Friday, 15 April 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

मनातील डायरीचे पान🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :-

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

'प्रवृत्ती' म्हणजे स्वभाव, माणसाच्या वागण्याच्या तऱ्हा. जन्मास येणारा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असते. त्याच्या त्या स्वभावाने तर त्याच्या व्यक्तिमत्वाची चांगली किंवा वाईट छाप पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी घटना घडलेली पाहून तिथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या घटने संदर्भात निरनिराळे तर्क वितर्क लावते. एखादा त्या घटनेविषयी हळहळ व्यक्त करील, तर एखादा त्याकडे दुर्लक्ष करील, तर एखादा त्या घटनेची खोलात जाऊन चौकशी करील, तर एखादा ती घटना पाहून घाबरून जाईल. असे माणसाचे स्वभाव असतात, वागण्याच्या तऱ्हा ह्या
तो त्याच्या सोयीनुसार बदलत असतो, जरी मूळ स्वभाव कसाही असला तरी.
                एखादी व्यक्ती ही अतिशय बडबडी असते, तर एखादी एकदम अबोल,भिडस्त स्वभावाची असते. एखादा चटकन राग व्यक्त करतो तर एखादा माणूस तो मनातच ठेवतो.काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तर काही व्यक्ती ह्या सतत नकारात्मकच विचार करत राहतात. काही व्यक्तींना बिनधास्त आयुष्य जगणे पसंद असते, तर काही व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते. अशी एकंदर भिन्न स्वभावाची माणसे आपल्या अवतभोवती सतत असतात. त्यांच्याशी आपल्याला
जुळवून घेता आले पाहिजे. भिन्न स्वभाव असेल तर आपसांत खटके उडू शकतात पण जर नाते टिकवायचे असेल तर स्वतःच्या अहंभावास बाजूला सारून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले, त्याच्या विचारांना समजून घेतले तर नाते टिकू शकते.
         माणसाचा स्थायी स्वभाव हा कधी बदलत नाही परंतु  त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रयत्न केले तर नक्कीच बदल घडू शकतात. एखाद्या व्यक्तीस लहानपणापासून जर चोरी करायची सवय असेल पण त्याने मनाचा निग्रह केला, चांगले विचार जर सतत त्याच्या मनावर बिंबवले गेले तर त्या माणसाची सवय ही नक्कीच जाऊ शकते.
         कधी कधी माणसे मुखवटे धारण करून जगात वावरत असतात. त्या मुखवट्यामागील खरा चेहरा ओळखायचा असेल तर त्या माणसाशी आपणास जमवून घेतले पाहिजे, त्याच्या अंतरंगात डोकावता आले पाहिजे. तर खरा माणूस काय आहे ते आपणास समजून जाईल.
           माणसाचा स्वभाव हा काहीवेळेस तात्काळ समजून जातो तर कधी कधी माणसाच्या स्वभावाचा थांगही लागत नाही कारण माणूस हा त्याचे वागणे हे परिस्थितीनुरूप बदलत असतो. हे जरी खरे असले तरी मूळ स्वभाव हा मात्र तसाच खोलवर रुजलेला असतो.
                              'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
                              माणसाच्या स्थायी किती
                             जुळवूनी घेतले जर परस्परांशी
                               चिरंतन राहतील ती नाती' .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

           
                            


3 comments:

  1. व्वा खूप छान लेख लिहिला आहे ..
    अगदी खरं आहे व्यक्ती तितक्या प्रकृती ..

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांत जीवनविषयक तत्त्वज्ञान लिहिले मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लेखन ✍️👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...