'शांत मन' असे सुखाचे साधन. माणसाने स्वतःचे मन शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. खूप प्रयत्नांनी आपण हे साध्य करू शकतो.
माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की त्याच्या मनात सतत काही ना काही चालूच असते. बाह्यतः तो शांत भासत असला तरी त्याच्या अंतरात खूप गदारोळ चालू असतो. तो मनातल्या मनात स्वतःशी अविरतपणे बोलत असतो. वेगवेगळ्या भावना, विचार, भयगंड, आनंद, सुख, चिंता, दुःख, मत्सर, यशापयश, आशा आकांक्षा संताप, क्लेश या साऱ्या विचारांचा त्याच्यावर पगडा असतो. परिणामी माणसाला शांतता लाभत नाही आणि त्यातून प्राप्त होणारे सुखही मिळत नाही.जो पर्यंत माणूस त्याच्या या विचारांतून, अशा इच्छा- आकांक्षातून बाहेर येत नाही तो पर्यंत त्याचे मन हे शांत होऊ शकत नाही.
शांतता लाभणे म्हणजे नेमके काय? शांतता ही खरे तर कुठेही शोधण्याची गरज नसते. ती तर आपल्यात, आपल्या आजुबाजूलाच असते. तिला फक्त अनुभवता आले पाहिजे. जर मन एकाग्र असेल तर खूप कल्लोळातही ही आपण शांतता अनुभवू शकतो. न बोलताही खूप काही सांगून जाते शांतता. मनातील सगळे नकारात्मक विचार नाहीसे होऊन माणूस सगळ्या गोष्टींकडे जेव्हा सकारात्मकतेने पाहू लागतो तेव्हा त्यास सुख प्राप्त होते, समाधान मिळते.
ईश्वर सानिध्यात राहून ध्यानाद्वारे आपण मन
शांत ठेऊ शकतो. मनातील सर्व विचार काढून टाकून
एकाग्र चित्ताने ईश्वर साधना केली तर मन हे खरोखर
शांत होऊ शकते. आपण किमान तसे प्रयत्न करू शकतो.
स्थीर, स्थितप्रज्ञ मन हे कायम शांत असते. अशा शांत मनात संतुष्टता निर्माण होते व माणूस सुखासीन राहतो.
थोर संत तुकाराम महाराज हे अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांनी संसारात राहूनही खरा परमार्थ प्राप्त केला. लोकांनी कितीही छळले, त्रास दिला तरीही त्यांनी विठ्ठलाचा ध्यास सोडला नाही. पांडुरंगाच्या भक्तीत ते लीन झाले. ' तुका म्हणे माझे हेची सर्व सुख |
पाहिन श्रीमुख आवडीने || '
ह्या त्यांच्या अभंग ओळीतून हेच समजते की, त्यांचे सुख हे पांडुरंगातच दडलेले आहे. तुकाराम गाथेतून साऱ्या जीवनाचे सार त्यांनी सांगितले आहे.
सौ. राजश्री सुहास जाधव.

खूप खूप सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख...
ReplyDeleteWOW...!!
ReplyDeleteखूपच छान विवेचन केले आहे ..!
मनःशांती भक्तीभाव हेच परमार्थ साधण्यासाठी गरजेचे असते...🙏 खूपच छान अप्रतिम लिखाण
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खूप खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeletekhup chhan Rajashree👌🤘
ReplyDelete