सूर्यास्त
'सूर्यास्त ' हा शब्द उच्चारताच, डोळ्यासमोर तो निसर्गाचा अद्भुत आविष्कार तरळून जातो. दिवसा साऱ्यांना आपल्या प्रकाशाने ऊर्जा देणारा , सांजवेळी मात्र
रात्रीच्या अधीन होत, विसावा घेत असतो, तेव्हा त्याचे रूपही अतिशय मोहक दिसत असते. लाल, पिवळसर , निळसर, गुलाबी छटांनी तो सर्वांना आकर्षित करत असतो आणि 'आता जरी माझा अस्त झाला असला तरीही मी उद्या नव्या जोमाने पुन्हा उगवणार आहे , प्रकाशमान होणार आहे ' हेच जणू तो अवघ्या विश्वास
सांगत असतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, खरे तर कोणालाही असा निवांत वेळ नसतो किंवा वेळ काढला जात नाही की जाऊन आवर्जून सूर्यास्त पाहण्यास. तो वेळ माणसाने स्वतःसाठी काढलाच पाहिजे. तसे बरेच लोक असतात जे आपल्या सुट्टीचा उपभोग घेतात, हे मनोहर दृश्य पाहण्यासाठी खास पर्यटन करतात आणि सुर्यास्ताचा आनंद आपल्या नजरेत , कॅमेऱ्यात बंदिस्त
करतात.
प्रत्येकासाठी सूर्यास्त हा वेगवेगळा भासतो, सुर्यास्त
पाहून कवी मन जागृत होते. त्याच्या कल्पनेतून तो त्या सूर्यास्ताला विरहाचे, प्रेमाचे , नव्या उमेदीेचे प्रतिक समजून तसे तो लेखणीतून उतरवतो.
बऱ्याच वेळा सूर्यास्ताचे दर्शन घेतले की काहींना
मानसिक समाधान , शांतता मिळते. तर काहींच्या मते
सूर्यास्त म्हणजे प्रियकर , प्रेयसीतील दुरावा वाटतो.
कोणास उगाचच रुखरुख लागून राहते. तर कातरवेळी
सूर्यास्त पाहिल्यावर, प्रेमवीरांच्या प्रेमभावना जागृत होतात.
सूर्योदय आणि सूर्यास्त ही रोज घडणारी घटना आहे.
जी माणसाला खरे तर एक चांगली शिकवण देत असते.
परिस्थिती दर वेळेस एक सारखी राहणार नसते , ती बदलत राहते. आज मिळालेले यश हे उद्या असेलच हे सांगता येत नाही. परंतु माणसाने कच खाता कामा नये.
सुख आणि दुःख हे येत, जात असते. आज जरी सूर्य
लयास गेला तरी उद्या तो तितक्याच चैतन्याने पुन्हा
उदयास येणार आहे. त्याप्रमाणे माणसाला आज जरी
मार्ग सापडला नाही, यश मिळाले नाही तरी जिद्द आणि
चिकाटीच्या जोरावर तो स्वतःस यश मिळवू शकतो , तितक्याच जोमाने ध्येय गाठू शकतो.
आज जरी गेला सूर्य तो लयाला,
उगवणार आहे पुन्हा तो त्याच दिशेला
जागवुनी मनात साऱ्यांच्या प्रेरणा,
तोच कारण आहे विश्वाच्या ऊर्जेला .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
छान संदेश दिलाय
ReplyDeleteसुंदर संदेश 👌👌👌
ReplyDeleteसुंदर विचारपूष्प....!✍️👌👌👌
ReplyDelete