मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :
आतुरता :
डोळ्यांत या आस तुझी
दाटूनी येई आसवांचा पूर
उठे हृदयी माझ्या काहूर
भेटीस तुझ्या झाले मी आतुर....
एका प्रेयसीचे मनातील गुज आहे, जीला तिच्या सख्याच्या भेटीची ओढ लागलेली आहे, ती आठवणीने त्याच्या व्याकूळ झालेली आहे. अशी आतुरता प्रत्येकालाच कशा ना कशाची लागलेली असते. एखादी गोष्ट मनापासून मिळावी, अशी उत्कंठा माणसाला नेहमीच असते. त्यासाठी तो त्याच्या मनाची हवी ती तयारी करतो कारण ती आतुरता त्याला शांत बसू देत नाही.
माणूस कशासाठी आतुर होईल, ह्याचा काही नेम नाही. कधी कोणाला भेटण्याची आतुरता असते, विद्यार्थ्यांस परीक्षेचा निकाल जाणून घेण्याची, नववधूला तिच्या मिलनाची ओढ लागलेली असते. एखाद्या मातेस तिच्या आई होण्याची आतुरता लागलेली असते. तर
कोणाला गावी जाण्याची, कोणास सैन्यात भरती होण्याची, बळीराजाला दमदार पावसाची ओढ लागलेली असते, तसेच जे परंपरेनं चालत आलेले सण आहेत, त्याचीही आतुरता माणसांना खूप असते. एकंदरच माणसाचा स्थायी स्वभाव आहे तो, कशाचीही ओढ त्यास लागू शकते.
एवढेच काय पण ह्या चराचरातील सारेच कशा न कशाने व्याकूळ होत असतात. ग्रीष्माने तप्त झालेली वसुंधरा पावसाच्या एका थेंबासाठी आतुर झालेली असते. जेव्हा पावसाच्या सरी बरसू लागतात तेव्हा ती वसुंधरा तृप्त होते आणि त्याचे जणू प्रत्युत्तर म्हणून सारी सृष्टी हिरवा साज चढवते, नद्या नाले दुथडी भरून वाहू लागतात. नवचैतन्याने सृष्टी खुलून जाते. ही सारी कमाल आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्या पावसाच्या आगमनाने झालेली असते. कोकीळ, चातकही पावसाची आतुरतेने वाट पाहत, सूर आळवत बसलेला असतो. पावसास येण्यासाठी साद घालत असतो.
आतुर होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती मनातील उत्कंठा माणसाच्या भावना जागृत ठेवते आणि आपल्याला हवे ते मिळवण्याची एक धुंदी माणसाच्या मनावर चढते. प्रेमात व्याकूळ झालेली प्रेयसी,प्रियकराच्या एका कटाक्षासाठी वेडी होते. त्यासाठी ती त्याच्या आवडीनुसार स्वतःस बदलते, आपल्याकडे आकर्षित
करण्यासाठी सजते, सवरते. हे सर्व त्या एका ओढीने तिच्याकडून ते आपोआप होत असते.
मातृत्वाची जेव्हा एखाद्या स्त्रीला चाहूल लागते, तेव्हा तिच्या बरोबरच परिवारातील सारेच त्या छोट्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. त्याच्या स्वागतची जय्यत तयारी सुरू करतात. त्या होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेऊ लागतात, तिचे सर्व लाड पुरवतात. घरातील वातावरण त्यामुळे खेळीमेळीचे होऊन जाते. सर्वांस बाळाची ओढ लागलेली असते.
जीवन आहे तिथे ओढ आहे. जिथे ओढ आहे तिथे काळजी, प्रेम आहे. मग ती माणसे असो वा प्राणी-पक्षी किंवा हा निसर्ग. आतुरता ही सगळीकडेच दिसून येते.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम..!👌
ReplyDeleteअतुरता ही मनात असतेच..!
छान शब्दात सांगितलं आहे....!
आबा...✍️
Nice
ReplyDelete