जे भाव शब्दातून व्यक्त करताना कधी कधी संकोच वाटतो, तेच भाव डोळ्यांतून सहज व्यक्त होत असतात. आईचे तिच्या मुलांवरील प्रेम, कधी कधी एखाद्या शिक्षका विषयी वाटत असलेली भीति, वडिलांविषयी चा आदर, आपल्या देशाबद्दल वाटणारा अभिमान, मैत्रीचा भाव इत्यादी. हे सारे काही डोळ्यांतून व्यक्त होत असते.
डोळे खूप काही सांगून जातात. डोळ्यांतूनच माणूस कसा आहे, ते समजू शकते. डोळ्यांतून कधी प्रेमळ,कधी हासरे, कधी बुजरे, कधी लाजरे, कधी अवखळ, कधी भिडस्त, कधी कोपिष्ट, कधी निखारे, कधी सौम्य, कधी
हळवे, कधी रागीट, कधी विस्मयकारक, कधी भयप्रद भाव प्रकट होत असतात. त्यामुळेच कवी, चित्रकार ह्या डोळ्यांच्या प्रेमात पडून कविता रचत असतो, चित्रकार
सुंदर चित्र रेखाटत असतो.
' डोळे ' हे माणसाच्या शरीरातील महत्वपूर्ण अवयव. डोळे जर निरोगी असेल तर माणूस कायम आनंदी राहून सृष्टीतील आनंद उपभोगू शकतो. म्हणून डोळ्याची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपल्या आजू बाजूस हर तऱ्हेचे प्रदूषण दिसून येते. सर्व कामे ही लॅपटॉप, संगणकावर होत असल्याने ,शिक्षणही सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने, डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत.डोळ्यांचे विकार अगदी लहानपणीच उद्भवत आहे. अशा वेळी डोळ्यांवर योग्य ते उपचार घेणे, त्यांना जपणे खूप आवश्यक आहे. त्याकरिता डोळ्यांचे व्यायाम केले पाहिजे. डोळ्यांचा थकवा घालवण्यााठी डोळ्यांवर थंड गुलाब जलच्या पट्ट्या, काकडीच्या चकत्या ठेवल्या की डोळ्यांचा थकवा जाण्यास मदत होते.
असे म्हणतात ज्याला डोळे नसतात त्याला एक सहावे इंद्रिय देवाने दिलेले असते. त्याद्वारे त्या माणसाला पटकन एखाद्या गोष्टीचे ज्ञान होत असते. ते डोळे असलेल्या माणसाकडे नसते. ज्याला डोळे नसतात त्याला डोळ्यांची खरी किंमत कळते. आज भारतात, जगभरात खूप अंध व्यक्ती आहेत ज्यांना डोळ्यांची गरज आहे. म्हणून मरणोत्तर ' नेत्रदान ' हे खरोखर सर्वश्रेष्ठ दान आहे. डोळे दान केल्याने माणसाला जणू नविन जन्मच मिळत असतो. या डोळ्यांतून तो पुन्हा सर्व
काही पाहू शकतो, अनुभवू शकतो.
सौ. राजश्री सुहास जाधव.
उपयुक्त व माहिती पूर्ण लेख लिहिला सखी👌👌
ReplyDeleteमस्तच...... एकंदरित काय, दृष्टी ही फार महत्त्वाची आहे...... कलियुगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे....... अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे....... धनदान, अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली, तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल....... त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल......
ReplyDeleteमस्त लिहिलंय 👌
ReplyDelete