माणसाचं कसं असतं ना, कधी कधी सारं समजत असतं,
कळत असतं पण वळत नाही. लहान मुलांचेच पाहा ना
त्याला अमुक एक करू नकोस म्हटलं की ते मूल तेच
करणार. त्याला ते करून पाहायचे असते. जेव्हा ते मूल
न सांगितलेली गोष्ट करतो आणि त्यातील धोका त्याला
तेव्हाच समजतो, मग पुन्हा काही तो त्या वाटेला जात नाही. कारण ते लहान असल्याने त्याला आपण जसे घडवू तसे ते घडते.
पण मोठ्यांच्या बाबतीत किंवा आपल्या स्वतःच्या
बाबतीत काय म्हणता येईल ! आपण समोरच्याला त्याच्या
वर्तणुकीबाबत बरेच वेळा सल्ले देत असतो, असे करू नकोस, सर्वांशी प्रेमाने वाग, विनाकारण तंटा करू नकोस, शंका घेऊ नकोस. पण समोरील व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीतच नसेल तर कोणी कितीही सांगा
त्याला ते पटत नाही. ती व्यक्ती त्याचा हेका सोडत नाही.
परिणामी त्याचे परिणाम त्याच्या सहित इतरांनाही भोगावे
लागतात. मन त्याच्या बाबत इतरांचेही मन कलुषित होते.
त्याला दुसऱ्यांच्या निंदेला सामोरे जावे लागते. नाती
दुरावतात. इतरांनाही त्याच्या वागणुकीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय ह्या सर्वांचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावरही होऊ शकतो . म्हणजे सर्व
बाजूने नुकसानच ठरलेले असते.
माणूस स्वतःही कधी कधी असेच वागतो. बुध्दीला
काही गोष्टी पटत नसल्या तरी मन काही मानत नसते. त्या
मनाला कितीही बजावले तरी एखादी चुकीची गोष्ट त्याच्याकडून कधी ना कधी होत असते. पण ते कधी तरी झाले तर चूक सुधारता येते. पण वारंवार तीच जुनी चूक
माणूस पुन्हा पुन्हा करू लागला तर समोरच्याच्या नजरेतून ती व्यक्ती उतरते. त्याच्याविषयी कटुता मनात
उत्पन्न होऊ शकते. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करु लागतात. ' अरे ही व्यक्ती अशीच आहे, नेहमी चुकाच करते ' असे लोक गृहीत धरू लागतात. त्यानंतर कितीही
चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक लवकर स्वीकारत नाही.
म्हणून समजून सांगण्याची वेळ ही स्वतःवर किंवा
दुसऱ्या कोणावरही येऊ नये, असेच माणसाने वागावे.
आपण कुठे चुकतो, काय बरोबर काय चूक , हे आपल्याला समजले पाहिजे. दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर
माणसाने योग्य कामासाठी केला पाहिजे. फालतू, निराधार गोष्टींमध्ये त्याने कधीही स्वतःस अडकवून घेता कामा नये. तेव्हा माणसाच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteसुंदर वैचारिक लेखन!✍️👌👌👌
ReplyDelete