'सहनशीलता ' अंगी असली की आपापसातील मतभेद मिटवणे हे अगदी सोपे जाते. सहनशीलता अंगी
असली की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस विचलित न होता स्थीर राहू शकतो.इतरांनी केलेल्या टिकेचा, अपमानाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे माणूस दुःखी न होता कायम समाधानी राहतो.
माणसाने सहनशील असावे पण त्यालाही काही मर्यादा आहेत ते ज्याच्या त्याने ओळखणे महत्त्वाचे
आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात, त्याला सामोरे जावे लागते.
उदाहरणार्थ घरात असलेल्या गृहिणींना खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, जबाबदाऱ्या पार पाडाव्या
लागतात. प्रत्येक गोष्टीत तिला गृहीत धरले जाते. काही ठराविक अशी मते तिच्यावर लादली जातात पण तरीही
ती स्त्री ते सर्व सहन करुन स्वतःचे घर कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. खरे तर पती - पत्नी दोघांनी मिळून घरातील कामे सांभाळली, विचारांची देवाणघेवाण केली तर मग सहन करण्याचा प्रश्नच उरत नाही.
नोकरीच्या ठिकाणीही आपल्याला वरिष्ठांचे ऐकून घ्यावे लागते, जे आपल्याला पटत नसते. पण आपणही
थोडे समजून घेऊन त्यांच्या दृष्टीने विचार केला तर मग आपल्याला वरिष्ठांचे म्हणणे पटू शकते. माणूस ह्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. त्याच्यात सहन करण्याची ताकदच नसते. घाईघाईने चुकीचे निर्णय घेतल्याने माणसाच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो.
सहन करणे व सहनशील असणे ह्यात थोडा फरक आहे. उदाहरणार्थ लग्न ठरवताना मुलाकडील मंडळी मुलीच्या पित्याकडे हुंडा, वस्तू, पैसे यांची मागणी करतात. ती मागणी पूर्ण करण्यास वधूपित्याने असमर्थता दर्शवली तर लगेच लग्न मोडण्याची धमकी वरपक्षाकडून दिली जाते. अशावेळी मुलीच्या वडिलांनी ह्या गोष्टीला पाठबळ न देता त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे. त्यांच्या वाटेल ते मागण्या सहन करणे हा ही एक प्रकारे गुन्हाच आहे.
याउलट सहनशीलता म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याशी उद्घटपणे वागत असेल तर आपण उद्धटपणे
न वागता त्या व्यक्तीशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावा. तरीही त्या व्यक्तीचे कृत्य बदलत नसेल तर मोठ्या मनाने
त्यास क्षमा केली तर त्यालाही स्वतःची चूक कधी ना कधी समजू शकते.
सहन करण्याची ताकद जर माणसाच्या अंगी असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणूस
माणूस त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकतो.
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर लेख 👌👍
ReplyDeleteसुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDelete