Friday, 24 September 2021

स्वप्नांची दुनिया




प्रत्येक माणूस हा कोणते ना कोणते स्वप्न घेऊन जगत असतो.स्वप्नं ही  जागेपणी,निद्रितावस्थेत,दिवसाढवळ्याही पडतात. काही स्वप्नं ही अगदी मनावर हळुवार मोरपिस फिरवल्याप्रमाणेअसतात, काही स्वप्नं भयप्रद असतात, काही स्वप्नं अगदीच गूढ असतात, काही स्वप्नं ही  अतिशयोक्तीही असतात, काही स्वप्नं ही प्रेरणादायक तर काही निरर्थकही स्वप्नं माणसास पडतात.  काही स्वप्नं पाहिली तरी आठवत नाही. माणूस हा सतत स्वप्नांच्या मागे धावत राहातो.
       माणसाची स्वप्नं ही नानाविध प्रकारची  असतात. कोणास एक चांगले घर हवे असते, कोणाला चांगला जोडीदार हवा असतो, कोणाला परीक्षेत उत्तम गुण हवे असतात, कोणाला खूप प्रसिद्धी, नाव हवे असते, तर छान पर्यटनस्थळे फिरण्याची  काहींची स्वप्नं असतात. ही स्वप्नं साकार करण्यासाठी माणूस धडपडत असतो.
       स्वप्नं पाहावी,निश्चित पाहावी. पण त्याकरिता कठोर परिश्रम करण्याची माणसाची तयारी असणे खूप महत्त्वाचे आहे. स्वप्नं पाहिली तर माणूस ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. पण कधी कधी पाहिलेले स्वप्न पुरे होतेच असे नाही, तेव्हा खचून न जाता त्यातून न डगमगता बाहेरआले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या उमेदीने पुन्हा स्वप्नपूर्तीकरिता झटले पाहिजे. यश - अपयश स्विकारता आले पाहिजे.
        अगदी अलीकडचेच उदाहरण पाहिले तर, प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने ही असेच स्वप्न पाहिले होते.त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, सन्मान सारे काही होते. पण जीवनात काही कटू गोष्टींमुळे, नैराश्याने त्याने स्वतःचे  जीवनच संपवले, ही गोष्ट किती वेदनादायक आहे. ईश्वराने दिलेले हे जीवन खरे तर किती सुंदर आहे. ते माणसाला उपभोगता आले पाहिजे.
        म्हणून स्वप्नं जरूर पाहा, ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते कष्ट करा. तसेच अपयश पचविण्याची तयारी ठेवा. नुसतेच स्वप्नांच्यामागे धावू नका, जिद्द ठेवा. ठरवले तर अशक्य असे काहीच नसते,  हा विचार कायम स्मरणात ठेवा.
          'स्वप्नांस देऊनी आकार, तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार '.

सौ. राजश्री सुहास जाधव
            


      


7 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...