मनातील डायरीचे पान 🌿🌿:-
बायको : ( एक कणा कुटुंबाचा )
बा - बाराही महिने,
य - यथा शक्ती,
को - कोणतेही काम चोख बजावणारी, अशीच असते बायको.
पटले की नाही😀पण खरेच आहे ते. एक गृहिणी म्हणून तिची सर्व कर्तव्य ती पार पाडत असते. तेही कसलीच अपेक्षा न ठेवता. घराला घरपण येते ते तिच्यामुळे. मग ती आई असो, मुलगी असो वा पत्नी. माहेरी लहानाची मोठी होते. ज्या घरी ती वाढली, इतकी वर्ष सुखात कसलीच जबाबदारी नसलेली ती लग्न झाले की आयुष्यभरासाठी सासरी सर्व जबाबदारी अगदी सांभाळून घेते. सर्वांना आपलेसे करते. तिच्यामुळे दोन्ही कुटुंब जोडली जातात. ज्येष्ठांना आदर, सगळ्यांना काय हवे,नको ते पाहणे, घरातील सर्वच कामे, सणवार, पाहुणचार, सगळ्यांची दुखणी , आदरातिथ्य मुलांवर संस्कार हा जणू तिने घेतलेला मक्ताच असतो. तिला त्यासाठी गृहीत धरतात. एक स्त्रीही ते अत्यंत प्रेमाने ती सर्व कामे करत असते. तिला फक्त तुमच्याकडून दोन शब्द प्रेमाचे ऐकायचे असतात, तिचे कौतुक केले की तिच्या आनंदाला पारावार राहत नाही.
नोकरी करणारी स्त्रीही देखील कोणाची आई, पत्नी असते. तिच्यावर तर जास्त जबाबदारी असते. ती नोकरी करते म्हणून घराला वाऱ्यावर सोडत नाही. सर्व घरातली जबाबदारी सांभाळून ती नोकरी करते. हे करत असताना तिची किती कसरत होते हे तिलाच ठाऊक. घरातील किराणा, दळण, साफसफाई, भाजीपाला, घरात जर वृध्द व्यक्ती असतील तर त्यांची देखभाल,छोट्या छोट्या गोष्टींकडेही तिलाच जातीने लक्ष द्यावे लागते. नाही तर तिचा सतत उद्धार होत राहतो. तिच्या नोकरी करण्याचाही काहींना त्रास होतो. तिला टोमणे ऐकावे लागतात. नोकरी करते म्हणून कोणी तिला काही आयते खाण्यास आणून देत नाही. ती कुठे जरी बाहेर गेली तरी नंतर सर्व कामे ही तिलाच पूर्ण करावी लागतात. काही अपवाद असतात. ज्या कुटुंबात स्त्रियांना असा पाठिंबा मिळत असेल अशी कुटुंब खूपच कौतुक करण्याजोगी आहेत.
ज्या घरात ती नसते, अशी घरे एकदा जाऊन बघा, त्या घराचा जणू आत्माच हरवलेला असतो. एका स्त्रीच्या असण्याने घरात चैतन्य निर्माण होते. साऱ्या घरावर तिची एक छाप असते, नीटनेटकेपणा त्या घरात असतो. संस्कार जपले जातात. ह्या सर्वांचा अभाव, ज्या घरात स्त्री नसते तिथे दिसून येतो. हे सर्व मी अनुभवले आहे, जेव्हा मी माहेरी जाते तिथे आता आई नसल्याने घर एकदम भकास वाटते, करमत नाही. एक पोकळी निर्माण झाल्याची सतत जाणीव होत राहते.
कधी कधी स्वतःच्याच बायकोविषयी बोलताना पुरुषमंडळी किती सहजपणे बोलून जातात, ' आमची मंडळी घरातच असतात, बाकी काही करत
नाही.' पण कधी विचार केला आहे का तुम्ही ? घरात ती सतत राबत असते. त्याचा कधी मोबदला मागत नाही. एक दिवसही तिच्या कामांना सुट्टी मिळत नाही. सर्वांस
हवे ते हवे तेव्हा खाण्यास बनवून देते. तिला कधी वाटत नसेल का आपल्यालाही कोणी आयते बनवून द्यावे, एखाद्या दिवशी उशीरा उठावे, मनासारखे जगावे, हिंडावे,
नवऱ्याने तिचे कौतुक करावे, तिला फिरायला घेऊन जावे. असे काही ठिकाणी होत असेलही पण सर्वसाधारण सर्वत्र अशीच परिस्थिती असते, कामाच्या व्यापात स्त्री
स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलेली असते. तिचे छंद, तिच्या आवडी निवडी तिने बऱ्याचदा बाजूला सारलेल्या आढळतात. खरे तर असे म्हटले पाहिजे, ' एक स्त्री काय काय करते !'
स्त्री मग ती आई, बहिण, मुलगी, पत्नी कोणीही असो, तिची कदर करा. तिला जपा, तिच्यातील गुणांचे कौतुक करा, पाठिंबा द्या आणि कधीतरी तिच्यासाठी स्वतः काहीतरी बनवून द्या, अगदी चहा जरी केला तरी ती किती खूश होते ते पाहा ! स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाके आहेत, त्यामुळे एक चाक जरी डळमळीत झाले तर संसार कोलमडून पडण्याची शक्यता असते. तेव्हा दोघांनी सामंजस्याने वागणे हिताचे ठरते.
सौ. राजश्री सुहास जाधव.
No comments:
Post a Comment