Saturday, 9 October 2021

विवेक




'विवेक' हा ५वी इयत्तेत शिकणारा मुलगा अत्यंत अबोल, नम्र असा आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांची बदली झाल्यामुळे गावाकडून शहरात तो त्याच्या आजी, आजोबा आणि वडिलांबरोबर राहण्यास आला होता. विवेकची आई, तो पाच
वर्षांचा असताना त्याला सोडून देवाघरी गेली होती. तेव्हा त्याचे आजी, आजोबा व बाबा हेच त्याचे विश्व होते.विवेक खूपच बुजरा होता. त्यामुळे आजीला त्याची नेहमी काळजी वाटत असे. आजी त्याला वेगवेगळ्या गोष्टी, किस्से सांगून बोलते करण्याचा प्रयत्न करत असे पण विवेक कधीच मनमोकळेपणाने बोलत, खेळत नसे.
        जेथे ते राहत होते ती सोसायटी छोटीच होती. त्यामुळे नविन कोणी राहण्यास आले की सर्वांना लगेच समजत असे. सोसायटी राहण्यास येऊन त्यांना आता महिना होऊन गेला होता. विवेकच्या आजीचा स्वभाव बोलका असल्याने त्यांची सोसायटी मधील लोकांशी
बऱ्यापैकी ओळख झाली होती. विवेक मात्र सोसायटी मधील मुलांबरोबर खेळण्यास जात नसे. तो फक्त त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रोहित बरोबर बोलत असे, कधी कधी त्याच्याबरोबर खेळत असे.
        त्यांच्या सोसायटी जवळ असलेल्या शाळेत विवेकचे ॲडमिशन त्याच्या वडिलांनी केले होते. विवेक त्याच्या नविन मित्राबरोबर, रोहित बरोबर चालत शाळेत जात असे. तो नविन असल्याने त्याच्या वर्गातील काही आगाऊ मुले त्याला रोज त्रास देत असे. ती मुले कधी कधी विवेक मधल्या सुट्टीत खाली गेला की त्याचे दप्तर लपवून ठेवत असे, त्याचे पेन्सिल, खोडरबर दप्तरातून काढून
घेत असे. एकदा तर त्या मुलांनी विवेक हात धुण्यासाठी गेलेला असताना त्याचा सगळा डबा संपवून टाकला होता. मग रोहितने शिक्षकांना सांगितल्यावर शिक्षकांनी सर्व मुलांना चांगलेच खडसावले होते. तरी ही ती मुले   विवेकला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देत असे. त्याला मुद्दाम मारून पळत असे. पण विवेक कधीच काही बोलत नसे किंवा घरीही आजीला काही सांगत नसे. ह्या गोष्टीचा रोहितला खूप रागही येत असे व वाईटही वाटत असे. तो विवेकला म्हणत असे,"विवेक तू  असा शांत असतो, त्या मुलांना काही बोलत नाही, शिक्षकांना ही त्या मुलांची तक्रार करत नाही.त्यामुळे ती मुले जास्तच त्रास देतात.तू कशाला  इतके सहन करतोस?" पण  विवेक काहीच न बोलता फक्त 'जाऊदे' इतकेच बोलत असे.
               गॅलरीमध्ये विवेकच्या आजीने कुंडीत टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, काही फुलांचीही रोपे लावली होती.
आजी तिथे पक्ष्यांसाठी पाणी, धान्य कधी चपातीचे तुकडे ठेवत असे. त्यामुळे त्यांच्या गॅलरीत चिमण्या, कावळे, कधी पारवे, पोपटही येत असे. त्यांना पाहण्यात विवेक खूप दंग होत असे. त्यांच्या गॅलरीत एक नर पोपट नेहमीच सकाळी सकाळी येत असे. तो पोपट विवेकला खूपच आवडत असे. तो त्याच्यासाठी आजीकडून मिरची, कधी धान्य, कधी पेरू घेऊन त्या पोपटास खाण्यास देत असे. त्या पोपटाची व विवेकची चांगलीच गट्टी जमली होती. आजीलाही त्यामुळे बरे वाटत असे. असेच एकदा नेहमी प्रमाणे विवेक त्या पोपटास भिजवलेली डाळ खाण्यास देत असतो तेव्हा अचानक एक बोका त्या पोपटावर झडप घालतो आणि त्याला तोंडात पकडून झाडावर जातो. विवेकला काहीच लक्षात येत नाही, तो आजीला मोठ्याने हाक मारतो अणि रडायला लागतो. आजी विवेकला रडण्याचे कारण विचारते तेव्हा विवेक रडत रडत सांगतो, " अगं आजी एका बोक्याने आपल्या पोपटाला तोंडात पकडून नेले. आता आपला पोपट मला कधीच दिसणार नाही." असे म्हणून विवेक आणखी मोठ्याने रडू लागतो. आजी त्याला समजावते व म्हणते  "हे बघ विवेक तो पोपट त्या बोक्यासमोर खूपच छोटा होता.त्याच्यात त्या बोक्याबरोबर लढण्याची ताकद नव्हती आणि म्हणूनच त्या बोक्याने त्याचा गैरफायदा घेतला आणि पोपटाला तो घेऊन गेला. तुला वाईट वाटत आहे, हे मला कळत आहे. तसेच तुला कोणी काही बोलले, किंवा शाळेतील मुलांनी तुला त्रास दिला तर आम्हालाही खूप वाईट वाटते. तू तर त्या पोपटापेक्षा खूप मोठा आहेस, हुशार आहेस तरी तू  त्या  मुलांचा त्रास निमूटपणे सहन करतोस. हे चुकीचे आहे." आजीचे हे बोलणे ऐकून विवेक मनातल्या मनात काहीतरी ठरवतो.
         दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विवेक रोहित बरोबर शाळेत जातो. वर्गात शिरत असताना त्या आगाऊ मुलांपैकी एक मुलगा विवेकला ढकलणारच असतो पण विवेकच्या ते लक्षात येते. तो त्या मुलाचा हात घट्ट पकडतो आणि त्याला ताकीद देतो, "परत जर का असे केलेस तर मीही तुला ढकलील नाहीतर तुझे नाव आपल्या मॅडमना
सांगेल." त्याचे बोलणे ऐकून रोहित आणि बाकीची मुलेही चकित होतात. विवेक त्या दिवसापासून वर्गात सर्व मुलांबरोबर बोलू लागतो. वर्गातील मुलेही त्याला
त्रास देण्याचे बंद करतात. विवेक आता रोज शाळेतून घरी आला की आजी, आजोबांना शाळेतील गमती-जमती सांगत असे.

सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

  1. खूपच छान 👌
    सुंदर कथा बोधकथा..👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. Comments जात आहेत 👌

    ReplyDelete
  3. शिकण्यासारखे आहे या कथेतून...खूप छान..👌👍✍️🍫

    ReplyDelete
  4. अप्रतिम..खूप सुंदर बोध कथा....मस्तच लिहिलंय 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर बोधकथा!��������

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...