माणूस हा अतिशय आशावादी प्राणी आहे. स्वप्नात रमण्यास त्याला नेहमीच आवडते. त्याला नाविन्याची ओढ असते, गुढते विषयी आकर्षण असते,
कल्पनातीत जे आहे ते त्यास नेहमी हवे हवेसे वाटते.
मग त्याच्या मनाचे तर्क, वितर्क खेळ सुरू होतात.
माणसाचे मन हे त्याची मानसिकता कशी आहे
यावर अवलंबून असते. जर माणसाची मानसिकता कायम
नकारात्मक विचार करत असेल तर मनात त्याच्या तसेच खेळ सुरू होतात. उगाचच कशाचीही अनामिक भीती,
एखाद्याविषयी राग, सुडाची भावना , चित्र विचित्र स्वप्नं ,
हे असे सारे खेळ माणसाच्या मनात सुरू होतात आणि सुरू होते असह्य वेदना.
शरीराला जशी भूक लागते तशी मनाला माणसाच्या, नेहमीच भूक लागते. ती भूक शमविण्यासाठी
तो मग मनात इमले रचू लागतो. त्याला जे साध्य प्रत्यक्षात
होत नाही , ते तो मनाच्या खेळात साध्य करू पाहतो.
तो आकाशास गवसणी घालू लागतो. त्याला कधी मुक्त जगायचे असते, 'कधी सारे सुख पायाशी लोळण घेत आहे', या भ्रमातच त्याला राहायचे असते. कधी मनाच्या
ह्या खेळात तो एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो एकतर्फी,
तर कधी टोकाचा राग धरतो एखाद्या विषयी, कधी माणसाचे मन इतके बेभान होते ह्या खेळात तो इतका
रंगून जातो की त्याला कसलेच ,वास्तवाचे भान राहत नाही.
माणूस एखाद्या विषयी चुकीचे मत करून घेतो आणि तसेच खेळ मनात रचतो. ती व्यक्ती कितीही आकांताने तिची बाजू मांडू लागली तरी त्याला मग ते
काही पटत नाही.
जीवनात माणसाला सुखी व्हायचे असेल तर आधी त्याने स्वतः आनंदी राहण्यास शिकले पाहिजे.
आजू बाजूचे लोक जरी कसेही वागले तरी त्याचा परिणाम
त्याच्या मनावर होता कामा नये, तेव्हाच माणूस आनंदी
होऊ शकतो. त्याचे मन प्रसन्न आणि विनयशील असेल
तर माणसाचे मन ही तसेच स्वप्नं पाहू लागते. त्याच्या
मनातले खेळही त्यास आनंद देणारे असतात. त्याला कधी
मग फुलपाखरू व्हावे वाटते, कधी आकाशातील तारा, तर कधी झरणारा निर्झर, तर कधी एखादं आवडतं व्यक्तिमत्त्व, माणूस त्याच्या मनाच्या खेळात होऊन जातो.
त्या मनातील विचाराने त्याचे काही नुकसान होणार नसते.
कारण त्याच्या मनास वास्तवाची जाणीव असते. हे मनाचे खेळ तो सहज पाहत असतो.
मनाच्या ह्या खेळात किती रमावे आणि कुठे
थांबावे ह्याचे भान ज्याने त्याने राखलेच पाहिजे नाहीतर
जीवनाचा मेळ बसणे कठीण होऊन जाईल. त्याकरिता माणसाने कायम आनंदी, निर्मळ मन ठेवले पाहिजे.
सौ. राजश्री सुहास जाधव.
No comments:
Post a Comment