Tuesday, 26 April 2022

अलंकार

अलंकार 
स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारे, स्त्रियांच्या अगदी आवडीचा आणि अविभाज्य घटक म्हणजे वेगवेगळे अलंकार. जे घालून मिरवण्यास स्त्रियांना अतिशय आवडते.चार चौघीत आपले कौतुक व्हावे, सगळ्यांत
आपण उठून दिसावे ही त्या मागची भावना असते. 
            फार पूर्वीपासून स्त्रियांच्या जीवनात दागिन्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि सोन्याचे वा चांदीचे दागिने घालणे हे आरोग्य दृष्ट्याही चांगले असते. स्त्री काय किंवा पुरुष काय दोघेही त्याचा वापर करतात. 
हे धातू शरीरातील उष्णता कमी करतात. शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास त्याने मदतही होते. हे सर्व जरी खरे असले तरी आजच्या युगात असे दागिने घालून मिरवणे धोकादायकही आहे. या दागिन्यांपायी कधी कधी जीवासही मुकावे लागते. ज्याची ऐपत नसते ते लोक मग खोटे दागिनेही घालतात आणि त्यात समाधान मानतात. पण कधी कधी असे खोटे अलंकार शरीरास घातक 
ठरतात. 
            जसजसा काळ बदलला गेला तसे मुलींमध्ये दागिने वापरण्याची क्रेझ पूर्वीपेक्षा कमी झाली आहे आणि त्यामागे तथ्यही आहे. हे सगळे जरी खरे असले तरी दागिने हाच खरा अलंकार आहे का? त्यानेच फक्त स्त्रीचे सौंदर्य खुलून येते का ? तर नाही, माणसाचे मन हे निर्मळ असले पाहिजे, त्याच्यामध्ये सद्भाव असला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याविषयी माणूस जागरूक असला पाहिजे. तेव्हाच तो खरा माणसाच्या आयुष्यातील अलंकार ठरेल आणि त्याच्या मनाच्या सौंदर्याला सोन्याप्रमाणे झळाळी येईल. तोच दागिना माणसाला खरा शोभून दिसतो आणि आजन्म तो त्याच्याबरोबर राहतो.  बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंग माणसाचे जर निर्मळ असतील तर कृत्रिम अलंकारांची त्याला गरज भासत नाही. लोकांच्या मनावरही अशीच माणसे अधिराज्य करू शकतात. या सर्व गुणां बरोबर माणसात कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, काहीतरी करून दाखवण्याची धमक माणसाच्या अंगी असली पाहिजे तेव्हा हेच सर्व अलंकार त्याच्या देहावर शोभून दिसतील. माणूस खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होऊ शकेल.
        बाह्य अलंकार घालून कोणी सुंदर दिसू शकत नाही त्यापेक्षा माणसाचे मन हे शुद्ध असेल तर  तो खरा सुंदर. यावरून एक गोष्ट आठवली चला तर मग वाचूया गोष्ट.....
           फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका राज्यात एक राजा आणि राणी, त्याच्या राजपुत्रासह राहत होती. राजाचे त्याच्या प्रजेवर अतिशय प्रेम होते. एक प्रेमळ राजा म्हणून त्याचा नावलौकिक होता. सर्व प्रजा त्याच्या राज्यात गुण्यागोविंदाने नांदत होती. तरीही राजा,राणी दोघेही दुःखी होते. त्यांच्या दुःखाचे कारण म्हणजे त्यांचा वयात आलेला राजपुत्र लग्न करण्यास नकार देत होता.
राजा, राणीनं खूप समजावूनही त्याला काही पटत नव्हते. शेवटी राणीने जेव्हा अन्न त्याग  करायचे राजपुत्रास सांगितले तेव्हा कुठे राजपुत्राने विवाह करण्यास संमती दर्शवली पण त्याने एक अट घातली. राजा, राणीनेही त्याची अट मान्य केली. ते दोघे अत्यंत खूश झाले. राजपुत्राची अट अशी होती की, 'जी मुलगी सर्वात सुंदर,
जिचे हात सर्वात सुंदर असतील अशा मुलीशीच मी लग्न करणार.'
          साऱ्या राज्यात राजाच्या आज्ञेनुसार दवंडी पिटवली गेली, 'जी मुलगी सर्वात सुंदर, जिचे हात सर्वांत सुंदर अशा राजकन्येशी राजपुत्र विवाह करील.' ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या राज्यातही ही बातमी समजली. जो तो राजा त्याच्या राजकन्येचा विवाह
राजपुत्राशी व्हावा ही इच्छा बाळगून त्यानुसार तयारी करू लागला. 
           अखेर तो दिवस उजाडतो ज्या दिवशी राजपुत्र त्या मुलीची निवड करून तिच्याशी विवाह करणार असतो. दूर दूर राज्यातून अनेक राजे त्यांच्या राजकन्येस घेऊन दरबारात हजर होतात. एकाहून एक सुंदर अशा मुली त्या दरबारात हजर असतात. सर्वांनी उंची वस्त्र, सोन्या,मोत्याचे अलंकार घातल्याने त्या सर्वच राजकन्या अतिशय सुदंर दिसत होत्या. तसेच आपण आणखी सुदंर 
कशा प्रकारे दिसू याची त्या राजकन्या काळजी घेत होत्या. काहींनी त्यांच्या हाताचे सौंदर्य खुलून यावे म्हणून हातावर सुंदर मेहंदी काढली होती, कोणी अतिशय सुंदर कला कुसर असलेले कंगण हातात घातले होते, कोणी रत्नजडित बांगड्या हातात घातल्या होत्या, जेणेकरून राजपुत्र आपलीच निवड करील  असे त्यांना वाटत होते.
           राजाच्या त्याच राज्यात एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगी होती. अतिशय मनमिळाऊ आणि सुशील अशी स्वभावाने होती. तिचेही लग्नाचे वय झाले होते. शेतकऱ्यास वाटते, जर राजपुत्राने आपल्या मुलीस पसंद केले तर किती भाग्याची गोष्ट असेल.  तो तसे त्याच्या मुलीस सांगतो. शेतकऱ्याच्या मुलीस ते पटत नाही. ती काहीच न बोलता नेहमीप्रमाणे वडिलांबरोबर शेतात काम करण्यास जाते, त्याआधी ती घरात असलेल्या तिच्या आजारी आईला हवं ते सर्व बघते. शेतकरी त्याच्या मुलीस गळ घालतो की 'निदान तो सोहळा पाहण्यास आपण शेतातील काम संपले की जाऊया.' शेतकऱ्याच्या मुलीला वडिलांचे मन मोडणे बरोबर वाटत नाही म्हणून ती त्याला होकार देते. सर्व शेतातील काम आटोपून ते दोघे दरबारातील सोहळा पाहण्यास जातात.
                दरबारात सर्व राजकन्या आसनावर विराजमान झालेल्या असतात . राजपुत्र प्रत्येकी जवळ जाऊन तिचे हात आणि राजकन्येस पाहू लागतो पण त्याला त्याच्या मनासारखी कोणी आवडत नाही. सर्व राजकन्या आतुरतेने वाट बघत असतात की राजपुत्राने
आपली निवड करावी पण तसे काही होत नाही. शेवटी तिथे एका बाजूला तो शेतकरी आणि त्याची मुलगी जिथे उभी असते तिकडे राजपुत्र येतो आणि त्या मुलीस न्याहाळू लागतो. अतिशय साधी, रंगाने सावळी जरी ती होती तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज चमकताना
राजपुत्रास जाणवते. तो त्या मुलीस तिचे हात पुढे करण्यास सांगतो तेव्हा ती मुलगी तिचे दोन्ही हात पुढे करते. उन्हाने तिचे दोन्ही हात रापलेले असतात. तळहातावर त्याला काही घट्टेही त्यास दिसतात. तिने ना कसले दागिने घातले असतात ना चांगली वस्त्र परिधान केलेली असतात. राजपुत्र तिच्या हाताला असे काय झाले? हे शेतकऱ्यास विचारतो तेव्हा शेतकरी त्याला सांगतो की माझी मुलगी मला मदत करण्यास रोज शेतात येते तेही तिच्या आजारी आईची सर्व देखभाल करून.
यावर राजपुत्र मनात काहीतरी विचार करतो आणि राजास सांगतो की, ही मुलगी मला पसंद आहे.
हीच खऱ्या अर्थाने खूप सुंदर आहे. राजाला राजपुत्राचे म्हणणे मान्य करावे लागते. तो त्या शेतकऱ्याच्या मुलीचा आणि राजपुत्राचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून देतो. 
सगळ्या राज्यात आनंदाचे वातावरण पसरते. अशा तऱ्हेने खरे सौंदर्य कशात आहे, हे त्या राजपुत्राला समजलेले असते.
              आपल्यालाही खरा अलंकार कोणता आहे हे समजले पाहिजे नाही का !

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

  1. खूप छान लिहिलंय कथानक.👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा..✍️

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...