मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-
युद्ध हा पर्याय नव्हे :-
आज मनाच्या डायरीतून सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध. ज्याचे पडसाद मात्र संपूर्ण जगावर उमटत आहे. जग खरेच तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने पाऊल तर टाकत नाही ना ! हा विचार नक्कीच मनाला वेदना देऊन जातो. ह्या देशातील युद्धाची झळ जागतिक पातळीवर सर्वांनाच होऊन महागाईचे चटके सोसावे लागत आहे आणि हे असेच चालू राहिले तर पुढेही सर्व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक अर्थव्यवस्था, जीवितहानी ह्या सर्व संकटाना ह्या युद्धामुळे देशाबरोबर, सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणार आहे.
खरेच युद्ध हाच पर्याय आहे का? स्वतःचे वर्चस्व दुसऱ्यावर प्रस्थापित करताना, दोन परस्पविरोधी विरोधी प्रवृत्ती ह्यांच्यातील असलेला संघर्ष, हा कोणत्याही युद्धास कारणीभूत ठरतो. मग ते युद्ध देशा देशातील असो, दोन भिन्न विचाराच्या व्यक्तिंमधील असो, किंवा नात्यातील युद्ध असो, प्रेमातील युद्ध असो, मनातील द्वंद्व असो,
युद्ध हे युद्धच असते. ते कधी रौद्र रूप धारण करते, तर कधी आपापसांत शीतयुद्ध चालू ठेवते. आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या ह्या युद्धास कधी तरी नक्कीच सामोरे गेलेलो असतो, असे मला वाटते. पण ह्यातून काय साध्य होते, फक्त आणि फक्त त्रास, मानसिक, शारिरीक, आर्थिक, नैतिक ह्यापलीकडे अशा ह्या युद्धातून काहीच साध्य होत नाही. पण स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी हक्कासाठी युद्ध करणे, हे चुकीचे नाही. कारण तो आपला हक्क आहे. फक्त ते करताना आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, कोणावर अन्याय न करता जे
सामोपचाराने होत असेल तर त्याप्रमाणे केले पाहिजे.आपले विचार तितके प्रगल्भ पाहिजे आणि वेळ पडली तर लढताही आले पाहिजे, असे मला वाटते.
आजकाल तर क्षणाक्षणाला घराघरात, समाजात वावरताना शाब्दिक युद्ध हे चालू असते. नात्यात तर ते नेहमी दिसून येते. टिव्ही सिरियलचा प्रभाव तर घरातून
स्त्रियांवर इतका झालेला असतो की सासू सुनेचे, दीर, जाऊ, नणंदांचे आपापसांत कधी पटत नाही. टिव्ही मध्ये जसे दाखवतात तसे खऱ्या आयुष्यात मग घडू लागते.
प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करत राहतो, हेवेदावे करतो. अशा ह्या शीत युद्धाचे परिणाम खूपच विपरीत होताना दिसतात. नाती दुरावतात, एकमेकांबद्दल कमालीची असूया वाढीस लागते, कधी कधी तर जीवित हानी देखील होते. हेच जर सामंजस्याने वागले , ज्याचा मान त्याला दिला, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, आपापसांत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले, एकमेकांशी आदराने वागले मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी असली तरी, मग अशी युद्ध होण्याचा संभवच निर्माण होणार नाही.
त्यामुळे असे वाटते की युद्ध हा शेवटचा पर्याय नसावा, तुम्हाला काय वाटते ?
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
ReplyDeleteअर्थपूर्ण लेखन ✍️👌👌👌
ReplyDelete