Saturday, 9 April 2022

बापाच्या मनाची व्यथा..

मनातील डायरीचे पान 🌿🌿:- अंतर्गत विषय:-

बापाच्या मनाची व्यथा :-
        
            आई म्हटले की एक वात्सल्य मूर्ती समोर येते कारण घराला घरपण तिच्यामुळे येते आणि वडील म्हटले की एक शिस्तप्रिय, कठोर व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. जणू आपण ते गृहितच धरलेले असते. पण एका बापालाही तितकेच हळवे मन असू शकते जितके एखाद्या स्त्रीचे असते. पुरुषांनी रडलेले हे मात्र फारसे कुणाला रुचत नाही. जर त्याच्याकडून तसे झाले तर त्याला नावं ठेवली जातात. का, त्याला रडण्याचा हक्क नाही का ? कितीही आघात झाले तरी त्याने ते आतल्या आत सहन करणे योग्य आहे का ? साऱ्यांना खंबीरपणे साथ देणे
एवढेच त्याचे कर्तव्य आहे का ? त्यालाही त्याच्या आवडी निवडी प्रमाणे हवे ते घेण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अवधी नको का? हे प्रश्न खरोखर एकदा जाणून
घेतले तर पुरुषांच्या मनाची व्यथा सहज लक्षात येईल.
              
           एक स्त्री घरासाठी जितकी राबते, तितकेच एक पुरुष बाहेरील सर्व जबाबदारी नेटाने पेलतो. आयुष्यभर घरासाठी झटत असतो. बाहेर जाऊन, पडेल ते काम करून, प्रसंगी वरिष्ठांकडून होणारा अपमान सहन करून तो पैसे मिळवतो आणि घरातील सर्वांच्या गरजा भागवत असतो. तो कमावून आणून देतो म्हणून घरातील स्त्री सगळ्यांसाठी खाण्यास बनवू शकते. त्याला होणारा त्रास तो कधी दाखवत नाही .खरे तर जास्त मानसिक त्रास हा
पुरुषच सहन करत असतो. स्त्री रडून, दुसऱ्याशी बोलून स्वतःचे दुःख हलके करते पण पुरुष मात्र रात्री झोपताना छताकडे पाहून, कधी शून्यात नजर लावून बसलेला बऱ्याच जणांनी पाहिले असेल. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची घडी कशी नीट बसेल, महिना संपत आला की, खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, हे सारे प्रश्न उभे ठाकलेले असतात. तो कधी ते बोलून दाखवत नाही.
              
                    एक वडील म्हणून ते मुलांना चांगल्या शाळेत घालतात भले त्यांची ऐपत नसेल तरीही आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेतले पाहिजे याकरिता ते कर्ज काढून, मोठ्या कष्टाने मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यांना हवे ते खाणे, पिणे, कपडालत्ता, सर्वांच्या सुखाचा एक वडील आधी विचार करतात. बायको, मुलांसाठी हवं ते खरेदी करतील पण स्वतः मात्र कधी काही घेत नाही. मुलांना महागडे मोबाईल खरेदी करून देतील, त्यांना हवे तेव्हा पैसे देतील , स्वतः मात्र काटकसर करून जगतील. बहुतेक असेच चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. आपण मदर्स डे जितका दणक्यात साजरा करतो तितका फादर्स डे साजरा करत नाही. हेही तितकेच खरे आहे. आईच्या वात्सल्याचे नेहमीच कौतुक होत असते पण वडीलही आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमाविषयी मात्र एवढे एवढे बोलले जात नाही. वडील हे कायम दुर्लक्षित राहतात. 
                
                  मोठ्या मोठ्या संकटांना धीराने पेलणारा, दीपस्तंभासम असतो एक बाप. त्याच्या मनाची व्यथा जर समजून घेतली तर आणखी दहा हत्तीचे बळ त्याच्यात संचारेल व कोणतेही संकट तो  सहज पार करील.
               
                   मी माझ्या वडिलांवर एक कविता लिहिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यांच्या प्रेमाला कसलीच तोड नाही.
                         
       
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
लावला जीव अपार आम्हां लेकरांवरी 
पाहत आले मी बालपणापासुनी
सांभाळले आम्हांस तळ हाताच्या फोडापरी.....

नसे कसलेच व्यसन अन् सवयी
असे त्यांची साधी अन् सरळ राहणी
आहेत ते प्रेमळ अन् सुंदर विचारांचे धनी
हीच दिली आम्हा मुलांना शिकवणी.....

येता अनंत अडचणी,
जाणवू न दिल्या आम्हाला कधी
पेलत राहिले एकटेच आपल्या बाहुवरी
पाहिले साऱ्यांचे सुख आधी .....

सर्वांचे सर्व केले, ज्याला त्याला मार्गी लावले
परिस्थितीशी दोन हात त्यांनीच केले
नाही ठेवली अपेक्षा कोणाकडूनही,
न जगता स्वतःसाठी, आम्हा मुलांसाठी झिजले ......

पोहोचू दिली नाही कधीच आम्हास झळ
होते जणू अंगात त्यांच्या,
दहा हत्तींचे बळ
ओढत राहिले संसाराचा गाडा
सोसूनी अंतरी वेदनेची कळ ....

अजूनही माहेरी गेल्यावरी,
हवे काय, काय नको मज पाहतात सर्वतोपरी
भासू न देती यत्किंचतही उणीव मातेची
जणू घेतलाय जन्म लेकरांसाठीच त्यांनी भूवरी .....

सदैव काळजी असते आम्हा लेकरांची
बसवण्यास घडी प्रपंचाची,
परिश्रमासवे असते जोड त्यांच्या आर्थिक धोरणांची
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल सावली जणू आभाळाची.....

थकले असती आता जरी
सळसळते चैतन्य असे तरुणापरी
त्यांच्या आचार-विचारांची,
जपली आहे शिदोरी अंतरी.....

साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
सदैव राहिल ऋणी त्यांची मी
करते मी ईश्वरचरणी विनवणी,
लाभो मज हेच पिता जन्मोजन्मी...... 💐💐🙏

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

No comments:

Post a Comment

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...