद जगली की,
ठरते साऱ्यांच्या नजरेत ती वाईट
ओढूनी तिजवर ताशेरे म्हणती सारे,
'आहेस अभागी तू, वाग जरा नीट' ....

एका विधवेची घुसमट उमजेल का कोणास?
मिळणार आहे का कधी सुख तिला उपभोगण्यास?
होणार आहे का परिवर्तन समाजातील लोकांत ?
नको नुसती सहानुभूती, मिळेल का गती तिच्याही जीवनास  .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 23 March 2022

युद्ध हा पर्याय नव्हे...

मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-

युद्ध हा पर्याय नव्हे :-

आज मनाच्या डायरीतून सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध. ज्याचे पडसाद मात्र संपूर्ण जगावर उमटत आहे. जग खरेच तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने पाऊल तर टाकत नाही ना ! हा विचार नक्कीच मनाला वेदना देऊन जातो. ह्या देशातील युद्धाची झळ जागतिक पातळीवर सर्वांनाच होऊन महागाईचे चटके सोसावे लागत आहे आणि हे असेच चालू राहिले तर पुढेही सर्व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक अर्थव्यवस्था, जीवितहानी ह्या सर्व संकटाना ह्या युद्धामुळे देशाबरोबर, सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणार आहे.
            
             खरेच युद्ध हाच पर्याय आहे का? स्वतःचे वर्चस्व दुसऱ्यावर प्रस्थापित करताना, दोन परस्पविरोधी विरोधी प्रवृत्ती ह्यांच्यातील असलेला संघर्ष, हा कोणत्याही युद्धास कारणीभूत ठरतो. मग ते युद्ध देशा देशातील असो, दोन भिन्न विचाराच्या व्यक्तिंमधील असो, किंवा नात्यातील युद्ध असो, प्रेमातील युद्ध असो, मनातील द्वंद्व असो,
युद्ध हे युद्धच असते. ते कधी रौद्र रूप धारण करते, तर कधी आपापसांत शीतयुद्ध चालू ठेवते. आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या ह्या युद्धास कधी तरी नक्कीच सामोरे गेलेलो असतो, असे मला वाटते. पण ह्यातून काय साध्य होते, फक्त आणि फक्त त्रास, मानसिक, शारिरीक, आर्थिक, नैतिक ह्यापलीकडे अशा ह्या युद्धातून काहीच साध्य होत नाही. पण स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी हक्कासाठी युद्ध करणे, हे चुकीचे नाही. कारण तो आपला हक्क आहे. फक्त ते करताना आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, कोणावर अन्याय न करता जे
सामोपचाराने होत असेल तर त्याप्रमाणे केले पाहिजे.आपले विचार तितके प्रगल्भ पाहिजे आणि वेळ पडली तर लढताही आले पाहिजे, असे मला वाटते.
           
            आजकाल तर क्षणाक्षणाला घराघरात, समाजात वावरताना शाब्दिक युद्ध हे चालू असते. नात्यात तर ते नेहमी दिसून येते. टिव्ही सिरियलचा प्रभाव तर घरातून
स्त्रियांवर इतका झालेला असतो की सासू सुनेचे, दीर, जाऊ, नणंदांचे आपापसांत कधी पटत नाही. टिव्ही मध्ये जसे दाखवतात तसे खऱ्या आयुष्यात मग घडू लागते.
प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करत राहतो, हेवेदावे करतो. अशा ह्या शीत युद्धाचे परिणाम खूपच विपरीत होताना दिसतात. नाती दुरावतात, एकमेकांबद्दल कमालीची असूया वाढीस लागते, कधी कधी तर जीवित हानी देखील होते.  हेच जर सामंजस्याने वागले , ज्याचा मान त्याला दिला, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, आपापसांत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले, एकमेकांशी आदराने वागले मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी असली तरी, मग अशी युद्ध होण्याचा संभवच निर्माण होणार नाही.
         
             त्यामुळे असे वाटते की युद्ध हा शेवटचा पर्याय नसावा, तुम्हाला काय वाटते ?

सौ. राजश्री सुहास जाधव.

Sunday, 20 March 2022

डोकावलं का हृदयात ...



डोकावलं का कधी हृदयात?
ठेवा वा नका ठेऊ विश्वास,
तो ईश्वरच तर आहे कारण
वाल्याचा वाल्मिकी होण्यास.....

हृदयात प्रत्येकाच्या असे 
त्याचाच तर वास,
कधी होतो प्रकट मातेच्या ममतेतून,
कधी प्रकटतो बाल्यावस्थेतून,
कधी पापी, वैरी होऊनी
दावितो त्याचे रूप जगतास....

आहे हे खरे सत्य,
ह्रदयात तो चिन्मय नित्य
परी गवण्यास तो मानवा,
ठेऊनी इंद्रियांवरी ताबा
लागते करावे हृदय ते शुध्द....

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 15 March 2022

तिचा संघर्ष

 


         

ते एक अतिशय सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंब होतं. आई, वडील,दोघी बहिणी, दोघे भाऊ आणि आजी असे. अगदी अलीकडच्या काळातीलच गोष्ट आहे ही. घरात कमवणारे तेवढे एकटे वडील कर्ता पुरुष होते. सरकारी नोकरी होती पण पगार तसा जेमतेमच होता.
तरीही ते सर्व कुटुंब सुखा समाधानाने राहत होते. घरातील स्त्री म्हणजे मुलांची आई अत्यंत काटकसरीने संसार करून घर चालवीत होती. त्यामुळे आहे त्यात ते सुखाने राहत होते. वडिलांना सर्व मुले आबा म्हणत होते. आबा अतिशय सरळ, साधे ज्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. रोज सायकलवरून सकाळी ठरलेल्या वेळेत कामात जात असे आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळेत घरी येत असे.
              मोठा मुलगा  'विनय' हा खूप शिकलेला होता. त्याचे आता लग्नाचे वय झाले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता पण लग्न लवकर जमत नव्हते. मनासारखे स्थळ मिळत नव्हते. त्याच्या आईची म्हणजे सुमती काकूंची इच्छा होती की मुलाने त्यांच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे पण विनयला ते मान्य नव्हते. कारण त्याला नात्यामध्ये लग्न करायचे नव्हते. त्यामुळे सुमती काकूंचाही नाईलाज होता. खूप प्रयत्न केल्यानंतर एकदाचे विनयचे लग्न झाले. एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलीशी, त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मध्यस्थीने लग्न ठरवले गेले होते. अशा तऱ्हेने घरामध्ये मोठ्या घरची लेक सून म्हणून आली होती. घरात सारेच खूप खूश होते. नवीन सुनेचे खूप कौतुक होत होते. सर्वांनाच तिच्याविषयी खूप अपेक्षा होत्या.
             पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. नवीन सुनेला एकत्र कुटुंब नको होते. एवढ्या माणसांची
तिला सवय नव्हती, कामाची सवय नव्हती. त्यामुळे तिला वेगळा संसार थाटायचा होता. पुढे जाऊन तिने ते खरेही केले. ती घरात कोणाशीच बोलत नसे. तिच्या रूममध्येच सारखी ती झोपून राहायची. घरात मोठी नणंद ' विभा' लग्नाची होती. विभाचेही वय जवळ जवळ २७ चालू होते. मोठ्या भावाच्या लग्नामुळे तिचेही लग्न रखडले होते.
         विभासाठी बरीच स्थळे पाहिली होती. पण प्रत्येक वेळेस काहीतरी अडचण येत होती. एकदा तर ठरलेले लग्न ऐनवेळेस क्षुल्लक वादावरून मोडले होते. कोणाला हुंडा हवा होता तर कोणी मुलगी जास्तच फॅशनेबल आहे म्हणून नाकारले होते, तर कोणी तिचे केस छोटे आहेत हे कारण देऊन नकार दिला होता. यामुळे विभा वैतागली होती. ती सारखी उदास राहू लागली. तिच्या बरोबरच्या सर्व मुलींची लग्न झाली होती. लग्नाची अशी तीच राहिली होती. शिवाय शेजारी - पाजारी, तिच्या मैत्रिणी सारख्या तिला लग्नाविषयी विचारत असे ,त्यामुळे ती मनातून जास्तच खचून गेली होती.
         खरे तर विभा अतिशय हुशार, दिसण्यास सुंदर , धाडसी, सर्वगुणसंपन्न होती. ती सुंदर रांगोळ्या काढायची,
भरतकाम करायची, मेहंदीही सुंदर काढायची. स्वयंपाकही उत्तम येत होता तिला. कोणते काम येत नाही, असे
कधीच नव्हते. आईचे सर्व गुण तिने घेतले होते. छोट्या बहिणीसही ती खूप जीव लावत असे. त्यांच्या कॉलनीत
काही कार्यक्रम असला की विभाचा कायम  पुढाकार असे. तिच्या अंगी नेतृत्व कुशलता होती. कॉलनीत गणपती उत्सवात, मंडळाचे देखावे तयार करण्याचे काम तिच्यावरच असे. तीही अत्यंत आवडीने ते करीत असे. तिची आई व मंडळातील मुले, तिचे दोन्ही भाऊ तिला हवी ती मदत करत असे. विभा सुंदर सुंदर देखावे करून देत असे. वेगवेगळ्या स्पर्धेतही ती नेहमी भाग घेत असे. त्यातही तिचा पहिला नंबर ठरलेला असे. इतर मुली त्यामुळे भाग घेण्यास घाबरत असे. अशीही विभा, बिनधास्त स्वभावाची कॉलनीत , नातेवाईकांत सर्वांची लाडकी होती.
            पण हल्ली ती खूप उदास राहत असे. शिवाय तिची वहिनी तिला कधी भांडण झाल्यावर, लग्न ठरत नसल्याने येता जाता टोमणे मारत असे. या सर्वच गोष्टींमुळे विभा वैतागली होती. एकेदिवशी  विभाने सहन न झाल्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. यामुळे घरातील सर्वजण खूप दुःखी झाले होते. तिच्या आईची अवस्था तर पाहवत नव्हती. पण सुदैवाने वेळेवर उपचार केल्याने विभा त्यातून बचावली होती.
           तिने वडिलांना सांगितले होते की 'आता माझ्यासाठी स्थळ पाहू नका.' पण तरीही  वडिलांनी तिचे नाव वधुवर सूचक मंडळात नोंदवले होते. एकेदिवशी त्यांच्यातर्फे वधूवर मंडळाच्या मेळाव्यात ते विभाला घेऊन गेले होते. तिथे एक मुलगा ' श्रीधर ' तिच्या वडिलांना आवडला. त्यांनी त्याची सविस्तर चौकशी केली. विभालाही तो मुलगा बरा वाटला. दुसऱ्याच दिवशी
त्या मुलाचाही वडिलांना फोन आला की त्यांना विभा पसंद आहे. मग काय सर्वजण खूपच आनंदी झाले होते. वडिलांनी विभाला  विचारले तेव्हा ती म्हणाली , ' बाबा मुलगा चांगला आहे पण तो तंबाखू खात असावा, मी त्याच्या हातावर चुन्याचे डाग पाहिले आहे. मला नाही अशा मुलाबरोबर लग्न करायचे.' तिने असे म्हटल्यावर सर्वजण तिला ओरडू लागले की काय हा तुझा वेडेपणा ! सर्वांनी तिला खूप समजून सांगितले की ' तसे काही नसेल, तू उगाचच काहीतरी विचार करतेस. ' विभाने खूप
विचार करून शेवटी लग्नास  होकार दिला. एका अर्थाने लग्न ठरत असल्याने तिलाही समाधान वाटत होते. घरातील वातावरण पुन्हा आनंदी झाले होते. तिची आई तर मनोमन देवाचे आभार मानत होती.
         श्रीधरचे घर गावी होते, तिथे त्यांची थोडी शेती होती. ती त्याचा भाऊ आणि आई पाहत होते. शिकण्यासाठी म्हणून श्रीधर शहरात हॉस्टेल मध्ये राहत होता. लग्नानंतर तो  भाड्याने फ्लॅट घेऊन राहणार होता असे त्याने विभाच्या वडिलांना सांगितले होते.
          अशा तऱ्हेने विभाचे लग्न श्रीधरशी रिती रिवाजानुसार पार पडले. श्रीधरने पुण्यात भाड्याने फ्लॅट घेतला होता. थोडे दिवस गावी राहिल्यानंतर ते पुण्यात राहण्यास आले. विभाला तर संसाराची खूप हौस होती. तिने तिचे घर खूप सुंदर सजवले होते. नवीनच लग्न झाल्याने ती अधूनमधून छोट्या बहिणीस तिच्या सोबत राहण्यास बोलवून घेत असे. तिने स्वतःचे पार्लरही सुरू केले होते. तिचा त्यात चांगला जमही बसू लागला होता. श्रीधर आधी जागा देणे - घेणे हा व्यवहार करत होता पण नंतर त्याने तेही काम सोडून दिले व पुस्तक प्रकाशनाचे काम तो करू लागला होता. सुरुवातीचे ५-६ महिने विभाचे खूप छान गेले. पण नंतर त्या दोघांत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. तिची बहिण तिच्याकडे अधून मधून राहण्यास येत होती. तिलाही ह्या गोष्टी समजल्या होत्या. श्रीधर खरोखरच तंबाखू खात होता. नुसती तंबाखू नाही तर अधून मधून तो दारुही पित असे. विभाला तर व्यसनाची प्रचंड चीड होती आणि तिच्या नशिबी नेमके तेच आले होते.
            हळु हळू त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. श्रीधर साध्या साध्या गोष्टींवरून तिच्याशी भांडण करत असे. जेवण बनविण्यावरूनही विभाला नको नको ते बोलत असे. तरी विभा ते सारे सहन करत होती. ती त्याकडे दुर्लक्ष करायची. तिच्या पार्लरमध्ये स्वतःचे मन ती रमवत असे.
         काही दिवसांनी तिच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आला. विभाला दिवस गेले होते. ती मनोमन खूप सुखावली होती. तिच्या माहेरी ही बातमी कळल्यानंतर सर्व खूप खूश झाले होते. विभाची ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडे सुरू होती. तिला खूप समाधान वाटत होते. पण इकडे श्रीधरचे पिणेही वाढले होते. अशातच एके दिवशी विभास चक्कर आल्याने तिला दवाखान्यात नेले तिथे तिच्या सर्व तपासण्या केल्या तेव्हा त्यातून समजले की विभाला कॅन्सर झाला आहे. ही गोष्ट जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईस सांगितली तेव्हा त्या फार खचून गेल्या. पण डॉक्टरांनी सांगितले की विभालाही हे सांगणे महत्त्वाचे आहे. तेव्हा वडिलांनी धीर एकटवून ही गोष्ट विभास सांगितली, तिला आधार दिला. विभाला सारे संपले आहे असेच वाटत होते. ती पुरती हादरून गेली होती. पण तिच्या बाळासाठी तिने तिचे दुःख बाजूला सारायचे ठरवले व काहीच झाले नाही असे दाखवत तिनेच तिच्या आई- वडिलांना धीर दिला.
          पुढे विभाचे बाळंतपणही काही सोपे गेले नाही. दोन दिवस सतत तिला त्रास होत होता.त्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्यालाही तिच्याजवळ न ठेवता डॉक्टरांच्या देखरेखेखाली आठवडाभर ठेवले होते.
              इतर बाळंतीण स्त्रियांसारखे विभाने मात्र जास्त आराम केला नाही. आई, बहिण तिला समजून सांगायच्या पण ती कोणाचे ऐकायची नाही. तिने २ महिन्यांनी पुन्हा तिचे पार्लर सुरू केले. बाळाचे सर्व करून ती पार्लर चालवत होती. श्रीधर दिवसेंदिवस जास्तच दारू प्यायला लागला होता. कामही तो कधी करत असे, कधी करत नसे. घरातील वस्तू विकून त्याचे पैसे घेत असे. पैशांच्या अडचणीपायी त्याने तिचे मंगळसूत्रही विकले होते. पण तरीही विभाने हार मानली नव्हती.
           तिचा आजार बळावला होता पण तिला स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करायचे होते. खूप खटपट करून ,सर्व  जवळचे दागिने मोडून , कर्ज काढून अखेरीस त्यांनी तिच्या माहेर जवळच स्वतःचे घर बांधले. तिथे तिने पार्लरमध्ये मुलींचे क्लास घेणे सुरू केले. छोट्या बाळाला आईजवळ ठेऊन ती दिवस रात्र काम करत होती. पार्लर बरोबरच तिने स्वतःचे छोटे हॉटेल सुरू केले. जेणेकरून कर्जाचे हफ्ते फिटतील, नवरा तो व्यवसाय पाहिल. हॉटेलही बऱ्यापैकी चालू होते. महिन्याच्या महिन्याला हफ्ते जात होते. विभा त्याकडे जातीने लक्ष देत होती. विभाचे व श्रीधरचे भांडण मात्र कमी होत नव्हते कारण तो पिणे काही सोडत नव्हता. विभाचा छोटा 'मनीष' आता पाच वर्षांचा झाला होता. तेव्हा तिने मोठ्या थाटामाटाने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
           तिचे आजारपण आता वाढले होते. ती वारंवार आजारी पडू लागली. औषधोपचार चालू होते पण त्याचा
काही उपयोग होत नव्हता. आई -वडील जवळ असल्याने ते तिच्याकडे लक्ष देत होते. आता तिला पार्लर कठीण
जात होते. त्यामुळे ते ही बंद झाले होते. नंतर नंतर ती पार अंथरूणाला खिळून होती. तिला तिच्या मुलाचे जास्त
लाडही करता येत नव्हते. आजी आजोबा छोट्या मनीषची खूप काळजी घेत होते. श्रीधरही मनातून घाबरून गेला होता पण कोणाच्याच हातात काही उरले नव्हते.
           जेमतेम नऊ वर्षांचा संसार करून विभा छोट्या सात वर्षांच्या मनीषला सोडून देवाघरी गेली होती. संसाराची स्वप्नं पाहणारी, जिद्दीने जगणाऱ्या विभाचा संघर्ष इथेच संपला होता. एका वर्षाने श्रीधरही हे जग सोडून गेला. खऱ्या अर्थाने मनीष अनाथ झाला होता पण आजी आजोबांनी त्याला उराशी कवटाळले होते.
( सत्य घटनेवर आधारित)

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 11 March 2022

भीती




भीती ही माणसाला कशाचीही वाटू शकते. ती खरे तर 
आपल्या मनातील भावना आहे. एखादी विशिष्ट घटना उदाहरण सांगायचे झाले तर एखादा अपघात पाहिला, किंवा भांडण पाहिले, एखाद्या वस्तू विषयी अशा बऱ्याच 
गोष्टी असतात ज्या आपण अनुभवल्या , पाहिल्या तर 
माणसाच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. 
आपल्याला काही इजा तर होणार नाही ना अशी धास्ती मनात असते. 
             लहान मुलांशी अगदी मोठ्याने बोलले, रागावले 
तर त्याला समोरील व्यक्तीची भीती वाटते. ते मूल मग त्या व्यक्ती जवळही जात नाही. त्याच्या मनात त्याच्या विषयी
ती भावना अगदी तीव्र होते. 
         शाळेत असताना आपल्याला शिक्षकांची भीती 
वाटते. ती ही दोन प्रकारची असते, एक तर शिक्षक आपल्याला आपण केलेल्या चुकांबद्दल शिक्षा तर करणार नाही ना, किंवा काही शिक्षक हे खूप शिस्तप्रिय असले तरी ते अतिशय मनमिळाऊ असतात तेव्हा आपल्याला 
त्यांच्या विषयी आदरयुक्त भीती वाटत असते.  
                विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटत असते, 
आसपास घडत असणाऱ्या घटनांमुळे स्त्रीला समाजात 
स्वतंत्रपणे वावरण्याची भीती वाटत असते, नव विवाहितेला तिच्या सासरची माणसे कशी असतील?  तिचा संसार सुरळीत होईल का? अशी भीती सतत वाटत असते.  अशा प्रकारे वेगवेगळ्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो. 
          पण कधी कधी माणसाला विनाकारणच भीती वाटत असते. कुठल्याही गोष्टीविषयी तो सतत विचार करत राहतो ,त्याचे पर्यवसान भीतीत निर्माण होते. माणूस   अतिविचाराने , मानसिक त्रासाने खचून जातो. तो  नैराश्याने ग्रासतो,  म्हणजेच डिप्रेशन मध्ये जातो. त्यातून 
जर तो बाहेर आला नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्याला 
त्याच्या जवळील व्यक्तींना भोगावे लागतात. याकरिता त्याला खरे तर समजून घेण्याची, मानसोपचार तज्ज्ञांची 
गरज असते. ती त्याला वेळीच मिळणे खूप आवश्यक 
असते. त्याच्यातील अस्वस्थतेचे ,anxiety चे कारण शोध ले गेले पाहिजे. तेव्हा कुठे या भीतीतून माणूस बाहेर पडू शकतो. 
         एकूण काय भीती जरी वाटली तरी त्यातून बाहेर कसे पडता येईल , त्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. नुसतेच मला भीती वाटते, आता काय करू?  असे म्हणून काहीच उपयोग होत नाही. त्या गोष्टीकडे ही
सकारात्मक रित्या पाहिले तर नक्कीच मार्ग निघू शकतो, 
हे कायम माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. 
     म्हणून भीती घालवायची असेल तर तिला सामोरे जा म्हणजे आपोआप मनातील भीती कमी होईल. 

     सौ. राजश्री सुहास जाधव.

          

अंधार आणि प्रकाश



अंधाराची भीती वाटत नाही मला, 
जितकी माणसांची भीती वाटे मनाला 
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट असते सुकर, 
पण  कसे घालवावे माणसाच्या मनातील अंधाराला ?....

मिणमिणता दिवा नष्ट करी त्या तमाला, 
हलकासा कवडसाही खूप असतो अंधाराला 
माणसाच्या अंगात भिणलेल्या अंधाराला, 
उच्चाटन्यास लावावे लागतात प्राण पणाला ....

न  धरावी कदापि अंधाराची भीती 
त्याच्यामुळेच तर  जाणती सारे, 
काय असते प्रकाशाची महती ! 
असते ती तर खरी, सुख-दुःखाची युती ....

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 2 March 2022

खेळ मनाचे

माणूस हा  अतिशय आशावादी प्राणी आहे. स्वप्नात रमण्यास त्याला नेहमीच आवडते. त्याला नाविन्याची ओढ असते, गुढते विषयी आकर्षण असते,
कल्पनातीत जे आहे ते त्यास नेहमी हवे हवेसे वाटते.
मग त्याच्या मनाचे तर्क, वितर्क खेळ सुरू होतात.

         माणसाचे मन हे  त्याची मानसिकता कशी आहे
यावर अवलंबून असते. जर माणसाची मानसिकता कायम
नकारात्मक विचार करत असेल तर मनात त्याच्या तसेच खेळ सुरू होतात. उगाचच कशाचीही अनामिक भीती,
एखाद्याविषयी राग, सुडाची भावना , चित्र विचित्र स्वप्नं ,
हे असे सारे खेळ माणसाच्या मनात सुरू होतात आणि सुरू होते असह्य वेदना.
          शरीराला जशी भूक लागते तशी मनाला माणसाच्या, नेहमीच भूक लागते. ती भूक शमविण्यासाठी
तो मग मनात इमले रचू लागतो. त्याला जे साध्य प्रत्यक्षात
होत नाही , ते तो मनाच्या खेळात साध्य करू पाहतो.
तो आकाशास गवसणी घालू लागतो. त्याला कधी मुक्त जगायचे असते, 'कधी सारे सुख पायाशी लोळण घेत आहे', या भ्रमातच त्याला राहायचे असते. कधी मनाच्या
ह्या खेळात तो एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो एकतर्फी,
तर कधी टोकाचा राग धरतो एखाद्या विषयी, कधी  माणसाचे मन इतके बेभान होते ह्या खेळात तो इतका
रंगून जातो की त्याला कसलेच ,वास्तवाचे भान राहत नाही.

             माणूस एखाद्या विषयी चुकीचे मत करून घेतो आणि तसेच खेळ मनात रचतो. ती व्यक्ती कितीही आकांताने तिची बाजू मांडू लागली तरी त्याला मग ते
काही पटत नाही.
          जीवनात माणसाला सुखी व्हायचे असेल तर आधी त्याने स्वतः आनंदी राहण्यास शिकले पाहिजे.
आजू बाजूचे लोक जरी कसेही वागले तरी त्याचा परिणाम
त्याच्या मनावर होता कामा नये, तेव्हाच माणूस आनंदी
होऊ शकतो. त्याचे मन प्रसन्न आणि विनयशील असेल
तर माणसाचे मन ही तसेच स्वप्नं पाहू लागते. त्याच्या
मनातले खेळही त्यास आनंद देणारे असतात. त्याला कधी
मग फुलपाखरू व्हावे वाटते, कधी आकाशातील तारा, तर कधी झरणारा निर्झर, तर कधी एखादं आवडतं व्यक्तिमत्त्व, माणूस त्याच्या मनाच्या खेळात होऊन जातो.
त्या मनातील विचाराने त्याचे काही नुकसान होणार नसते.
कारण त्याच्या मनास वास्तवाची जाणीव असते. हे मनाचे खेळ तो सहज पाहत असतो.

           मनाच्या ह्या खेळात किती रमावे आणि कुठे
थांबावे ह्याचे भान ज्याने त्याने राखलेच पाहिजे नाहीतर
जीवनाचा मेळ बसणे कठीण होऊन जाईल. त्याकरिता माणसाने कायम  आनंदी, निर्मळ मन ठेवले पाहिजे.

सौ. राजश्री सुहास जाधव.




     
   


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...