'चंद्र ' ही निसर्गाची सुंदर कलाकृती. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना कोणीच थकणार नाही. लेखक, कवींना ही
भुरळ पडते त्या चंद्राची आणि मग चंद्रावर खूप साऱ्या कविता, गोष्टी देखील रचल्या जातात. आकाशातील त्या
चांदोबाला पाहून माऊली आपल्या बाळाला चांदोबाचेच
अंगाई गीत गाऊन जोजवते. मानवाच्या चौकस बुद्धीला
ह्या चंद्राचेच वेध लागल्याने तोही त्याच्या शोधात अंतराळात झेपावला आणि चंद्रावर पाऊल टाकले.
इतके सारे असूनही हा चंद्रही मेघांच्या छायेत झोका- लळा जातो. तो कलेकलेने वाढत जातो. आणि पौर्णिमेला तो पूर्णत्वास येतो. म्हणजेच चंद्राला ही पूर्णत्वास येण्याची वाट पाहावीच लागते. त्यालाही ग्रहण लागते. त्यातून तो संयमाने बाहेर पडतो. आणि आपल्या डोळ्यांना त्याचे जे रूप दिसते ते मग साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेते.
तसेच माणसाच्या जीवनाचे आहे. चंद्राप्रमाणे त्याचेही
जीवन हे खाच खळग्यांनी काही काळाकरिता झोकाळले जाते. सुख - दुःखाचा पाठशिवणीचा खेळ आयुष्यात चालूच राहतो. तेव्हा माणसाने संयमाने त्याचा सामना केला तर त्यातून सहज बाहेर पडता येते. स्वतः बरोबर
इतरांनाही तो प्रेरणा देऊ शकतो किंवा इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो. त्याच्या प्रेमळ छायेची सावली माणूस दुसऱ्यांना देऊ शकतो.
हाच तो चंद्र जो मानवी मनाशी सांगड घालतो आणि म्हणूनच काय स्त्रीच्या सौंदर्याला चंद्राची उपमा दिली जाते. एक नवी जाणीव प्रियकर आणि प्रेयसीच्या मनात
त्या चंद्राला पाहून निर्माण होते. काही कालावधीसाठी जरी ते दोघे विरह सहन करत असले तरी नंतर त्यांना एकमेकांच्या साथीनेच पुढे आयुष्य जगायचे असते, ही भावना त्या आकाशातील चंद्राचे रूप पाहिल्यावर , मनाला सुखावून जाते.
आपण जे काही काम हाती घेऊ किंवा आपल्या नात्यांना कधी कधी विरोध दर्शविणारे खूप भेटतील, अशीही वेळ येईल की कुठलाच मार्ग समोर दिसेनासा होईल, पण ते काही चिरकाल टिकेल असे अजिबात नसते. काही काळ त्यासाठी जाऊ देणे गरजेचे असते. अवधान राखून निकराने आहे त्या परिस्थितीला सामोरे गेले की मग जे मळभ साठलेले असते ते आपसूक दूर होते आणि आपल्याला हवे ते साध्य करता येऊ शकते.
म्हणूनच असू दे कितीही झोकाळलेला तो चंद्रमा, येईल
एक ना एक दिवस बहर माझ्याही जीवना.
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर लेख...👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteखूप छान लेख लिहिला खरच चंद्र आणि आपल आपुलकीचं नातं आहे
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteछान लिहिलंय 👌👌👌
ReplyDelete