Saturday, 15 January 2022

व्हावं कधी तरी उनाड ....

   


    

  'उनाड' म्हणजे कसलेच बंधन नसलेला, स्वैर, स्वतःच्याच धुंदीत जगणारा, असा त्याचा अर्थ होतो. उनाड हे विशेषण आपण माणसाला, त्याच्या मनासही  लावतो. एवढेच काय ! पण कवी मनाला पावसामध्ये, वाऱ्या मध्ये, रात्रीमध्ये, पाखरामध्ये, प्राण्यांमध्येही हे उनाडपण दिसून येते आणि त्यावर त्याला अप्रतिम कविता सुचतात. त्याला तो शब्द अगदी जवळचा वाटतो.
             पण माणसाच्या अंगात जर उनाडपण दिसले की मग नाक मुरडले जाते. बालपणी जर एखादं मूल उनाड असलं तर आईवडील त्याला प्रेमाने नाही तर रागाने प्रसंगी धाक दाखवून त्याचा उनाडपणा थोपवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्या बालवयात त्याला कसलीच जाण नसते. त्यामुळे तेथे आई-वडिलांचे थोपवणे हे गरजेचेच असते.
          प्रत्येक व्यक्तीत एक छोटे मूल, उनाडपण दडलेले असते. पण वयापरत्वे ते तो कधी दाखवत नाही. त्याच्यावरील संस्कार त्याला तसे करू देत नाही.  'आपण जर असे उनाड वागलो तर लोक काय म्हणतील!' ह्या विचाराने ती व्यक्ती सतत धीर-गंभीर चेहऱ्यानेच वावरत असते. परिणामी त्याच्या आजूबाजूचे वातावरणही खेळीमेळीचे राहत नाही. जीवन अगदी यंत्रवत होऊन जाते.
          सतत डोक्यावर कसला तरी भार घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ? माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी तरी तो मनाने तितकाच तरुण असतो. म्हणून बघावं कधीतरी उनाडासारखं जगून. आपल्याला जे हवे ते पाहावे मनसोक्त करून. कसलेच बंधन न बाळगता स्वच्छंद जगावं, मित्र-मैत्रिणींसमवेत धमाल मजामस्ती करावी, मंत्रमुग्ध करणारं संगीत ऐकावं, निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करावी, मस्त खावं, हसावं, नाचावं, आपली गुपितं एकमेकांना सांगावी आणि मनसोक्त जगावं.
        एकदा तरी जीवनात असे उनाडपणे जगून पाहा मग बघा मनात कशी स्फूर्ती संचारेल ! जीवन आणखीन
सुखकर बनवण्यास आपल्यात उत्साह निर्माण होईल. जीवनास नवी दिशा प्राप्त होईल.

सौ. राजश्री सुहास जाधव.



         
        


5 comments:

  1. खुप सुंदर लेख लिहिला..... 👌👌🙏🏼🙏🏼✍️✍️

    ReplyDelete
  2. व्वा आता नक्कीच उनाडक्या करायला हव्या . छान लिहिलाय आपण

    ReplyDelete
  3. खूप मस्त रचना अप्रतिम...🌹👌👌👌💗💗💗🌿🌿🌺🌺

    ReplyDelete
  4. खूप खूप सुंदर लिहिलंय...बालपण आठवलं!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...