Saturday, 25 September 2021

काही अडत नाही....



' जन पळभर म्हणतील हाय हाय..
मी जाता राहील कार्य काय?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे आपुला क्रम आचरतील '
      ह्या भा. रा. तांबेंच्या ओळी किती समर्पक आहेत ना,
आपले कितीही जिवाभावाचे जिवलग असले आणि अचानक नियतीने त्यांना आपल्या पासून हिरावून नेले तरी आपण जगणे काही सोडत नाही. दुःख हे नक्कीच असते. पण काळ जसा पुढे सरकतो तशी त्याची तीव्रता कमी होते. याचा अर्थ आपण त्यांना विसरून जातो, असेही नाही. पण जीवनचक्र हे सुरूच राहते. त्यालाच जर कुरवाळत बसलो तर सर्वच दुःख सागरात बुडून जातील.
          जसे नदीच्या प्रवाहात वाहत येणारे दोन ओंडके काही कालावधीसाठी एकत्र येतात आणि नंतर पुन्हा त्यांच्या त्यांच्या मार्गाने ते प्रवाहीत होतात. तसेच माणसाचे
जीवन असते. आयुष्यात खूप लोक भेटतात, त्यांचे विचार, व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडते. त्या प्रभावाखाली आपण असतो. त्यांचे चांगले विचार आपण आत्मसात करायचे .जर अशा व्यक्ती कालांतराने आपल्या जीवनातून निघून जरी गेली तरी आपण जगायचे काही सोडत नाही किंबहुना न झुरणे हेच योग्य आहे. त्यांचे चांगले विचार कायम आपल्या स्मरणात राहतील.
        कधी कधी माणसं आपल्या दुःखाचा खूप गाजावाजा करतात,' आता मी कसं
जगायचं, तुझ्याशिवाय जगुच शकत नाही ' वैगरे वैगरे.... पण खरच का आपण गेलेल्यांच्या मागे स्वतःचा जीव देतो का?
        माझ्या स्वतःच्या आयुष्यातील माझ्या जवळच्या ४ व्यक्ती एकामागोमाग एक मला सोडून गेल्या. त्याचे दुःख हे मनात साठवले आहे. पण त्यांच्या जाण्याने मी जगणे काही सोडून दिले नाही. त्यांच्या आठवणीच मला जगण्यासाठी पाठबळ देत असतात.
     म्हणून कुणासाठी झुरत बसण्यापेक्षा जे समोर आहे ते भरभरून उपभोगा, स्वतः सुखी राहा आणि दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटते? .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


9 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...