नमस्ते बालमित्रांनो 🙏
आज जी गोष्ट तुमच्या वाचनासाठी घेऊन आले आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल. कारण गोष्टीतील मुलगा तुमच्याच वयाचा , चंचल असा आहे. पण त्याच्या सारखे तुम्ही वागायचे नाही बरं का ! चला तर मग वाचुया गोष्ट......
अमित हा शाळकरी मुलगा त्याचे आई, वडील आणि आजी आजोबांबरोबर एका छोट्या शहरात राहत होता. एक जमेची बाजू म्हणजे, ते राहत असलेल्या सोसायटीच्या आजुबाजूस भरपूर अशी झाडे ,आणि जवळच सुंदर अशी बाग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असे. अमित नेहमी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत त्या बागेत खेळण्यासाठी जात असे. त्यामुळे तिथे येणारे लोकही अमितला ओळखू लागले होते.
अभ्यासात अमित तसा बऱ्यापैकी हुशार होता. पण त्याला काही करायचे झाले की सुरवातीस अत्यंत कंटाळा यायचा. लगेच कोणत्याही गोष्टीला त्याच्याकडून होकार नसायचा. अगदी घरात जर आजीने त्याला काही काम सांगितले तर तो कधीच लवकर ऐकायचा नाही. आजीही मग त्याला जास्त काही सांगायची नाही.
एकदा नेहमीप्रमाणे संध्याकाळी खेळण्यासाठी अमित आपल्या मित्रांबरोबर बागेत चाललेला असताना, आजी अमितला म्हणते ," अमित तू चाललास आहे तर येताना मेडिकल मधून गोळ्या आण , त्याची चिठ्ठी घे कारण तुझे पप्पा आज उशिरा घरी येणार आहे , तोपर्यंत मेडिकलचे दुकान बंद होईल." आजीचे म्हणणे ऐकल्यावर अमित आजीला म्हणतो, " अगं आजी आता राहू दे ती चिठ्ठी . मी नंतर तुला गोळ्या आणून देईल, आता मला खेळायचे आहे. मी जातो, "असे म्हणून ती औषधांची चिठ्ठी न घेताच अमित बाहेर निघून जातो. खेळण्याच्या नादात अमित गोळ्या आणायचे साफ विसरून जातो. एव्हाना दुकानेही सारी बंद झालेली असतात. अमितचे वडीलही त्यादिवशी खूप उशिरा घरी येतात. त्यामुळे आजीही काही बोलत नाही. अमितची आई तिच्या नातेवाईकांकडे गेलेली होती त्यामुळे तिलाही घरी येण्यास उशीरच झाल्याने आजीच्या ब्लडप्रेशर च्या गोळ्या काही आणल्या जात नाही
आणि या साऱ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे आजीला रात्री खूप त्रास झाल्याने तिला रात्रीतूनच दवाखान्यात हलवावे लागते. त्यादिवशी अमितचे वडील त्याच्यावर खूप चिडतात पण सर्व परिस्थिती पाहून ते त्याला काहीच बोलत नाही.
ह्या गोष्टीला बरेच दिवस उलटून जातात. अमितच्या स्वभावात मात्र काहीच फरक पडलेला नसतो. तो अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी करण्यासाठीही नकार देत असतो. त्यामुळे घरातील सर्वांनाच अमितच्या ह्या वागण्याने चिंता वाटू लागते.
एकदा शाळेतील महिन्याच्या मीटिंगमध्ये त्याची आई त्याच्या शिक्षकांजवळ ही गोष्ट मांडते. तेव्हा त्याचे शिक्षक अमितच्या आईला म्हणतात , " तुम्ही काळजी करू नका, अमितला लवकरच त्याची चूक लक्षात येईल आणि तो पुन्हा असे वागणार नाही.
शाळेतून घरी आल्यानंतर अमितला नेहमीप्रमाणे नाष्टा करून बागेत जायचे असते. तो पटकन हातपाय तोंड धुऊन थोडेसे खाऊन त्याच्या मित्राकडे विनितकडे जातो आणि त्याला बागेत खेळण्यासाठी हाक मारतो पण विनीत त्याला ' मी आता येणार नाही, नंतर येईल ', असे सांगतो. त्यामुळे अमितला एकट्यालाच बागेत जावे लागते. मित्र बरोबर खेळण्यास नसल्याने अमित त्यादिवशी लवकर घरी येतो. तो नेहमीप्रमाणे आजीला रात्री गोष्ट सांग, असे म्हणतो पण आजी काही त्याला गोष्ट सांगत नाही. ती त्याला ' उद्या सांगेल ' असे म्हणते. त्यामुळे अमित खूप नाराज होतो. आज काहीच त्याच्या मनाप्रमाणे घडलेले नसते.
शाळेत आज चित्रकला स्पर्धेचा निकाल त्यांचे शिक्षक जाहीर करणार असतात. त्यामुळे आज स्वारी खूप खूश असते कारण अमितची चित्रकला ही खूपच सुदंर होती. दरवर्षी स्पर्धेत त्याला बक्षीस हमखास ठरलेले असायचे. म्हणून लवकर आवरून अमित शाळेत येतो. वर्ग भरून शिक्षक शिकवण्यास सुरुवात करतात पण आमितचे लक्ष त्यांच्या शिकवण्याकडे अजिबात नसते.
चित्रकलेचा निकाल सर कधी सांगतील , असे त्याला झालेले असते. धडा शिकवून झाल्यावर शिक्षक
चित्रकलेचा निकाल सांगू लागतात. अमित कान देऊन ऐकू लागतो. त्याचे शिक्षक पाहिला नंबर ज्याचा आला त्याचे नाव जाहीर करतात. बाकीचे नंबर उद्या सांगेल असे म्हणून ते ऑफिस मध्ये निघून जातात.
एव्हाना मधली सुट्टी झालेली असते. अमितच्या उत्साहावर पाणी पडलेले असते. त्याला चित्रकलेचा
निकाल न समजल्याने फार वाईट वाटते. तो सारा धीर एकटवून ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या शिक्षकांना
चित्रकलेच्या निकालाबाबत विचारणा करतो तेव्हा त्याचे वर्गशिक्षक त्याला म्हणतात , " अमित तुला निकाल
समजला नाही म्हणून तू इतका बैचेन आहे, वाईट वाटत आहे पण तू इतरांनी काही तुला विचारल्यावर तू केव्हा
तरी त्यांचे म्हणणे ऐकतो का ? कोणतेही काम किंवा एखादी गोष्ट तुला सांगितल्यावर तू कधीच लवकर होकार
देत नाही, नंतर करील असेच तुझे उत्तर असते आणि या गोष्टीचा घरातील तुझ्या माणसांना आणि इतरांनाही
त्रास होतो, वाईट वाटू शकते , हे तुला कळतच नाही. आज मी मुद्दाम चित्रकलेचा निकाल पूर्ण सांगितला नाही.
हे तुला समजले का? " वर्ग शिक्षकांच्या अशा बोलण्याने अमितला त्याची चूक लक्षात येते. तो त्यांना म्हणतो, "
सर मी पुन्हा असे वागणार नाही. कधीच सांगितलेल्या कामाचा कंटाळा करणार नाही . ' नंतर करील ' असे
म्हणणार नाही." एवढे बोलून अमित वर्गात निघून जातो. त्याचे वर्गशिक्षक शाळा भरल्यानंतर चित्रकलेचा
निकाल सांगतात. अमितचा चित्रकला स्पर्धेत २ रा नंबर आलेला असतो. अमित ही आनंदाची बातमी आपल्या
घरी सांगतो. त्याचे सर्वजण खूप कौतुक करतात. त्यादिवशी त्याची आजी रात्री त्याला एक सुंदर गोष्टही सांगते. ती ऐकता ऐकताच अमित गाढ झोपी जातो.
त्यानंतर अमित पुन्हा कधीच कोणत्याही गोष्टीकरिता ' नंतर करील ' असे म्हणत नाही.
मुलांनो, तुम्हीही तुमचा आळस नक्की सोडणार ना ! 'नंतर करील ' असे म्हणणार नाही ना !
सौ. राजश्री सुहास जाधव.
वाहह... खुप सुंदर , प्रेरणादायक , बोधप्रद , बालकथा...👏👏👏💐💐💐
ReplyDeleteखुपच सुंदर बालकथा 👌👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteWaa atishay sunder बोध मिळाला कथेतून👌👌
ReplyDeleteघराघरातील संस्कार निवळत जात आहेत मुलांना थोरामोठ्यांच्या विषयी आत्मियता राहीली नाही आणि जे शाळेत संस्कार घडायला हवेत ते आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मिळत नाही..!
ReplyDeleteवदनी कवळ घेता सारखे श्र्लोक होणे गरजेचे आहे ते होत नाही..! त्यातूनच संस्कार घडायला सुरुवात होत असते.हेच शिक्षकही बहुतेक विसरले असावेत...!
पण छान बोध कथा आहे..!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏