ऑनलाईन मैत्री
ऑनलाईन मैत्रीचे जसे फायदे आहेत तसे खूप गंभीर असे परिणामही त्यामुळे भोगावे लागतात, हे तर आता साऱ्यांनाच माहित आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ऑनलाईन मैत्री वर इथे एक कविता सुचली आहे , ती अशी :
ऑनलाईन मैत्रीने तिलाही भुरळ घातली
विचार करण्याची क्षमताच जणू खुंटली
अजाणतेपणी गेली वाहवत अशी काही
मोहाच्या पाशात ती आपसूक गुंतली....
ऑनलाईन मैत्रीने केली अशी दैना
रोज तो म्हणे तिला," तुझ्याविना जीव राहिना "
ती ही भुलली त्याच्या बोलण्याला
तिचाही दिवस त्याच्याशी बोलल्याशिवाय जाईना.....
रोज सकाळच्या गुड मॉर्निंग पासून रात्रीच्या गुड नाईटपर्यंत
किती आणि काय, काय बोलणे होई !
नव्हते त्यांस काही ताळतंत्र
मिस यू, मिस यू म्हणत एकमेकांस दिवस जाई.....
झाली एकदा उपरती,आली अवचित भानावर
ऑनलाईन मैत्रीनेच आणली गदा तिच्या आयुष्यावर
जाणले तिने जेव्हा नव्हती तीच एकटी त्याच्या आयुष्यात
खूप जणींना लावूनी नादी तो खेळत होता खेळी त्यांच्यावर ......
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ऑनलाईन मैत्रीचे हे प्रस्थ इतके माजले आहे की तरुणाईचे तर त्याविना पान हलत नाही. पूर्वीच्या काळी कुठे होते असे काही तंत्रज्ञान विकसित पण त्या मैत्रीत खरी ओढ होती, ती दृढ होती. मुळात मैत्रीच्या मर्यादा सांभाळूनच ती मैत्री निभावली जात होती. तिथे कसलाही स्वार्थ, दिखाऊपणा नव्हता. ती मैत्री मग दोन
मित्रांतील असो वा दोन मैत्रिणींतील असो ती निखळ होती.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
हल्ली फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, स्नॅप चैट अशी कितीतरी माध्यमे आहेत ज्यात ही तरुणाई अखंड बुडालेली असते. ऑनलाईन जग हेच खरे मानून मग तिथे मैत्री केली जाते. लाईक्स मिळविणे आणि एकमेकांना फॉलो करणे नंतर पर्सनल नंबर घेणे इथून सुरुवात झाली की ती थेट नको ते वळण घेते. ह्यात प्रेम, मैत्री कुठेच नसते फक्त आकर्षण असते किंवा एखादा
फसविण्याचा दृष्टिकोन ठेऊनच मैत्री करतो. अशा मैत्रीत ना एकमेकांविषयी आदर असतो ना काळजी. जर एखाद्यावेळेस समोरून प्रतिक्रिया मिळण्यास वेळ झाला किंवा ताबडतोब जर उत्तर नाही दिले गेले की मग गैरसमज त्यातून पुन्हा वाद सुरू होतात. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे क्षणाचा विलंब न करता ब्लॉक करून मोकळेही होतात. इतका ह्या मैत्रीतील विश्वास कमकुवत असतो. एकमेकांना इतके गृहीत धरत असतात की प्रत्येकास त्याचे व्यक्तिगत आयुष्य हे असतेच हे ही विसरले जाते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ऑनलाईनची ही आभासी दुनिया ज्याने आपल्याला साऱ्या सुख सोयी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी त्याच्या विळख्यात आजची तरुणपिढी बेमालूमपणे अडकत चालली आहे ते ही तितकेच खरे आहे. खोटे फेक अकाउंट्स बनवून फसवणे, व्हिडिओ कॉलिंग द्वारे स्क्रीन रेकॉर्डिंग करून मुली, मुले एकमेकांस ब्लॅकमेल करून
पैसे उकळण्याचे धंदे करत असतात त्याला जर कोणी जुमानले नाही तर त्या व्यक्तीची बदनामी करण्यासही मुले, मुली मागे पुढे पाहत नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ऑनलाईन मैत्री करताना आपण ती कोणाशी करत आहोत, समोरील व्यक्तीचा हेतू कसा आहे, त्याच्या विषयीची संपूर्ण माहिती ही आपणास असणे गरजेचे आहे. जरी नाही मिळाली सर्व माहिती तर आपण आपल्या मर्यादा राखूनच बोलले पाहिजे. आपली सर्व माहिती अशी कोणास सहज देताही कामा नये. न जाणो कोणी त्याचा कधी गैरफायदा घेईल ते आपल्याला समजणार देखील नाही. कधी कधी ह्या ऑनलाईन मैत्रीतून चांगलेही घडताना पाहिले आहे. जन्मोजन्मीचे जोडीदारही ह्या मैत्रीतून होताना दिसले आहे. त्यामुळे ऑनलाईन मैत्रीचे चांगले आणि वाईट असे दोन्हीही परिमाण दिसून येतात फक्त ते आपणास ओळखता आले पाहिजे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा खूप छान लेख आणि कविता ..अगदी खरं आहे ऑनलाईन मैत्रीत विश्वास न ठेवणे बरे
ReplyDeleteराजश्री वास्तविकता आहे ही. शिकल्या सवरलेल्या मुली सुद्धा बळी पडतात आहे . त्यांची विचार शक्ति कुठे गहाण पडते माहिती नाही.
ReplyDelete