Thursday, 7 April 2022

अंतर्मन (आत्मपरीक्षण)

मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿:- अंतर्गत विषय
अंतर्मन ( आत्मपरीक्षण )
       'पाहिलं जर अंतर्मनात डोकावून,
       खूपकाही जाल सहज उमजून
       प्राप्त करण्यास आत्मसुख,
      ओळखावे स्वतःस आत्मचिंतनातून'....

                  जीवन जगत असताना, माणूस  स्वतःच्या 'मी'पणात इतका गुरफटलेला असतो की तो कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करतच नाही. खरे तर बाह्यमन आणि अंतर्मन ही मनाचीच रूपे आहेत. आपण जे विचार सतत करत असतो तेच कुठेतरी अंतर्मनात खोलवर रुजतात आणि नंतर ते स्वीकारून बाह्य मनाद्वारे बाहेर पडतात.
जर आपले विचार हे सकारात्मक, विनयशील असतील तर जीवनात आपल्याला ऊर्जा, यश हे हमखास मिळते. पण आपण अंतर्मनात सतत नकारात्मक, आत्मघातकी, वाईट विचार करत राहिलो तर मग जीवनात तसेच घडत जाते, अपयश पदरी पडते. जीवन नैराश्याने ग्रासले जाते.
म्हणून स्वतःचे अंतर्मन हे सदैव निकोप ठेवा कारण अंतर्मन हे वाईट, चांगले दोन्हीही स्वीकारत असते, तेव्हा अंतर्मनावर जेवढे चांगले विचार बिंबवता येतील तितके बिंबवा.
           माणूस दुसऱ्यांचे दोष काढण्यात कायम तत्पर असतो. 'हम करे सो कायदा' अशीच त्याची वृत्ती असते. त्याला स्वतःचेच म्हणणे खरे करायचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेण्याची त्याची वृत्तीच नसते. कधी
कधी समोरच्या व्यक्तीचेही बरोबर असू शकते. ही गोष्ट कधी आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांच्या मतासही तितकेच महत्त्व द्या जितकं तुमच्या मतास इतरांनी
द्यावे, असे आपणास वाटत असते.
          स्वतःच स्वतःला आधी ओळखण्यास शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्यास शिका. स्वतःमधील
राग, मत्सर हे दूर सारून जर आत्मचिंतन केले तर मनास एक वेगळेच समाधान प्राप्त होऊ शकते.  कारण जर आपण आपल्या आत डोकावून पाहिले तर तिथे सर्वात
जास्त दुसऱ्या विषयी असूया, तिरस्कारच आपल्याला आढळून येईल. ही मनात साठलेली जळमटे फेकून देऊन मन हे सद्विचाराने भरले पाहिजे. आत्मपरीक्षणाणे माणूस स्वतःची चूक मान्य करू शकतो, दुसरे जर चुकले असतील तर त्यांस मोठ्या मनाने माफ करू शकतो.
आणि ह्यामुळे परस्परांची नातीही दृढ होण्यासाठी मदत होते. नात्यात कोणताही दुरावा निर्माण होऊ शकत नाही.
              आत्मपरीक्षण करण्याने माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्वतःतील गुण, दोष सहज लक्षात येतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासास आत्मपरीक्षण हे मोलाचे काम करते. स्वतःस कशाची आवड आहे, कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो, हे जर ओळखता आले तर जीवनात माणसाला यश हे नक्कीच मिळू शकते. करिअर घडविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण हे करताच आले पाहिजे. इतर सांगतात म्हणून आपण त्याच वाटेने जाणे हे  कितपत योग्य आहे? त्यापेक्षा स्वतःतील गुण शोधा, कोणते काम तुम्ही जास्त आवडीने आणि योग्य रित्या करू शकता, कोणत्या गोष्टीत आपली रुची आहे , हे जर माणसाने जाणले तर त्यास यश हे हमखास मिळणार, यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यास काय वाटेल ? याची चिंता करत बसू नका, तुमचे मन काय सांगते , त्याचा आधी विचार करा. कधी कधी नाही म्हणण्यास शिका कारण लोक गैरफायदा घेण्यास टपूनच बसलेले असतात.
              माझ्या बुद्धीला जे उमगले ते विचार इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास
क्षमस्व.🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

















           

     


4 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...