Monday, 18 April 2022

एकतर्फी प्रेम

मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-
एकतर्फी प्रेम
'प्रेम' ही सुंदर अनुभूती आहे. प्रेमाची व्याख्या शब्दांत मांडणे जितके कठीण, तितके निर्व्याज प्रेम अलीकडे दिसून येत नाही. आजच्या युगात असा कृष्ण, राधा होणे हे अशक्यप्राय गोष्ट. प्रेम म्हणजे स्वतःपेक्षा जिच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या सुखाचा, तिच्या भावनांना विचार नेहमी मनात करणे. न बोलताही त्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट समजून घेणे. तिच्या सुखातच आपले सुख मानून घेणे, हे खरे असते प्रेम.
         आता मूळ विषयावर येते, ' एकतर्फी प्रेम ', जी व्यक्ती करते ती स्वतःचे आयुष्य तर दुःखात लोटते पण त्या बरोबर दुसऱ्या व्यक्तीसही त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रेम कोणावरही होऊ शकते त्यात काही गैर नाही. पण असे प्रेम काय कामाचे जिथे त्या व्यक्तीचे प्रेम समोरील व्यक्तीस मान्य नसेल किंवा ते शक्य नसेल, तिचे प्रेम नसेल किंवा ती व्यक्ती आधीच तिच्या आयुष्यात सुखी असेल. मग असे एकतर्फी प्रेम करण्यात काय साध्य होणार? पण अशा प्रेमात अडकलेला माणूस कसलाही विचार न करता सतत त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीस त्रास देत असेल तर  त्यातून मानसिक त्रास दुसऱ्या व्यक्तीस सहन करावा लागतो. प्रेम करणारी व्यक्ती हे समजून घेत नाही की  स्वतःचे वागणे चुकीचे आहे, ह्यामुळे स्वतः बरोबर दुसऱ्याच्या आयुष्याचेही नुकसान करून घेत आहे. 
           एकतर्फी प्रेमातून कधी कधी अतिशय गंभीर 
घटना घडलेल्या आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर अत्याचार, खून, ॲसिड हल्ला, अशा कितीतरी घटना आजुबाजूस 
घडत असतात. कित्येक मुलींचे आयुष्य त्यात उध्वस्त झालेले आढळून आले आहे. अजूनही परिस्थिती फार वेगळी नाही अशा घटना घडताना लोक फक्त बघ्याची 
भूमिका बजावतात, अशा गोष्टीचे भांडवल करतात. पण जी पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळणे तर दूर पण त्यातून तिच्यावर मग सगळ्यांची नजर रोखली जाते, मग वर्षानुवर्षे खटले चालू राहतात आणि त्या व्यक्तीचे आयुष्य नाहक पणाला लागते. 
        प्रेम आहे तर त्या व्यक्तीस सांगा तिला ते पटवून द्या. जर तिने तुमचे प्रेम स्वीकारले तर चांगलीच गोष्ट आहे. जर तिला मान्य नसेल तर तुमच्या डोक्यातून तिचे विचार बाजूला सारा आणि नव्याने आयुष्य जगा. नाही ना तिचे प्रेम, पण निःस्वार्थ मैत्री तर असू शकते ना. तिच्या मताचा आदर करा. 
         प्रेम नाही म्हणजे आयुष्य संपले का? अहो आयुष्यात प्रेमाशिवाय करण्यासारखे खूप आहे, ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल, लोक तुम्हाला नावाजतील. दुसऱ्यास सुख कसे मिळेल हा विचार जर माणसाने केला तर तो ही आपसूक सुखी होईल.
        एकदा नक्की विचार करून पाहा, एकतर्फी प्रेम करायचे की ती व्यक्ती आपल्या जीवनात हवी असेल तर तिच्याशी निस्वार्थ मैत्री करायची, तिच्या मताचा आदर करायचा. स्वतः आनंदात राहायचे आणि दुसऱ्यासही आनंदात राहू द्यायचे.

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

  1. समाजातील वास्तवावर जळजळीत भाष्य करणारा लेख आहे.
    वास्तविक प्रेम ही एक हळुवार कल्पना आहे.त्यात बळजबरीने प्रेम मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे योग्य नाही. समोरच्या व्यक्तीचा होकार असेल तर आणि तरच प्रेम फुलू शकते नाही तर असे एकतर्फी प्रेम करणारे नक्कीच विक्षिप्त असतात व समोरच्या व्यक्तीला धोकादायक ठरू शकतात.

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...